कॉ. श्रीपाद डांगे यांची प्रस्तावना

याचे कारण एकच की इंग्रज अमेरिकन-जर्मन ग्रंथकारांच्या ओंजळीनेच ज्ञानरस प्यायची सवय, संस्कृत कोशकार मौनियर विलियम्स मोठे, पण आमचे आपटे मात्र कश्चितात गण्य!

चतुष्पाद प्राण्यापासून द्विपाद मनुष्यप्राणी उत्पन्न झाल्यानंतर त्याची स्थित्यंतरे कशी काय झाली व त्याबद्दल प्राचीन आर्यांच्या शस्त्रात काय लिहिले आहे याचा मुळी आमच्या अनेक विद्वानांनी विचारच केला नाही. त्यामुळे आपली अद्यापही किती राजकीय, आर्थिक व वैचारिक हानी होऊन भाऊबंदकी माजत आहे ?
स्वतः राजवाडे यांनासुद्धा मराठी इतिहासाची, सरदार-इनामदारांच्या घरची, सड़की मळकी दप्तरे धुंडाळता धुंडाळता इतके आयुष्य खर्च करावे लागले की हिंदवी समाज विकासाचा व शास्त्राचा विचार करण्यासाठी फुरसत मिळत नसे. पण असामान्य व्यवसायात्मिका बुद्धी म्हणजे 'जीनिअस ' टाईपची, म्हणूनच या सर्वातून ते रस्ता शोधून काढू शकले. पण ते करता करता अपुरेपणीच त्यांचा जीवनप्रवाह संपला.

या संबंधांचा विचार करण्यापूर्वी राजवाडे हिंदवी म्हणा किंवा आंर्य किंवा हिंदू ( हिंदू हे नाव कुठल्याही शास्त्रग्रंथात नाही व त्याची व्याख्याही नाही ) यांच्या समाज व राज्यरचनेचा विचार करण्यात गुंतले होते.

लैंगिक अथवा विवाहसंस्थेच्या ज्वलंत विषयाला हात घालण्यापूर्वी त्यांनी दोन तीन अत्यंत मूलगामी प्रश्न हाती घेतले होते.

एक म्हणजे वर्ण आणि जाति-संस्था आर्यांनी कुठे, कधी, कां व कशा निर्माण केल्या हा अत्यंत महत्त्वाचा व जिवंत विषय आहे. अस्पृश्य जातींच्या लोकांची आजची अत्यंत अपकृष्ट स्थिती पाहून त्यांची पूर्वेतिहासरचना करता येत नाही. उदाहरणार्थ, पूर्वी अनेक आर्यसमूहामध्ये वर्णांची आळीपाळीने बदली होत असे. काही काळ ब्राह्मण्यात प्रविष्ट झालेले शूद्र होत तर शूद्वर्गीय ब्राह्मण होत. हा चक्री नियम काही काळाने बदलावा लागला. ज्या मनुष्यजातीला अग्नी कसा उत्पन्न करावा हे माहीत नव्हते, तो सापडताच त्यांची आर्थिक जीवनाची व साधनाची परिस्थिती बदलली. खूप मनुष्यबळ हे एक साधन, त्यासाठी खूप व बेबंद यमनक्रिया करून मनुष्यसंख्याबल उत्पन्न करून स्वसंरक्षण व वर्धन करणे हेच प्राथमिक लैंगिक संबंधाचे हेतू होते. नंतर रक्तबीजशुद्धीचे ( इन्सेस्टचे ) ज्ञान सामायिक प्रजोत्पादनाच्या परिणामांच्या अवलोकनाने झाले. तेव्हा मातापुत्र,भाऊबहीण वगैरे शरीरसंबंधांवर नियंत्रण घालून ते निषिद्ध करण्यात आले; पण त्यांचे अवशेष वेदातल्यो यम-यमी संवादात व वर्णभेदरहित यमनक्रियावाचक क्षत्तापालागली संवादात, वेदोक्त यज्ञक्रियाबद्ध धर्मरक्षणाच्या नावाखाली आपल्या हाती पडले आहेत. त्याचा समाजशास्त्रासाठी प्रथमच राजवाडे यांनी उपयोग केला. नंतर आर्यसमाजाची संपत्ती, साधने व निसर्गसाधने वाढत गेली, पशुपालन वाढत गेले, तसे वेदकर्माचे साफल्य म्हणजे प्रजापशवः उत्पन्न करणे. यज्ञाचा म्हणजे समाजाच्या उत्पादन-वितरणकार्याची, दानाचा, दैवी याचनेचा तो मुख्य विषय झाला. पुढे उत्पादनाची साधने वाढत वाढत अनेक वस्तूंच्या उत्पन्नाची हत्यारे व त्यांचे कौशल्य वाढविणे आवश्यक झाले तसतसे अनेक जाति-धंदेवाचक समाज-गट पडत गेले.