मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)

१८. विषय, काल व स्थल ह्यांच्यासंबंधानें ज्या दोन चार क्लृप्त्या पाश्चात्य इतिहासकारांच्या लेखांतून आढळण्यांत येतात व ज्यांचा पोरकट व क्षुल्लक अनुवाद इकडील कित्येक परभृत व परदेशाभिमानी लेखक वारंवार करतात, त्यांची व्यवस्था लाविल्यावर, आतां मुख्य प्रश्न जो इतिहासाचें वास्तव रूप त्याच्याकडे वळूं. वर सांगितलेंच आहे कीं, वर्तमानक्षणाच्या पाठीमागील गतकाळीं पृथ्वीवरील नव्या व जुन्या दरोबस्त सर्व समाजांच्या सर्व त-हांच्या उलाढालींची जी साद्यन्त व विश्वसनीय हकीकत, ती इतिहास होय. असला साद्यन्त व विश्वसनीय इतिहास पृथ्वीवरील कोणत्याहि भाषेंत अद्यापपर्यंत लिहिला गेला नाहीं. समाजाच्या साद्यंत चरित्राचा, हर्डर, हेल्मोल्ट, क्लेअर, रिडपाथ, वगैरे लोकांनीं असला इतिहास लिहिण्याचा यत्न केला आहे. परंतु, ह्यांपैकीं प्रत्येकाचा इतिहास त्याच्या त्याच्या स्वदेशाभिमानाच्या रंगानें चितारला गेल्यामुळें, इतर देशांतील इतिहासज्ञांच्या पसंतीस सहजच उतरत नाहीं. जो तो आपापला देश त्रिभुवनाचा केंद्र समजून, तत्प्रवण सर्व देशांचीं चरित्रें होत आहेत, असें चित्र काढण्याचा, नि: पक्षपातीपणाची प्रतिज्ञा करूनहि, प्रयत्न करीत असतो. ह्या स्वदेशाभिमानाखेरीज, प्रत्येकाचें कांहीं ना कांहीं तरी वैयक्तिक खूळ असतेंच. कोणी केवळ भूगोलदृष्ट्या, कोणी केवळ काळदृष्ट्या, कोणी शास्त्रदृष्ट्या, कोणी निव्वळ व्यापारदृष्ट्या, व कोणी स्वदेशसंस्कृतिदृष्ट्या जगाच्या इतिहासाची अजमावणी करीत असतात. अशी नाना प्रकारचीं व्यंगें ह्या इतिहासकारांच्या ग्रंथांत दृष्टीस पडतात. असा प्रकार असल्यामुळें, समाजाच्या चरित्राचें खरें स्वरूप काय, त्याचें केंद्र कोठें आहे, तें प्रागतिक आहे, किंवा अधोगतिक आहे, किंवा स्तब्ध आहे, वगैरे प्रश्नांचा जसा समाधानकारक निकाल लागावा, तसा लागत नाहीं. तेव्हां, वैयक्तिक मतें एकीकडे सारून व स्वदेशाभिमानाचा दर्प बाजूला ठेवून, हें काम केलें, तरच शुद्ध व विमल तत्त्व हस्तगत होण्याचा संभव आहे. हेल्मोल्ट म्हणतो त्याप्रमाणें, निर्लेप व निरंजन होऊन, इतिहासाचा विचार करूं जाणें, दुर्घट आहे, ह्यांत संशय नाहीं. परंतु, निरहंकारबुद्धीनें ब्रह्मविचार करण्यांत लीन होणारे जे आर्य ऋषि, त्यांच्या पद्धतीचें अनुकरण केलें असतां, ही दु:साध्य वस्तु प्राप्य होण्याचा संभव जास्त आहे, असे वाटतें.

