ते समई रावताची प्रधानकी काढून घोलपास दिल्ही. त्याजवर बारा मुलवे मिळोन हकिमाकडे गेले. नाईकजी नाईक मृत्य पावले. पुढे देशमुखी कोणी करावी, सिका कोणापासी ठेवावा, त्याची आज्ञा करावी. ते वेळेस मुलवियास आज्ञा केली की, नाईकजीची स्त्री आनसावा आहे, तिणे करावी. आनसावा गरोदर पाच महीनियांची आहे. कदाचित परमेश्वराने कृपा केली, पुत्र जाला, तरी उत्तम. नाहीतर आनसावाचा जीव आहे तोपरियंत सिका देशमुखी आनसावा करील. ते समई पुढे चौ महिनीयानें आनसावा प्रसूत जाली. पुत्र जाला. तरी त्याचे नाव कानोजी नाईक ठेविलें. त्यास दाईपासी ठेऊन त्याची राखण मुलवियाणीं करून वाढविले. आनसावाचे चौकीस राऊत व घोलप दोघेजण होते. तशामध्ये कान्होजी नाईक याचे पुत्र सातजण, त्यापैकी तिघेजण मृत्य पावले. चौघेजण होते त्याणीं जपणीस लागोन वरसा सा महिन्यानीं याने आनसावा मारिली व तिची कुणबीण व कुणबीणीचे पोर ऐसी तिघे जण मारिली. तयाच्या ध्यानांत काय की, आनसावा व कुणबीण व आनसावाचा पुत्र ऐसी तिघेजण मारिली. ऐसे समजोन राहिले. पुढे आनसावा मृत्य पावल्याने तर दिवाणाची बेमर्जी जाली की, तुह्मी इतबारी लोक, राऊत व घोलप याणी जाबसाल केला कीं, वादीयानीं मारली. यास उपाय काय ? त्यावरून हकीमानी रावताची जमीन सेत व घोलपाची जमीन सेत होती ती खालीसाखाली घातली. ते वेळेस कानोजी नाईक तावेस पासलकराजवळ होता. त्याचे खसमतीस दस माहला नाहवी, बाजीराव पासलकर याची कन्या सावित्रीबाई होती. ती वधू पाहून लग्न केले. तेरावे वर्शी कारीस आले. पुढे देशमुखीचा हकलाजिमा घेऊन सिका रोखा करू लागले. ते समई समस्त लोकानीं अर्ज केला की, दस माहला याणें आपली सखमत बहुत केली, यास काही बक्षीस दिल्हे पाहिजे. त्याजवरून दस माहला नाहवी यास नाईक मेहरबान होऊन मौजे आंबवडे इसापतीचा गाव त्यास सेत बक्षीस दिल्हे. त्याजवर कृष्णाजी नाइ्रकजी बांदल याणी येऊन, पुंडावे करून हिरडस मावल येथे खून मारे करून, आह्मासी सिवे निमित्य व दाइत्या निमित्य कटकट करून जुंझो लागले. ते समई कृष्णाजी नाईक बांदल याची स्त्री दिपावा याच्या पायात बेडी घालून ठेविली होती. आपण जुंझांत जात होते. तेव्हा कृष्णाजी नाईक साहवे जुंज दिल्हे. परंतु बांदलास येश प्राप्‍त जाले नाही. पुढे अणिकहि जुंझावयाची मसलत करू लागले. तेवहा कडतोपंताचे वडील होते. त्यास विचारले की आह्मी साहा वेळ जेधियास जुंझास गेलो, परंतु जेध्याचा मोड जाला नाही. पुढे कसे करावे, ते सांगणे. तेव्हा कडतोपंताचे वडील बोलिले की, दिपावाच्या पायांत बेडी घालून तुह्मी ठेविली तोपर्यंत तुह्मास यश येत नाही. तुह्मी दिपावाची बेडी तोडून सन्मान करणे. दिपावानी तुह्मास व सर्व लोकास वोवाळून लोकास आशीर्वाद दिल्हा ह्मणजे तुह्मास यश येईल. तेव्हा कृष्णाजी नाईक बांदल बोलिले की, तुह्मी सांगितले त्याप्रमाणे करितो. परंतु सांगितल्याप्रमाणे घडेना तरी कसें करावें ? तेव्हा कडतोपंताचे वडील बोलिले. यांत खोटे जाले तरी आह्मास शासन करावे, ऐसे बोलिले. त्याजवरून कृष्णा नाईक याणी दिपावाचे पायाची बेडी काढून, न्हाऊ घालून, पाटाव नेसावयास दिल्हा. दिपावा याणी पाटाव नेसोन, हाती पंचार्ती घेऊन नाइकास ओवाळिले, व सर्व लोकास बोवाळून आसिर्वाद दिल्हा की, तुह्मी जुंझास जाणे. तुह्मास येश येईल. परंतु तुह्मी निरापार न जाणे. निरेचे अलिकडेच जुंझावे. ऐसी दिपावाची आज्ञा घेऊन, कृष्णाजी नाईक बांदल याणीं सर्व लोक जमा करून कासारखिंडीस रणखांब रोऊन, जुंझावयास सोमवारचा करार केला. समागमे साडेबारासे लोक घेऊन कासारखिंडीस आले. ते समई जेधे याणींहि आपले सर्व लोक सातसे माणूस जमा करून रणखांबाजवळ आले. तेथे जेधे बांदल यांचे युध्द जाले. त्या युध्दांत जेधे याकडील लोक पडले. त्यांची नावनिसी तपसीलवार येणेंप्रमाणे :-