[७९]                                                                  ।। श्री ।।                          २३ सप्टेंबर १७५७

पे।। छ ८ मोहरम शुकवार दोन प्रहर दिवस.

श्रीमंत राजश्री रावसाहेब स्वामीचे सेवेसीः –
विनंति सेवक शामजी गोविंद सा। नमस्कार विनंति येथील कुशल ता॥ छ ४ मोहरम मुकाम उतरादीपेठ प॥ अंबडापूर प्रतीतातीर दर लष्कर नवाब निजामुदौला स्वामीचे कृपादृष्टीनें यथास्थित असे. यानंतर आज्ञापत्र छ २२ जिल्हेजचें जासुदासमागमें सादर जालें तें मुकाम मजकुरी कालीं पावलें. पत्री आज्ञा कीं नवाब कोठवर आले, कोणे मुद्यावर येतात, ते बातमी वरचेवर लिहित जाणें. ऐसीयास अलजपुरीं नवाब असतां नवाब सलाबतजंग व बसालतजंग यांणीं लिहिलें कीं शहानवाजखान बागी होऊन दौलताबाद बळाऊन बसला आहे. त्याचें पारपत्य करावें लागतें. तर रात्रीचा दिवस करून फौजसमेत येऊन पोहचणें. त्यावरून तीन चार हजार फौज व तोफखाना समागमें होता तो व इमरामखान गाडदी यास हजार स्वार, तीन हजार गाडदी व बारा तोफानसी, पंच्याऐशी हजार रुपये दरमाहा निखालस द्यावे. या करारानें, चाकर ठेऊन अलजपुरीहून कुच करून मुलकापासून अल्लाहीसाहा? थोडाबहुत वसूल घेऊन खर्ची करीत करीत येथवर आले. राजश्री जानोजी भोसले सेनासाहेबसुभा यांणीं आपणाकडील कमावीसदारांस लिहिलें कीं नवाब मुलकापासून थोडाबहुत वसूल घेऊन शहरास जातील. त्यास तुह्मी जमीदारांस ताकीद करून देविणें, अडथळा न करणें. त्यावरून कमावीसदारांनीं जमीनदारांस रुजू करून लाख दोन लाखाची वाट करून देविली. राजश्री मुधोजी भोसले याजकडे मलकापूर, आकोट, आमोद वगैरे सोळा महाल सरंजामाचे आहेत. त्या माहालावरी तफरीक तीस हजार आली. त्याची निशा कमावीसदारापासून करून घेतली प॥. अंबडापुर येथील जमीदारांकडे पेशकश व नजर बारा हजार रुपये करार केले. पांचसा मुकाम पर्जन्याकरिता अंबडापुरीं मुकाम जाले. याउपर कुच दरकुच शहरास येत आहेत. बाळापुरानजीक होते. तेथें श्रीमंताची पत्रें आली की उतावळी करून तुह्मीं शहरास यावेसें नाहीं. आलियास तुमचे आमचे स्नेहास अंतर पडेल. त्यास नवाबांनी उत्तर पाठविलें कीं या दिवसांत जावयाचें आपणासहि जरूर नव्हतें. परंतु नवाबाचीं पत्रें वरचेवर येतात की सीताब येणें, त्यावरून खावंदाचा हुकूम बजाऊन आणावा जरूर, यास्तव येत असो; परंतु आह्मी शहरास पावलियावर श्रीमंताचे स्नेहाची वृद्धि अधिकोत्तर होय तेच करून. ह्यणऊन उत्तरे गेली आहेत. विदित होय. लक्ष्मण खंडागळे व रामचंद्र जाधवराव यांसहि याचीं पत्रे गेली होती. त्यास खंडागळे जाफराबादेचे मुकामास येऊन भेटणार. त्याजब॥ हजार स्वार आहेत. रामचंद्र जाधवहि गंगेवर आले ह्यणोन वर्तमान आहे. याउपरि होईल तें वृत्त वरचेवर सेवेसी लिहिले जाईल. सेवकापासी जासूद बहुत नाहीं. दोन तीन जोड्या आहेत. त्या वरचेवर पुण्यास रवाना कराव्या लागतात. यास्तव दोन चार जोड्या सेवकाकडे पाठवणार स्वामी खावंद आहेत. सेवेसी विदित होय. हे विज्ञप्ति.