मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)

याजकरितां बाजीराव साहेब यांस अटकाव करून आपले जवळ ठेवावें आणि चिमाजीअप्पा यांस परशुरामभाऊ यांचे हवालीं करावें, असें ठरवून पागनीस यांणीं परशरामभाऊ यांस सांगितलें कीं बाजीराव साहेब यांस आह्मीं लष्करांत अटकावून ठेवितों आणि चिमाजी अप्पा यांस तुमचे स्वाधीन करतो; तुह्मी येश्वदाबाईचे मांडीवर देऊन दत्तविधान करून चिमणाजी माधव करावें ह्मणजे सर्वांचे मनोदयानरूप होऊन सारे अनुकूळ होतील; तेव्हां ही गोष्ट परशरामभाऊ यांर्णी कबूल केली आणि बाहरोपंत मेहंदळे यांस साता -यास नानाकडे पाठविले आणि सांगितलें कीं अशी मसलत होत आहे, आपण. यास रुकार देऊन वस्त्रें देवावीं आणि आपण मेणवलीस यावें; बाळोबा तात्या व भाऊ यांची आपली सपनाई होऊन आपली खातरजमा जाली ह्मणजे पुण्यास यावें. असें बोलणें झालें त्यावरून मेहंदळे याजवर नानाची मर्जी रुष्ट जाली. नानानीं विचार केला कीं शिंदे व परशरामभाऊ एक जाले व माधवरावसाहेब यांस दत्तक होणार तेव्हां सा-यांचें लक्ष तिकडे लागेल. ये वेळेस रुकार न दिल्हा तरी आपले माथां अपेश येईल असें समजून वस्त्रें द्यावयास साता-यास बाबूराव आपटे होते त्यांस सांगून आपण वाईस येऊन राहिले. बाजीराव साहेब यांस हातीं न घेतां दत्तविधान केलें हे भाऊचें नानाचें वाकडें येण्याचें कारण.

१ वैशाख शु॥ १३ सोमवार छ. १ जिल्कादी बाजीरावसाहेब यांस शिंदे यांणीं फौजेंत अटकाव करून चिमणाजी अप्पा यांस परशरामभाऊचें हावालीं केलें. त्याणीं जबरदस्तीनें पालखिंत घालोन पुण्यास आणिलें आणि त्रिंबकराव अमृतेश्वर आपटे यांस साता-यास पाठवून शाहूराजे याजपासून वस्त्रें व शिकेकटार आणिली आणि वैशाखवद्य ४ बुधवार छ. १७ जिल्कादी पुण्यांतील वाड्यांत दवलतराव शिंदे येऊन चिमणाजी अपा यांचे दत्तविधान जालें. दत्तविधानाचा शास्त्रार्थ महादेव दीक्षित आपटे व यज्ञेश्वर शास्त्री द्रविड यांणीं सांगितला. दत्तविधान जाल्यावर दरबार जाला. सारे सरदार, मुत्सद्दी, वकील जमा होऊन चिमणाजी माधवराव यांस पेशवाईची वस्त्रें दिल्हीं. चुलते असतां पुतणे यांस दत्तक दिल्हें हे चांगलें जालें नाहीं असें लोक बोलत होते. परशुरामभाऊ यांणीं च्यार लक्षांची जहागीर शिंदे यांस द्यावयाची ठरविली.