[७२] ॥ श्री ॥ जुलै १७५७
राजश्रियाविराजितराजमान्यराजश्री माहादाजी नारायण स्वामी गोसावी यांसीः -स्ने॥ बाळाजी गोविंद नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लिहीत जाणें. विशेष. तुह्मांकडील बहुत दिवस पत्र येऊन तिकडील वर्तमान कळत नाहीं. त्यास तिकडील सविस्तर वर्तमान लिहीत जाणें. खेतसिंगाकडील१६५ अनुसंधान श्रीमंत राजश्री दादास्वामीकडे गेले. वकील मातबर गेले. येथें कळलें व श्रीमंतींहि आह्मांस लिहिलें कीं वकील आह्मांकडेस आले. तुह्मांकडे कांहीं बोलीचाली आली किंवा नाहीं तें लिहोन पाठवणें. श्रीमंताकडील कारकूनहि गेले. ऐसें येथें ठीक कळलें. आणि तुह्मीं तिळमात्रहि संभूत लिहिलें नाहीं हें अपूर्व भासतें ! असो. कारकून गेले ते कोठें आहेत ? काय करितात ? कोणाचे अनुसंधानानें गेलें ? तें तपसीलवार वर्तमान ठीक मनांस आणून आह्मांस लिहोन पाठवणें. देशीं तीर्थरुपासहि तपशीलवार लिहोन पाठवणें. म्हणजे तेथें जी खबरदारी करणें ती करतील. ठीक बातमी हिंदुपतीची व खेतसिंगाची व कारकून बुंदेलखंडांत गेले आहेत. त्यांची मनांस आणून आम्हास लिहिणे. त्याचे लिहिणें तपसीलवार तीर्थरुपाकडेस सत्वर लिहोन पाठवणें. केवळ सूस्त न राहणे वरचेवर लिहीत जाणें. हिंदुपत कोठे आहे ? काय करतो ? खेतसिंग कोठें आहे ? काय करतो ? तो ठीक बातमी साद्यंत पत्रीं लिहिणें. तीर्थरुपाकडेस जोडी पाठवण्यास ढील तीळमात्र न करणें. आह्मी तुर्त दिल्लीस लष्करी श्रीमंताचे असो. श्रीमंत राजश्री दादास्वामी जेनगरास होते तेहि आले. येक दोन रोजीं दिल्लीस येतील. भेटी घेऊन बीदा होऊन येतों. तुह्मी आपलें कामकाज कैसें करितां ? पैसा टक्का येतो वाट काय करितात, तें लिहिणें. रसद यंदा ।।येथें देणें लागत्ये. त्यास ऐवज जोडिला पाहिजे. सावकारहि कोणी मातबर नाहीं. त्यास तुह्मांकडेस काय ऐवज आहे तो लिहिणें. कांही सावका-यांत मिळाला तरी मेळवोन लिहोन पाठवणें.