[७१]                                                                    ॥ श्रीशंकर ।।                                                    १२ जुलै १७५७

 

सेवेसी विज्ञापना. अबदाली जर कदाचित् मार्गशीर्षपौषांत आला तरी इकडे मनसुबा भारीच आहे. गुजरातेचा१६१ मजकूर थोडकाच आहे. तिकडे दोनचार हजार फौज सदाशिवराव रामचंद्र याचे कुमकेस पाठविली तरी तें काम होई ऐसें आहे. हिकडे दत्ताजी शिंदे याची रवानगी करावी. जर अबदाली आला तरी त्याचें पारपत्य केलेंच पाहिजे. न आला तरी कासी, बंगाला, ये प्रांतीं स्वारी केलियास चार रुपये आकारतील. कपाळ स्वामीचें थोर आहे. प्रयत्न आमचा आहे. तेथें चार रुपये आकारतील ऐसा भरंसा वाटतो. वरकड हिदुस्थानांत कोठे जीव दिसत नाहीं. जाटांत जीव आहे, द्रव्यवान आहे, परंतु किले मातबर आहेत व मोठा काबूकार१६२ आहे. सारांश मातबर मनसुबा केल्याखेरीज ऐवज भारी दिसत नाही. दत्तबास पाठवावें ह्मणजे अबदालीचे कामास येतील. तो न आला तरी बंगालियाचा कारभारास कामास येतील. येथे दोन महिने जाहले. माधवसिंग१६३ मामलती करीत होता. परंतु मल्हारबा न आइकत. हजारों कजिये माधवसिंगावर काढिले, तो किल्यांत पंधरा वीस हजार फौजेनशी; आह्मी मल्हारबा बारा चौदा हजारानशीं; बाहेर मल्हारबाची तरी दीडदोन हजार पर्यंत फौज येथें आहे. लटके आपले घराऊ हिशेब काढून मामलत न करीत. आह्मास बाहेर कर्ज देखील भक्षावयास न मिळे. रोज गांव मारून खावे. सांप्रत या मुलुखांत गढ्या फार बांधल्या१६४ आहेत. झुंजल्याखेरीज दाणा नाहीं, रुपया नाहीं, कर्जहि न मिळे. तेव्हां आह्मीं मल्हारबास टाकून मामलती रगडून केली. त्याचे कानावर घालूनच केली. परंतु कष्टी जाहाले. अकरा पैकीं सहा लक्ष आले, त्या पैकींहि त्याची वांटणी दोन लक्ष देणें पडली. बाकी चार लक्ष आह्मांस ऐवज आला. सारांश मल्हारबा ज्या त्या कारभारांत ओढितात. आह्मी सोशितों. निदानी येक येक दोन दोन फाके लष्करास जाहाले. तेव्हां येणेंप्रमाणें केलें. पुढें त्यास घेऊन जातों. समजावीसहि करूं. परंतु खुलासा लिहिला आहे. दत्तबा आलियानें परस्परें वर्म असतें. याजमुळें ओढणार नाही. आपल्यांत दुही पडते. तेव्हां शत्रूस बळ फावतें. ऐसे हजारों पेंच होतात. कोठवर ल्याहावे ? संकलित लिहिले असेत. बहुत काय लिहिणें. रवाना छ २४ सवाल. बहुत काय लिहिणें. हे विज्ञापना. पै॥छ २४ जिलकाद, श्रावणवद्य ११.