१९. निलेंप व निरहंकारपणानें इतिहासाचा विचार करावयाला लागणें, ही इतिहासाचें खरें स्वरूप जाणण्याच्या मार्गाला लागण्याची पहिली पायरी आहे. ह्या मार्गाला लागण्याची दुसरी पायरी सर्वप्रकारचे अर्धवट ग्रह सोडून देणें, ही होय. उदाहरणार्थ, युरोपीयन इतिहासकारांचा आजवर असा एक ग्रह आहे कीं, मनुष्यसमाज एके कालीं रानटी स्थितींत म्हणजे वन्यावस्थेंत होता, आणि त्या अवस्थेंतून तो आस्ते आस्ते संस्कृत होत चालला आहे परंतु, हा समज सर्वस्वीं निराधार आहे. सर्व मनुष्यसमाज कोणच्याहि एकाकाळी रानटी स्थितींत होता, असा इतिहासाला मुळीं काळच आढळून आलेला नाहीं दक्षिण अमेरिकेंतील पाटेगोनियन लोक वन्यावस्थेंत आहेत, तर ब्रिटिश लोक बरेच संस्कृत होत चालले आहेत; ब्रिटिश लोक वन्यावस्थेंत आहेत, तर रोमन व ग्रीक लोक कांहींसे संस्कृत होत चालले आहेत; रोमन व ग्रीक लोक वन्यावस्थेंत आहेत, तर मिसर, असुर व बबुल लोक सुधारत चालले आहेत; बबुल लोक वन्यावस्थेंत आहेत, तर सुमेर व चिनी लोक मोठमोठीं नगरे वसवीत आहेत; चिनी लोक वन्यावस्थेंत आहेत तर आर्य लोक सुधारणेच्या शिखराला पोहोंचले आहेत असा प्रकार आढळून येतो. आर्य लोकांच्या वेदांना आर्यांच्या पूर्वस्थितीविषयीं विचारावयाला जावें तर ते सांगतात. की, उत्तर धुवाकडे म्हणजे मेरुपर्वताकडे दहा हजार वर्षांपूर्वी बर्फाचा मोठा प्रळय होऊन देव नांवाच्या पूर्वप्रलयीन लोकांची संस्कृति सफा बुडून गेली व त्यांतून सुदैवानें किवा दुर्दैवानें सुटून जीं हजार पाचशें माणसें निसटलीं त्यांनी आम्हांला वांचविलें. सारांश, हिमप्रळयाच्या पूर्वीहि कांहीं मनुष्यसमाज सुसंस्कृत होतेच व त्या कालींहि पश्चिम यूरोपांत कांही वन्यावस्थ मनुष्यसमाज होतेच. एकंदरींत, एखांदा सुसंस्कृत मनुष्यसमाज पृथ्वीच्या पाठीवर कोठें तरी सदोदित आहे व दुसरा कोणतातरी समाज त्या समाजाचा धागा धरून संस्कृतावस्थेंत येत आहे, अशी स्थिति पूर्वप्रलयीन कालापासून दृष्टीस पडते. विमानांतून अंतरिक्षांत गमन करणारे व सूर्यचंद्रादि तारालोकांत प्रवास करणारे हे देव भौतिक व आत्मिक संस्कृतीच्या पराकोटीला गेलेले होते, अशीं ह्या लोकांचीं वर्णनें सांपडतात विमानांतून गमन करण्याची व चंद्रशुक्रांची भेट घेण्याची हांव धरणारे प्रस्तुत कालीं देखील कांहीं शास्त्रज्ञ आहेत. तेव्हां, अखिल मनुष्यसमाज एके काळीं रानटी अवस्थेंत होता व पुढें आस्ते आस्ते तो संस्कृत होत चालला, हा समज टाकून देणें भाग आहे; आणि इतिहासाला माहीत असणा-या ह्या दहा पंधरा हजार वर्षांत मनुष्यसमाज कोठें ना कोठें तरी सुसंस्कृत असलेला आढळतो व ह्या सुसंस्कृत समाजाच्या बरोबरीला येण्याचा प्रयत्न पृथ्वीवरील इतर रानटी समाज एका पाठीमागून एक करीत आहेत, असा सिद्धान्त ग्रहण करणें अपरिहार्य होतें.