[९१] छ १२ मोहरम ।। श्री ।। २७ सप्टेंबर १७५७.
राजश्री विश्वासरावजी गोसावी यांसि
छ श्रीमंतसकलउत्तमगुणालंकरणअखंडितलक्ष्मीअलंकृतचारुस्वभाव व स्ने॥ महाराव जसवंत निंबाळकर दंडवत विनंति उपरि येथील क्षेम त॥ छ १२ मोहरम जाणोन निजानंद लिहिणें. विशेष. कृपा करून पेंडापुरच्या मुकामीचें पत्र पाठविलें तें पावोन समाधान जालें. आपण समीप आलों असतां पत्र न पाठविलें ह्यणोन लिहिलें. ऐसियासी राजश्री राजे जीवनरावजी प्रतिदिवसीचें वर्तमान लिहितात. याजकरितां पत्र लिहिण्यास अंतर जालें. माफ केलें पाहिजे. इकडील वर्तमान तर याजपूर्वी आपण राजश्री बाबूरावजीस लिहिलें होतें कीं तूर्त दोन चार रोज राजश्री राजे जीवनराव यांसी तिकडे येणें मसलहत नाहीं. हें वर्तमान आपल्या श्रवणाभिरूढ व्हावें ह्मणोनच त्यांस लिहिले होतें. सारांश, आपणांस श्रवण जालेंच असेल. सांप्रत राजे म॥रनिले यांनी जाबसालाचे गुंते कुल उगविले. कांही संदेह राहिला नाहीं. उदईक राजे म॥रनिले व हकीम महमदअल्लीखान आपल सेवेसी येतात. विस्तरें वर्तमान निवेदितील. व घरचा पेंच उगवावयासाठी निजामुद्दौला बहादर यांजकडून दोघे भले माणूस नवाब बसालतजंग यांजकडे आले होते ते व इकडूनहि सोफीबेगखान वगैरे तिघेजण भले माणूस ऐसे तिकडे गेले. पुढें यांचा त्यांचा भेटीचा सिद्धांत होईल तो लिहिजेल. हे विनंति.