[४३] ।। श्री ।। १५ जानेवारी १७५५
राजश्री बाबूराव महादेव गोसावी यांसः-
अखंडित लक्ष्मी आलंकृत राजमान्य स्ने॥ जयाजी शिंदे दंडवत. सु॥ खमसखमसैन मया व अल्लफ. तुह्मी पत्र पाठविलें तें पावलें. तपसीलवार वर्तमान लिहिल्याप्रमाणें कळों आलें. मनसूरअलीखान९८ याच्या पुत्रास शिष्टाचार युक्त पत्र फारसी पे॥ असे. हें त्यांस देणें. आणि श्रीमंत राजश्री दादासाहेब तुह्मास आज्ञा ज्याप्रमाणें करतील त्याप्रमाणें वर्तणूक करणे. लालाबकसीराम यास ताकीद द्यावीसें लिहीलें त्यावरून त्याजला लिहिलें. असे कीं तुह्मी उभयता येक चित्ते वर्तोन राहत जाणें. द्वैत न दाखवणें. ऐसे त्यास लिहिलें असे. तरी बकसीराम व तुह्मी येक विचारें राहून हरयेक कामकाज करीत जाणें. जाणिजे. छ२ र॥खर बहुत काय लिहिणें. हे विनंति.
मोर्तब सुद