प्रस्तावना

१७५२ च्या डिसेंबरांत भालकीची लढाई व तह झाल्यानंतर १७५३ च्या जानेवारींत भालकीहून बाळाजी बाजीराव श्रीरंगपट्टणच्या (११) स्वारीस गेले. ग्रांट् डफ् नें भालकीच्या तहापर्यंत बरीवाईट हकीकत दिली आहे. पुढें १७५३ च्या जानेवारींत, तो म्हणतो, शिंदे, होळकर हिंदुस्थानांत गेले व बाळाजी बाजीराव पुण्यास परत आले. परंतु, हीं दोन्ही विधानें विश्वसनीय नाहींत. शिंदे १७५३ च्या मेपर्यंत देशीं चांभारगोंद्यास राहिले. (पत्रें व यादी ३४०). होळकर मात्र हिंदुस्थानांत गेले. बाळाजी बाजीराव पुण्यास न जातां, भालकीहून थेट श्रीरंगपट्टणास गेले (पत्रें व यादी १४). काव्येतिहास संग्रहांतील पत्रें, यादी वगैरेंतील नंबर १४ हें पत्र शके १६७४ च्या पौषांतल्या वद्य सप्तमीला (पौष बहुल पंचमी म्हणून तेथें चुकून पडलें आहे) म्हणजे २५ जानेवारी १७५३ ला लिहिलें आहे. हें पत्र हरपन्हळीच्या मुक्कामाहून लिहिलें आहे. अर्थांत् काव्येतिहास संग्रहकार सुचवितात त्याप्रमाणें हें पत्र कर्नाटकच्या म्हणजे श्रीरंगपट्टणच्या स्वारींत असतां बाळाजी बाजीरावानें लिहिलें आहे. ह्यावरून उघड आहे कीं, १७५३ च्या जानेवारींत श्रीरंगपट्टणची स्वारी सुरूं झाली. ही स्वारी ग्रांट् डफ् नें अजीबात गाळली आहे. भालकीचा तह झाल्यावर सबंद १७५३ सालभर बाळाजी बाजीरावाच्या हालचालीचा त्यानें बिलकुल हिशेब दिला नाहीं. १७५४ त होळीहोन्नूरची स्वारी बाळाजीनें केली एवढें मात्र त्यानें पुढें लिहिल आहे. १७५३ तील श्रीरंगपट्टणची स्वारी त्याच्या लक्षांतून अजीबात गेली. ही स्वारी कांहीं लहानसहान नव्हती. ही १७५३ च्या जानेवारीपासून जूनपर्यंत चालली होती. ही स्वारी त्याला माहीतच नव्हती तेव्हां त्याने तिचीं कारणें व परिणाम दिले नाहींत हें स्पष्टच आहे. १७५४ तील होळीहोन्नूरच्या स्वारीचा त्यानें थोडासा उल्लेख केला आहे. ती स्वारी करण्यास कारणें काय झालीं हें त्यानें मुळींच सांगितलें नाहीं. १७५४ च्या जूनांत होळीहोन्नूरच्या मोहिमेहून परत आल्यावर घुनाथरावदादाला बाळाजीनें गुजराथेंत पाठविलें म्हणून ग्रांट् डफ् म्हणतो. परंतु, १७५४ च्या जानेवारींत रघुनाथराव कुंभेरीच्या वेढ्यास लागले होते हें ह्या पुस्तकांतील १६१ व्या टीपेंत सप्रमाण सिद्ध करून दाखविलें आहे; त्याअर्थीं १७५४ च्या जूनानंतर रघुनाथराव गुजराथेंत गेला हें ग्रांट् डफ् चें म्हणणें निव्वळ चुकीचें आहे हें उघड आहे. होळीहोन्नूरच्या स्वारीहून बाळाजी १७५४ च्या जूनांत पुण्यास आले म्हणून ग्रांट् डफ् म्हणतो, परंतु तेंहि चूकच आहे. कारण पत्रें व यादींतील नंबर १५ च्या पत्रांत 'कर्नाटक, कचेश्वरीहून शके १६७६ च्या ज्येष्ठ शुद्ध १३ स आपण पुण्यास आला.' म्हणून बाळाजी लिहितो. म्हणजे १७५४ च्या ३ जुलैला बाळाजी पुण्यास आला असें होतें. १७५४ च्या पावसाळ्यानंतर म्हणजे १७५४ च्या आक्टोबरांत रघुनाथराव गुजराथेच्या स्वारीस निघाला व त्यानें अमदाबाद १७५५ च्या एप्रिलांत घेतली, असें ग्रांट् डफ् नें चुकीचें गणित केल्यामुळें रघुनाथरावाची १७५३ तील गुजराथेंतील मोहीम, १७५४ तील कुंभेरीचा वेढा व १७५५ तील दिल्ली, रोहिलखंड ह्या प्रदेशांतील मोहिमा, ग्रांट् डफ् ला मुळींच सोडून द्याव्या लागल्या. कुंभेरीचें नांव त्यानें एका ठिकाणीं काढिलें आहे; परंतु तें भीतभीतच काढिलें आहे व त्या पॅरिग्राफावर टीप देतांना रघुनाथरावाच्या हिंदुस्थानांतील मोहिमांसंबंधीं आपल्याला चांगली माहिती मिळाली नाहीं म्हणून प्रांजलपणें कबूल केलें आहे. परंतु, ह्या प्रांजलपणांत थोडासा हटवादीपणाहि दाखविला आहे.