Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पहिला (१७५०-१७६१)
प्रस्तावना
सदाशिवराव विजयी झाला असता तर तो द्वेष कधीं कळूनहि न येता हेंहि कबूल आहे, परंतु, अपजय आला असतां हे सर्व लोक आपल्याला खाऊन टाकतील हें समजत असूनहि पेशव्यांनी त्याचा उपशम करण्याची कांहीं एक खटपट केली नाहीं हेंहि कबूल केल्याशिवाय गत्यंतर नाहीं. जिंकलेल्या लोकांची मनें आकर्षून घेण्यास व नवीन वळणावर नेण्यास पेशव्यांनीं व्यवस्थित प्रयत्न केले नाहींत हा त्यांचा मोठा दोष होता. परंतु तो दुस-या एका दोषाच्या मानानें केवळ क्षुद्र आहे असें दृष्टोत्पत्तीस येईल. मल्हारराव होळकर, गोविंदपंत बुंदेले वगैरे कपटी, कुचर व स्वामिद्रोही सरदारांना ताळ्यावर व वठणीस आणण्यास पेशव्यांनीं कांहींच व्यवस्था केली नाही. ह्या सरदारांची स्वामिभक्ति कायम असती म्हणजे जिंकिलेल्या प्रदेशांतील लोकांना जुलमानें वागवूनहि आपली सत्ता पेशव्यांना कायम ठेविता आली असती. कदाचित् प्रथम प्रथम लहानसहान बंडे झालीं असती. परंतु, घरांतल्या घरांत भेद होऊन नाश होण्यापेक्षां ती बंडे झालेलीं पुरवलीं असतीं. ह्यासंबंधानें रघुनाथरावदादानें एक मार्मिक वाक्य लेखांक २ त लिहिलें आहे. तो म्हणतो, “ स्वजनविरोध व परराज्यांतील कलहाचें मूळ अजीपासूनच लागलें आहे.” सारांश, शिवाजीप्रमाणेंच बाळाजी बाजीरावानें व सदाशिव चिंमणाजीने हें स्वजनविरोधाचें बंड आधीं मोडून टाकिलें पाहिजे होतें. सरदारांची मनधरणीं करण्याचें काम केवळ दपटशानें किंवा गोड बोलण्यानें भागण्याजोगें नव्हते. त्याला रामदासासारखेच तिन्हाईत गृहस्थ सरदारांची कानउघाडणी करण्यास, हिंदुपदपातशाहीची दिशा दाखवून देण्यास व स्वामिभक्तीचें शिक्षण लावण्यास ह्या वेळीं हवे होते.
परंतु १७५० पासून १७६१ पर्यंतच्या अवधींत रामदासासारिख्यांचा टाहो काहीं उपयोगीं पडला असा किंवा कसें ह्याची शंकाच आहे. शिवाजीच्या वेळीं रामदासाला कांहीं मर्यादित विवक्षित प्रदेशांत उपदेश द्यावयाचा असल्यामुळें त्याचें बोलणें सर्वांना ऐकूं जाणें शक्य होतें. आतां महाराष्ट्रसाम्राज्याची मर्यादा बहुतेक आसमुद्र पसरली होती. मराठ्यांचे सरदार हिंदुस्थानांतील दूरदूरच्या प्रदेशांत वर्षेच्यावर्षे वास्तव्य करून राहिले होते. त्यांना स्थानिक प्रीतीनें व स्थानिक द्वेषानें पछाडलेले होते. त्यांची व पेशव्यांची भेट दहा दहा पांच पांच वर्षांनीही झाली तर होत असे. अशांचीं मनें सन्मार्गी राखण्यास पेशव्यांच्या वतीनें शेंकडों रामदास वेळोवेळीं टोले मारण्यास त्यांजवळ राहिले पाहिजे होते. ज्यावेळीं एकहि रामदास सबंद महाराष्ट्रसाम्राज्यांत नव्हता त्यावेळीं शेकडों रामदास असण्याची अपेक्षा करणें प्राय: दुरापास्त होतें.