Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

जन्म, बालपण व शिक्षण

हा गंमतीचा अभ्यासक्रम मुंबईस चालू होता. या वेळेस म्हणजे १८८८ मध्यें विष्णुशास्त्री यांच्या शोकप्रधान मृत्यूची वार्ता सर्वत्र पसरली व राजवाडे यांस फार वाईट वाटले. विष्णूशास्त्री यांस ते 'महात्मा' म्हणून संबोधित. त्यावेळी जें जें म्हणून स्वत:चें त्याची त्याची टर उडविण्याची जी परंपरा पडली होती, त्या परंपरेस, त्या प्रघातास ज्यानें आपल्या प्रभावशाली लेखणीने परागंदा केले त्या त्या पुरुषास ते महात्मा म्हणून संबोधित. स्वदेशस्थिति समजाऊन सांगणारा, स्वभाषेचें वैभव वृध्दिंगत करणारा थोर पुरुष निघून गेल्यामुळे त्यांच्या तरुण व उदार मनास फार दु:ख झाले. ते लिहितात 'त्यावेळी महत् दु:ख झाले. मरण हें मनुष्याची प्रकृती आहे. ही गोष्ट तोपर्यंत मांझ्या अनुभवास आली नव्हती. तारुण्याच्या मुशींत जगताच्या या तीरांवर स्वैर व निभ्रांत हिंडत असतां जेथून कांही कोणी परत आला नाही, त्या तीराची मला कल्पनाच नव्हती: सर्व मनुष्यें व प्राणी अमर आहेत अशी माझी अस्पष्ट भावना होती. या भावनेला शास्त्रीबोवांच्या मृत्यूनें जबर धक्का बसला. शाळेंतून जातांना व येतानां आणि शहराच्या पश्चिम भागांत हिंडतानां शास्त्रीबोवांच्या मूर्तीस अनेकवार पाहिले होतें. त्या पुरुषासंबंधानें अनेक गोष्टीचा माझ्या मनावर संस्कार झाला असल्यामुळें त्यांच्या मरणानें मला दु:ख झाले.'

पहिली सहामाही संपल्यावर दुसरी सहामाही राजवाडे कॉलेजमध्यें गेलेच नाहींत. पैशाची अडचण व इतरही कांही अडचणीं यांमुळे हे शक्य झाले नाही. ते पुण्यास आले व खासगी शिकवणीचा जुजुबी धंदा ते करूं लागले. राजवाडे यांनी एक वर्ग काढला व त्यांत १५।२० मुले येत. ३०।३५ रुपये या दोन तासांच्या वटवटीनें मिळून जात. दीड दोन वर्षे त्यांनी हा धंदा चालविला. इतर कांही वाचन वगैरे चाललेंच होते. १८८४ मध्ये राजवाडे यांचे वडील बंधू यांस दक्षिणा फेलो ही डेक्कन कॉलेजमध्ये जागा मिळाली. राजवाडे यांनी दुसरी टर्म डेक्कन कॉलेजमध्यें भरली व एक महिनाभर अभ्यास करुन दुस-या वर्षांत ते पास झाले. १८८५ मध्ये त्यांनी कॉलेजमध्यें दोन्ही टर्म्स भरल्या, परंतु ते परीक्षेस बसले नाहीत. सहामाही, तिमाही, नऊमाही वगैरे परीक्षांस राजवाडे बसत नसत. तेंच तेंच पुन्हा पुन्हा घोकून काय करावयाचे ? वार्षिक परीक्षेंत पास झालें म्हणजे झालें असें ते म्हणत. भावाकडून पैशाची मदत होऊं लागल्यावर ते १८८६-८७ मध्यें डेक्कन कॉलेजच्या वसतिगृहांतच जाऊन राहिले. येथे राहिल्यावर त्यांनी आपला स्वच्छंद कार्यक्रम सुरु केला. लो. टिळकांप्रमाणे त्यांनी येथें प्रकृतीची फार उत्तम काळजी घेतली. भावी आयुष्यांत अत्यंत कष्टप्रद काम तीन तपें त्यांनी जें केलें त्यासाठी वज्रप्राय कणखर शरीर असणें जरुर होतें. त्यांचा ह्या वेळचा कार्यक्रम त्यांच्यांच शब्दांत सांगितला तर फार योग्य होईल. “नियमानें पांच वाजतां पहांटेस मी उठत असें व तालमींत जाऊन दोन तास उत्तम मेहनत करीत असे. बैठका, जोर, जोडी, मलखांब व कुस्ती अशी सुमारे दीड दोन हजार मेहनत रोजची होई, तों सात वाजत. नंतर शेर दीडशेर दूध पिऊन अर्धा तास कॉलेजाभोंवतालील मैदानांत व झाडाखाली सहल व विश्रांति घेई. आठपासून नऊपर्यंतचा वेळ वर्तमानपत्रें वाचण्यांत जाई. पुढें एक तास नदीवर पोहणें होत असे. परत येऊन भोजन आटोपून खोलीकडे जों यावें तों नेमके साडेअकरा वाजत. नंतर अर्धा तास समानशील अशा दोन चार सद्गृहस्थांच्या समागमांत धूम्रपान आटोपून कॉलेजांतील पुस्तकालयांतून आणिलेलें एखादें पुस्तक हिंडून, फिरुन निजून व बसून मी चांगलें वाचून मनन करीत असें. वर्गातील शिक्षकांच्या व्याख्यानांस मी प्राय: कधीं जात नसें. इतर परीक्षार्थी विद्यार्थी जे चार तास वर्गांत घालवीत ते मी स्वतंत्र पुस्तकें वाचण्यांत घालवी. वाचण्याचे काम साडेचार चारपर्यंत चालें व नंतर बंद होई. मग शादिलबोवांजवळील होडीखान्यांत एकाद्या होडग्यांत सात वाजेतों नदीवर पांच सात मैलांचें वल्हवणें करी. तेथून परत येऊन संध्या भोजन जों आटोपावें तों साडे आठ वाजत. नंतर दहा साडे दहा वाजेतों अनेक स्वभावांच्या विद्यार्थ्यांशी सामाजिक, राजकीय, धार्मिक व पाठशालीक विषयांवर पांच पन्नास विडया खलास होईपर्यंत नानाप्रकारच्या गप्पा चालत. साडेदहापासून पहांटेच्या पांच वाजेपर्यंत खोलींतील दोन टेबलांवर घोंगडी पसरून त्यावर ताठ उताणें निजलें म्हणजे मला गाढ झोंप येई. मेहनतीने अंग इतकें कठीण होऊन जाई की, मऊ बिछान्यावर मला कधी झोंपच येत नसे. १८८४ पासून १८९० पर्यंतच्या सात वर्षांत मी एकही दिवस कधी आजारी पडलों नाही.”