१ राऊत यास देशमुखाची १ कर्‍या
प्रधानकी दिल्ही होती तो १ ढेकापा
१ घोलप सांगवीकर १ नाईक रामराव
१ कोढालकर  १ खोचरा
१ गोडवला १ मुहुकर
१ पेटकर १ रोहमण
१ वाडकर  ६
३ कारकून मंडली लोहकरे कुलकर्णी
व सबनीस व देशपांडे परभू
 
एकूण आ ॥ ३  
 

सदरहू असामी पंधरा याणी क्रियाशफत केली. त्याजवर लोकास देशमुख ह्मणो लागले की, निचलाचे घरच्या लग्नावर चला. तेव्हां लोकानी आड घेतली की, आह्मांस कामे वाटून द्याल तरी आह्मी येतो; नाहीं तरी आह्मी येत नाही. तेव्हां बाजी नाईक बोलिले की, कोण कोण काय कामे करिता, तीं वांटून घ्या. तेव्हां पेटकर व लोहकरे व वाडकर याणीं खासे व राऊ सदरचे बसणार यास मारावे ह्मणोन करार केला, व गोडावला याणीं वोवर मारावी व रामाजी नाईक कोढालकर व राऊत व समस्त लोक याणीं मंडप व दरवाजा धरून जो कोणी येईल त्यास मारावे ऐसा करार करून, देशमुख व कृष्णाजी कोढालकर या उभयतास राइरेश्वरीं ठेवून वरकड लोक उतरून करणवडास आले. तेथे ज्याप्रमाणे करार होता त्याप्रमाणे ज्याची त्याणी कार्ये करून नेले. निचलाचे घरचे लग्न खोपडियाचे मारले. साठ माणूस ठार केले. याप्रमाणे तसनस लग्नाची करून राइरेश्वरास गेले. पुढें आठा पंधरा रोजांनीं मागतीं करणवडास येऊन श्रीहनुमंताचे गळां चिठी बांधली की, धावडीं बंदरीचा पुंड आपली दाद लागत नाही, यास्तव आपण किलियाचे पाइरीवर सीर ठेविले आहे. आपण धणी आहेत. दाद दिल्ही पाहिजे. त्याजवरून किले रोहिडा येथील हकीम शेख आखू रोहिले होते. त्याणी प्रेत्‍न करू लागले की, धावडी बंदर कोठे आहे ? तिचा ठिकाण कसा लागतो ? मुलुक पु.डावामुळे उजाड जाला, याचा शोध केला पाहिजे. तेव्हां त्याणी प्रेत्‍न करून धावडीबंदरीस बाजी नाईक याचे व बारामुलवे याचे ठिकाण लाऊन, त्यास रोहिडियास आणून, शेख आखू रोहील्याणीं जेधे व खोपडे याचा मजकूर मनास आणून वतन जेधे व खोपडे यास वांटून दिल्हें. जेधे याजकडे भोर ता। च्यार गाव देशमुखीचे वतन दिल्हे व खोपडे याजकडे उभवली ता॥ च्यार गाव देशमुखी वतन देऊन उभयतांची समजावीस केली. ते वेळेस गाव नावनिसी बितपलिस :-