मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)

१६. हा प्रतिकोटिक्रम कित्येक लेखकांना मान्य आहे. परंतु त्यांच्या मतें, यूरोपीयन समाजाच्या एका अंगाचे म्हणजे बहिरंगाचेंच तेवढें हें वर्णन आहे. दुस-या अंगाचें म्हणजे अंतरंगाचें परीक्षण केलें असतां, प्रगतीचा जो बारीक धागा बिनतूट दिसून येतो, त्याच्याकडे लक्ष देण्यास हे लेखक विनंति करतात. ही विनंति कोणाहि सारासारविचारी मनुष्याला मान्य होईल. पण ती मान्य करतांना तो अशी प्रतिविनंति करील कीं, यूरोपीयन प्रगतीचा बारीक धागा शोधून काढावयास जसें अंतरंगाचें परीक्षण करणें जरूर आहे, तसेंच भारतीय व महाराष्ट्रीय प्रगतीचा बारीक धागा पहावयास अंतरंगाचीच परीक्षा केली पाहिजे. अंतरंगाची परीक्षा केली असतां त्यांना असें दिसून येईल कीं धर्म, नीति, सत्य व स्वास्थ्य, ह्यांच्याप्रीत्यर्थ भारतीय व महाराष्ट्रीय आर्यांचें आज आठ दहा हजार वर्षे प्रयत्न चालले आहेत आणि अधूनमधून होणारे दंगेधोपे व राज्यक्रांत्या हिंवाळ्यांतील अभ्राप्रमाणें क्षणमात्रावस्थायी आहेत. यूरोपांतील अनेक समाज परकीयांच्या अमलाखालीं होते व आहेत. परंतु, तेवढ्यावरून जगाच्या इतिहासांत केवळ अप्रागतिक म्हणून त्यांची गणना करण्याचें कोणी मनांत आणीत नाहीं. त्याचप्रमाणे महाराष्ट्राच्या इतिहासाची व परंपरेनें भारतवर्षाच्या इतिहासाची गणना प्रागतिकांत होणें अत्यवश्यक आहे. हाच न्याय पूर्वेकडील इतर कित्येक समाजांच्या इतिहासांनाहि कमजास्त प्रमाणानें लागू आहे.

१७. तात्पर्य, पृथ्वीवरील सर्व समाजांची जानपछान अखिल मानवजातीच्या इतिहासाला असली पाहिजे. जीं राष्ट्रें आज स्वतंत्र आहेत, त्यांतील इतिहासकारांनीं हें पक्कें ध्यानांत ठेविलें पाहिजे कीं, आजमित्तीस जीं राष्ट्रें परतंत्र दिसतात, त्यांच्या चरित्रांत स्वतंत्र राष्ट्रांच्याहि चरित्रांत दिसून येणार नाहींत अशीं प्रगतीचीं प्रौढ रूपें विद्यमान असण्याचा बळकट संभव आहे. प्रगतीचीं असलीं प्रौढ रूपें पूर्वात्य राष्ट्रांत असलेलीं यूरोपीयन इतिहासकारांच्या प्रत्ययास अलीकडील शंभर वर्षात आलेली आहेत. शंभर दीडशें वर्षांपूर्वी सर्व भाषांचा उगम हिब्रू भाषेंत असावा व पश्चिम यूरोपांतील इंग्रजी, फ्रेंच वगैरे भाषा फारच प्रौढ दशेप्रत पावलेल्या आहेत, असा समज यूरोपांत प्रचलित होता. परंतु, संस्कृत भाषेशीं जसजसा यूरोपीयन इतिहासकारांचा जास्त जास्त परिचय होत गेला, तसतसा हिब्रू भाषेशीं आंग्ल, फ्रेंच वगैरे भाषांचा कांहीएक संबंध नाहीं, आपलें मूळ आर्यभाषेच्या जवळपास कोठेंतरी आहे व आपल्या भाषांपेक्षांहि प्रौढतर भाषा आहेत, असा त्यांचा ग्रह झाला. हा समज कितपत खराखोटा आहे, हा प्रश्न अलाहिदा; परंतु, मानवसमाजाच्या भाषाविषयक इतिहासांत यूरोपीयन लोकांची समजूत ही अशी फिरली हें निर्विवाद आहे. असाच फेरबदल राजकीय, धार्मिक व सामाजिक बाबतींतहि होण्याचा फार संभव आहे भारतवर्षीय आर्यांच्या व विशेषतः महाराष्ट्रीयांच्या राजकीय, धार्मिक व सामाजिक इतिहासाचें अध्ययन जसजसें वाढेल, तसतसें प्लेटोप्रमाणें आधुनिक यूरोपीयन लोकांच्या असेंहि प्रत्ययास येईल कीं, आपल्यांतल्यापेक्षां उत्कृष्ट समाजव्यवस्था व उत्कृष्ट राजकीय हेतू जगतांतील कांहीं देशांत विद्यमान आहेत.