मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दुसरा ( १७१४-१७६१)

प्रस्तावना 

१७२२ च्या सप्टेंबरात निजामुन्मुलुखाचे सरदार अर्काटाकडे स्वारीस निघणार अशी बातमी आली. निजामाच्या पाठीवर शह देण्यास बाजीराव १७२२ च्या नोव्हेंबरांत अवरंगाबादेस गेला. तेथें ऐवजखानाचा पराभव करून स्वारी ब-हाणपुरास गेली. १७२३ च्या जानेवारींत बाजीरावाची हांडिया प्रांतांतील अनूपशिंगाशीं भेट जाहली. १७२३ च्या फेब्रुवारीत खुद्द निजामुन्मुलुखाची मुलाखत करून स्वारी बाधेलखंडाकडे गेली. तेथून १७२३ च्या जुलैंत साता-यास येऊन खंडेराव दाभाडे, फतेसिंग भोसले व चिमणाजी बल्लाळ ह्यांच्या साहाय्याला बाजीराव १७२३ च्या डिसेंबरांत गेला. १७२३ च्या डिसेंबरांत अंबाजीपंत पुरंधरे, मल्हारजी होळकर व राणोजी शिंदे व नंतर बाजीराव यांनीं माळव्यांत व बुंदेलखंडांत स्वारी केली. हैदराबादकर मोगलांनीं उत्तर व दक्षिण पाईन घाटांत गडबड केली, ती बंद करण्याकरितां १७२३ च्या सप्टंबरापासून १७२४ च्या जुलैपर्यंत खंडेराव दाभाडे, फत्तेसिंग भोसले व चिमणाजी बल्लाळ गुंतले होते. हैदराबादकर मोंगल कंबरजखान व निजामुन्मुलूख ह्यांचा युद्धप्रसंग १७२४ च्या पावसाळ्यानंतर सुरू झाला. ह्या प्रसंगी बाजीरावानें निजामाचें साहाय्य करून कंबरजखानाचा साखरखेडले येथें पराभव १७२४ च्या आक्टोबरांत केला. तेथून बाजीराव माळव्यांत जाऊन १७२५ च्या एप्रिलास साता-यास आला. १७२५ च्या सप्टंबरांत फत्तेसिंग भोसले, त्रिंबकराव दाभाडे, रघूजी भोसले, प्रतिनिधि व बाजीराव त्रिचनापलीपर्यंत कर्नाटकांत स्वारी करून १७२६ च्या मेंत परत आले. ह्या अवधींत चिमणाजी बल्लाळ व कान्होजी भोसले निजामावर चाल करून गेले. निजामानें शाहूच्या विरुद्ध संभाजी प्रतिनिधि वगैरेच्या मनांत विकल्प आणून युद्धाची तयारी केली होती. बाजीराव कर्नाटकांत गेला असें पाहून निजामानें हा डाव आरंभिला होता. परंतु शाहूने माळव्यांतून उदाजी पवार, कंठाजी कदम, पिलाजी गायकवाड ह्यांस फत्तेसिंग भोसले व चिमणाजी बल्लाळ ह्यांच्या साहाय्यास बोलाविलें व बाजीरावासहि परत येण्यास पत्रें पाठविली. १७२६ च्या सप्टंबरांत बाजीराव व खंडेराव दाभाडे पंढरपूरच्या रोखें निजामावर गेले. कान्होजी भोसल्याचा ऐवजखानानें बालाघाटांत पराभव केला. त्याच्या मदतीस चिमाजीअप्पा गेले. बाजीरावानें अवरंगाबादेकडून शह दिला. (का. सं. १६७ व १६९. ) निजामावरील ही स्वारी संपवून बाजीराव १७२७ जुलैंत साता-यास गेला. १७२७ च्या आगस्टांत बाजीराव पुन्हां निजामावर गेला. निजामाला अनेक झुकांड्या देऊन त्याचा पराभव बाजीरावानें १७२८ च्या फेब्रुवारीस पालखेड येथे केला. नंतर १७२८ च्या ६ मार्चास मुंगी येथे तह करून बाजीराव जुलैंत साता-यास आला. ह्या तहांत निजामुन्मुलुखाची व कोल्हापूरच्या संभाजीची कायमची फारकत झाली. १७२८ च्या आक्टोबरांत बाजीराव तुळजापुराकडे व खानदेशांत स्वारीस निघाला व चिमाजीअप्पा माळव्यांत दयाबहादरावर गेला. चिमाजीअप्पा माळव्यांतून १७२९ च्या मार्चांत परत आला व बाजीराव चिमाजीअप्पाच्या जागीं माळव्यांत गेला. बाजीरावानें अहमदखान बंगषाचा पराभव जैतपुरीं ३० मार्चास व कायमखा बंगष याचा पराभव ४ मे १७२९ रोजी केला व १७२९ च्या जुलैंत साता-यास परत आला. १७२९ च्या आक्टोबरांत चिमाजी गुजराथेंत व माळव्यांत स्वारीस निघाला, तो १७३० च्या मार्चांत ढवळकें लुटून पायागड घेऊन जुनांत देशी परत आला. १७२९ त खंडेराव दाभाडे वारला व सेनापतिपद त्रिंबकराव दाभाड्यास १७३० च्या जानेवारींत मिळाले. १७२९ च्या आगस्टापासून १७३० च्या फेब्रुवारीपर्यंत बाजीराव सुपें, पुणें वगैरे ठिकाणीं देशींच होता. १७३० च्या फेब्रुवारींत उंब्रजेस जाऊन कोल्हापूरकरांशीं लढाई वगैरे होऊन स्वारी आगस्टांत पुण्यास आली. १७३० च्या सप्टेंबरांत बाजीराव व चिमाजीअप्पा निजामुन्मुलूख व त्रिंबकराव दाभाडे यांजवर चालून गेले. १७३१ च्या फेब्रुवारींत दाभाड्याचा डभईस पराभव करून एप्रिलांत बाजीराव देशीं परत आला.