जन्म, बालपण व शिक्षण

असो. राजवाडयांचा खाक्या तर त्यांच्या छंदाप्रमाणें चालू राहिला. रात्री ते निरनिराळया विषयांवर इतर मुलांबरोबर अनेक विषयांवर चर्चाही करीत. त्यांस विडया ओढण्याचें व्यसन मात्र लागले. ५। ५० विडया ते व इतर मंडळी सहज फस्त करीत, दुसरी गोष्ट म्हणजे सर्व व्यवहार वगैरे इंग्रजीतून झाले. राजवाडे लिहितात. 'एका दुष्ट खोडीने मात्र मला अतोनात ग्रासिलें. ती खोड म्हणजे दुसरी तिसरी कांही नाही. इंग्रजी बोलण्याची व इंग्रजीत विचार करण्याची. बाराव्या वर्षापासून २६व्या वर्षांपर्यंतच्या पंधरा वर्षांत, वाचणें, लिहिणे, विचार करणें वगैरे सर्व मानसिक क्रिया मी इंग्रजीत करूं लागलों. शाळेत व कॉलेजांत प्राचीन व अर्वाचीन मराठी ग्रंथांशी शिक्षकांनी व परीक्षकांनी माझी क्षणभरही ओळख करुं दिली नाही. त्यामुळें स्वभाषेंत कांही प्रासादिक व नामांकित ग्रंथच नाहीत, असें इतर परीक्षार्थ्यांप्रमाणें माझेंहि मत व्हावयाला कोणतीच हरकत नव्हती. तशांत कुंटे, रानडे वगैरे विद्वान् लोकहि मोठमोठीं व्याख्यानें इंग्रजींत झोडीत. कॉलेजांत तर बहुतेक सर्व व्यवहार इंग्रजीतच करुं लागलों. बंधूंना व मित्रांना पत्रें लिहावयाची ती इंग्रजीत; डिबेटिंग सोसायटींत मोठमोठी अद्वातद्वा व्याख्यानें द्यावयाची ती इंग्रजीत; देशी कपडे वापरणारी मंडळी कॉलेजांत काढिली. तिचें सर्व काम इंग्रजीत; व्यायामाचे सर्व प्रकार करावयाचे ते इंग्रजीत; सारांश सतत पंधरा वर्षे बारा आणि बारा चोवीस तास सर्व कामें मी इंग्रजीत करूं लागलों. या एवढया अवधीत मी मराठी बहुतेक विसरुन जावयाचा; परंतु दोघा तिघा गृहस्थांनी मला ह्या विपत्तीपासून वांचविलें. विष्णुशास्त्री चिपळोणकराच्या टीकात्मक निबंधांनी इंग्रजीच्या या खग्रासापासून माझा बचाव केला. काव्येतिहास संग्रहकारांच्या ऐतिहासिक पत्रांनी स्वदेश म्हणून कांही आहे हें मला कळलें व परशुरामपंत तात्या गोडबोले ह्यांनी छापलेल्या काव्यांनी महाराष्ट्रसारस्वताचा मला अभिमान वाटूं लागला. हे तीन ग्रंथ जर माझ्या दृष्टीस न पडते, तर आज मी कुंटयांच्या सारखी इंग्रजीत व्याख्यानें देण्यास, सुरेंद्रनाथांप्रमाणें बूटपाटलोण घालून देशाभिमानाची पत्रें काढण्यास, किंवा सुधारकांप्रमाणें बायकांना झगे नेसवण्याच्या ईष्येस खचित लागलों असतों. सुदैवाने ह्या देशाभिमान्यांच्या प्रयत्नानें माझी अशी विपत्ति झाली नाही. नाहीतर असले कांही चमत्कार माझ्या हातून नि:संशयं घडते ! दारु पिणारे, मांस खाणारे, बूट पाटलोण घालणारे, स्वदेशाला, स्वभाषेला व स्वधर्माला तुच्छ मानणारे गांवठी साहेब त्यावेळी कॉलेजांतल्या परीक्षार्थ्यांत अगदींच नव्हते असें नाही. परंतु त्यांचा संसर्ग उपरिनिर्दिष्ट ग्रंथकारांच्या ग्रंथांतील मतलबानें मला घडला नाही. विद्यार्थी धर्मलंड होतो की दुराचारी होतो, इकडे कॉलेजांतील शिक्षकाचें मुळीच लक्ष नसे. कॉलेजांतील युरोपीय शिक्षकाच्या मतें माफक दारु पिणें, बूटपाटलोण घालणें, स्वधर्माप्रमाणे न चालणें, स्वभाषा विसरणे ही कांही पापें गणिली जात नसत. तेव्हां ते ह्या गोष्टीत लक्ष घालीत नसत हें स्वाभाविकच होतें. गुरूंचा धाक नाही, पुढा-यांचा कित्ता नाही, धर्माचा प्रतिबंध नाही, अशा स्थितीत मी पंधरा वर्षे काढिली. तीतून मी सुरक्षित पार पडलों त्याचें सर्व श्रेय वरील तीन ग्रंथकारांकडे आहे.'

राजवाडे यांच्या वरील लिहिण्यांत कोणास अतिशयोक्ति, विपर्यास कदाचित् दिसेल; पोषाख वगैरे कांही कां असेना; पोषाखावर स्वदेशप्रेम व स्वधर्मप्रेम थोडेंच अवलंबून आहे असें कांही म्हणतील; परंतु बाहेरच्या गोष्टी ह्या आंतील भावाचे दिग्दर्शन पुष्कळ वेळां करितात. बारीक सारिक गोष्टीत परकी येऊन हळुहळु नकळत आपण पूर्णपणें परकी व स्वपरंपरेस पारखे बनत चाललों आहोंत. 'Ill habits gather by unseen degrees." असें म्हणतात. अशा गोष्टींत कडवेपणा पाहिजे. साळसूदपणा उपयोगी नाही. भगिनी निवेदिता यांची अशी गोष्ट सांगतात की, एकदां शाळेंत शिकवीत असतां Time यांस देशी शब्द त्यांस पाहिजे होता. ती शाळा बंगाली भाषा बोलणा-या मुलींची होती. त्यांनी मुलींस विचारिलें. परंतु मुलींस उत्तर देतां येईना. शेवटी 'रेखा,' असें एकीने सांगितलें. त्याबरोबर निवेदिता बाई 'रेखा, रेखा' घोकीत आनंदाने निघून गेल्या.