[३४] ।। श्री ।। १५ मे १७५४
चिरंजीव राजश्री गोपाळराव९२ यांसी प्रती गोपाळराव गणेश आशीर्वाद उपरि येथील कुशल ता॥ छ २१ रजब जाणोन स्वकीये लिहीत जाणें. विशेष. तुह्मीं पत्र पाठविलें तें पावलें. लिहिलें वर्तमान विदित जाहालें. उंटे, नोबत व घोडीं पाडाव करून आणिलीं म्हणोन लिहिलें तें कळलें; बहुत संतोष जाहाला. ऐशास, तुह्मी कर्ते, यशस्वी आहां; कामकाजास पाठविल्यास यशच मिळवाल हा भरंवसा चित्तांत जाणोन खावंदचाकरीस शिपाईपणाची शर्त केली आणि चिरंजीवपणाचें नाव रक्षिलें. बहुत समाधान जाहालें. या उपरि पुढेंहि सवाई यश संपादाल यांस संशय नाहीं. उप्रांत पुढील विचार तर तुह्मी एकाएकीं त्याजवर चढून न जाणें. तेच कदाचित् चढून आल्यास ठाण्याबाहेर मोर्चेबंदी करून राहावें. आणिक मागाहून कुमकहि पाठवून देऊं; चिंता न करणें. जेणेंकरून खावंदाचा नक्ष राहे तें करावें. यमतुका? कडील आज प्रहर दिवसास पत्रें आलीं तेथें लिहिलें होतें कीं जमीदाराकडील भीड? प्यादे होते ते सर्व याजकडे मिळाले. जमीदाराचा भरवसा नाहीं. आपले हुजुरातचे स्वार दोनतीनशें आहेत. ते थोडेच आहेत. त्यास चिंता नाहीं. आणीकहि कुमक जगदाप याजकडे पाठवावी लागते. ऐशास, आज संध्याकाळ पावेतो पाठवून देतों. तिकडून तुह्माकडे येतील. आज येथून कूच करून नारोशंकर याच्या गोटाजवळ मुक्काम केला. बहुत काय लिहिणें. तुह्मीं शर्त केली! बरें! तुमची आमची भेट झाल्यावर सर्व गोष्टी ईश्वर उत्तम करील. कांहीं चिंता नाहीं. बहुत शहाणपणें राहावें. बहुत काय लिहिणें. हे आशीर्वाद.