कॉ. श्रीपाद डांगे यांची प्रस्तावना

परंतु ज्याला आपल्या भाषांचा, चालीरीतींचा, सामाजिक व ऐतिहासिक हालचालींचा, राज्यांचा, समाजपरिवर्तनाचा, भाषापरिवर्तनाचा, विचारपरिवर्तनाचा व वर्गबंधरचनेचा इतिहास लिहायचा असेल त्याला प्रथम मार्क्स-एंगल्स व त्याच्यासह राजवाडे-संशोधनाचा खजिना घेतल्याशिवाय गत्यंतर नाही. हे काम आमच्या विद्वानांनी व मार्क्सएंगल्सच्या शास्त्रानुयायांनी करावे म्हणूनच हा विवाहसंस्थेवरचा ग्रंथ पुस्तक-रूपाने मुद्रित करण्यात आला आहे.

आपल्या देशाचा, समाजाचा, समजुतींचा, विचारविकारांचा, राज्ययंत्रविकासाचा इतिहास समजण्यास माझ्या मते प्रथम राजवाडे, नंतर कोसांबी व जायस्वाल यांचा आधार घेऊनच सुरुवात केली पाहिजे. अर्थात् या सर्वांचा मुकुटमणी राजवाडे यांना मार्क्सएंगल्सच्या सिद्धान्तांच्या ' लेसर 'वत् तेजाच्या कोंदणात बसवूनच पुरुषसूक्तजन्य अशा या भुवनमंडळाचे नीट दर्शन घेतले पाहिजे.

या माझ्या विधानाने मी कुणाही इतिहासकाराची किंवा संशोधकाची कामगिरी कमी लेखू इच्छीत नाही. पण असा प्रश्न कां विचारू नये की इतक्या सर्व विद्वानांसमोर वेदादी ग्रंथ हजर असता, पाणिनी व पतंजली उभे असता, त्यांना राजवाड्यांचा विवाहसंस्थेच्या इतिहासाच्या मूलगामी सिद्धान्ताचा शोध कां लागू नये किंवा अर्थ कां सांगता येऊ नये ?

जाति-संस्थेचा इतका अचाट ऊहापोह व जाती मोडण्याची अफाट व न्यायभूत चळवळ करणा-या विद्वानांच्या मनात घोळणारा जाति-संस्थेचा मूलगामी सिद्धान्त फक्त मार्क्स-एंगल्सनी सिद्ध केला आहे; पण त्याला परिपोषक व त्यांचे सिद्धान्त माहीत नसती तत्सम इतिहासाची मांडणी फक्त राजवाडे यांनीच केली आहे हे स्पष्ट आहे. याचे कारण इतकेच की आमची बरीच इतिहासकार मंडळी जर्मन, इंग्रज, अमेरिकन शोधकांच्या ओंजळीने पाणी पिण्याची सवय घेऊन इतिहास-शोधनात परभृताप्रमाणे प्रविष्ट झाली असे म्हटले तर कुणी राग मानू नये.

नाही तर वेद वाचणा-या किंवा प्रत्यक्ष मनुस्मृतीने सुद्धा मान्य केलेल्या अनेक विवाहपद्धतीचा विचार करून आर्य समाजातील अनेक विवाहपद्धतींचे म्हणजे स्त्रीपुरुष लैंगिक संबधाचे विवरण कोणी का केले नाही ? चतुष्पाद स्थितीतून द्विपाद स्थितीत अवतीर्ण झालेल्या या मनुष्य प्राण्याचे विकासशास्त्र डार्विनच्या पुस्तकाने कधीच करून टाकले होते. लेटुर्नोचे रानटी समाजातील लैंगिक संबंधांचे तसेच बॅशोफेनचे ग्रंथ आमच्या संस्कृतज्ञ सर्व विद्वानांसमोर आज अनेक वर्षे होते. त्यांनी त्याचा वापर करून राजवाड्यांनी जो हिंदू विवाहसंस्थेचा इतिहास १९२०-२३ साली लिहायला घेतला तो या इतरांनी कां नाही घेतला ? एवढेच नव्हे तर राजवाड्यांनी तो प्रश्न उचलताच त्यांच्या प्रकाशकाला मारण्याची धमकी देण्यात आली. प्रत्यक्ष जिच्या आधारे मालमत्तेचे अनेक तंटे इंग्रजी कोर्टात वकील मंडळी लढवीत त्यांनी मनूच्या अनेक विवाहप्रकारांसंबंधी किंवा सगोत्रावरची बंदी, सपिंडाचा विचार इत्यादीकडे कां लक्ष दिले नाही ?