प्रस्तावना

ह्या सर्व पत्रांच्या तारखा प्रो. मोडक ह्यांच्या जंत्रीवरून ठरवून टाकिलेल्या आहेत. पत्रांतील कठीण शब्दांचे अर्थ प्रायः दिलेले नाहीतं. कारण, अलीकडील २० वर्षांत काव्येतिहाससंग्रहाशीं महाराष्ट्रवाचकांचा बराच परिचय झाला असल्यामुळें तें काम आतां न केलें असतां चालण्यासारिखें आहे. शिवाय, आमचे एक मित्र सतराव्या व अठराव्या शतकांतील ऐतिहासिक लेखांतून आलेल्या कठिण शब्दांचा कोश तयार करीत आहेत व तो लवकरच छापून तयार होईल असा अजमास आहे. हीं पत्रें वाचणारास महाराष्ट्राचा स्थूल इतिहास माहीत आहे असें गृहीत धरिलें आहे. पत्र कोणीं कोणास लिहिलें आहे हें पत्रांतूनच लिहिलेलें असतें व पत्र केव्हां लिहिलेलें आहे हें प्रत्येक पत्राच्या मथळ्यावरील तारखेवरून समजून येईल. हीं सर्व पत्रें १७५० पासून १७६२ च्या मधील अवधींतील असल्यामुळें तीं कोणकोणत्या प्रसंगाला अनुलक्षून आहेत हें सहज कळून येण्यासारिखें आहे. शिवाय, ह्या ग्रंथांतील बहुतेक पत्रें संगतवार लागलेलीं आहेत. तेव्हां अमुक एक पत्र अमुक एका प्रसंगाला अनुलक्षून आहे हें समजण्याला अडचण यावी असें नाहीं. तरी वाचकांना संगतवार पत्रांचेंहि अनुसंधान सहज व्हावें म्हणून इ. स. १७५० पासून १७६१ पर्यंतच्या सर्व मोहिमांचे तक्ते खालीं देतों. ह्या तक्त्यांच्या, इतर इतिहासांच्या व पत्रांखाली दिलेल्या टिपांच्या साहाय्यानें पत्रांचें अनुसंधान कळण्यास वास्तविक पाहिलें तर हरकत पडूं नये.

तक्ता पहिला

स्पष्टीकरण.
१ बाळाजी बाजीराव, २ सदाशिव चिमणाजी, ३ रघुनाथरावदादा, ४ विश्वासराव, ५ जयाप्पा, ६ दत्ताजी, ७ जनकोजी, ८ मल्हारराव, ९ विठ्ठल शिवदेव, १० नारो शंकर, ११ साबाजी शिंदे, १२ गोविंदपंत बुंदेले, १३ गणेश संभाजी, १४ गोपाळराव गणेश, १५ गोपाळराव बापूजी, १६ अंताजी माणकेश्वर, १७ यशवंतराव पवार, १८ सदाशिव रामचंद्र, १९ गोविंद हरी, २० गोपाळराव गोविंद, २१ बळवंतराव मेहेंदळे, २२ महादाजी अंबाजी, २३ इभ्राईमखान गारदी, २४ रघोजी भोसले, २५ जानोजी भोसले, २६ मुधोजी भोसले, २७ मानाजी आंग्रे, २८ राघोजी आंग्रे, २९ त्रिंबकराव विश्वनाथमामा, ३० नाना पुरंधरे, ३१ दमाजी गायकवाड, ३२ कोन्हेर त्रिंबक एकबोटे, ३३ केदारजी गायकवाड, ३४ बापूजी खंडेराव चिटणीस, ३५ वामोरीचे नागोराम, ३६ समशेरबहाद्दर व ३७ रघोजी करांडे हे इतके लोक उत्तम सेनापति होते. ह्यांपैकीं प्रत्येकानें निरनिराळ्या वेळीं स्वतंत्र सैन्याचें आधिपत्य घेऊन मोहिमा सर केल्या आहेत. तेव्हां ह्या प्रत्येकाच्या मोहिमांचे सालवार तक्ते देतां आले असते तर फार उपयोगाचें झालें असतें. परंतु, अस्सल ऐतिहासिक लेखांच्या कोताईमुळें तसें सध्यां करितां येत नाहीं. सध्यां बाळाजी बाजीराव, सदाशिव चिमणाजी, रघुनाथरावदादा, विश्वासराव, जयाप्पा, दत्ताजी, जनकोजी व मल्हारराव यांच्या मोहिमांचेच तेवढे तक्ते वरती दिले आहेत. त्यावरून १७५० पासून १७६१ पर्यंत मराठ्यांच्या हिंदुस्थानभर एकंदर ठळक ठळक मोहिमा झाल्या किती, त्यांचा बहुतेक नक्की आंकडा खालीं काढून दाखविला आहे.