कानदखोरें-मरळ देशमुख

लेखांक १

श्री.

''करीणा मौजे कारी ता। रोहिडखोरने येथील जेधियाणीं देशमुखीचें वतन मेळवीले ऐसीजे :- वडीलबंधू खेलोजी जेधा व धाकटा भाऊ बाजी नाईक जेधे उभयता बेदरास गेले; पाछायाची चाकरी येकनिष्ठपणे केली. जाबसाल यथास्थित जमेदारी प्रो। करून; कामकाजहि तयार ऐसे पाछायें पाहून, खुश होऊन मेहरबान होऊन, देशमुखीच्या देशमुखीच्या वतनाचे फर्मान व वस्त्रे देऊन, खेलोजी नाईक व बाजी नाईक यांची रवानगी केली. पाछाय फर्मान घेऊन बेदराहून निघाले, ते वाटेस येऊन सिरवळीं राहिले. तेथून पुढे त्याजबराबर माहार होता त्यास रवाना केले. तों खोपडीयांची व माहाराची भेट जाली. माहारानी बातमी खोपडीयास सांगितली की, जेधे याजवर पाछाह मेहरवान होऊन, फरमाणे देऊन रवाना केले; आज सिरवळीं राहिले आहेत. उदईक रविवारी येतील. ऐसे बातमीस कळले. यानंतर रवि प्रातःकाळी खोपडे निघोन जाऊन गोडखिंडीस बसले. रविवारी सिरवळचा बाजार भरत असे. तेव्हां खेलोजी नाईक व बाजी नाईक उभयतां निघोन गोडखिंडीस आले. ते खोपडेयाणी पाहून, तयार होऊन जाऊन, खेलोजी नाईक यास मारले. तसे बाजीनाईक यास मारावे, तों बाजी नाईक पळाले. त्याणी आपला जीव वाचविला. पुढे साह चहू महिन्यानीं बाजीनाईक याने प्रेत्‍न करून आपल्या पाठाराखा आ॥१२ मेलऊन, दुधभाताची क्रीया शफत इनाम बेलभंडार करून, करार मदार केला की, आगोंधर मुलेमाणसे थार्‍यास ठेऊन, मग येऊन कामकाज करावे ऐसे बोलून, बारामुलवे ज जेधे याणी मुलेमाणसे घेऊन धावडीबंदरीस गेले. तेथे मुलेमाणसे ठेऊन त्यांचा साह महिन्याची बेगमी करून तेथून निघाले, ते श्रीराइरेश्वरास येऊन राहिले. विचार करून लागले, पुढे कसें करावें ? खोपडे मारे केलियासिवाय आपला बंदोबस्त होत नाही ह्मणोन विचार करितात, तों दसवमाहला नाहवी याणी बातमी सांगितली की, खोपडियाचे लग्न मौजे करनवडे येथे निचलाचे घरी आले आहे, तेथे जाऊन कामकाज करावे. ह्मणोन दसमाहला न्हावी व गोडवला यास बातमीस पा।. त्याणी बातमी घेऊन आले. परंतु यास विश्वास पुरेना. तेव्हां दसमाहला व गोडवला याजबरोबर हटकरी दिल्हा, करारीची बातमी घेऊन या. तेव्हा त्रिवर्गानी जाऊन पकी बातमी घेऊन आले. त्या समयास जाऊन कामकाज करावे ऐसा निश्चय होऊन जावे, तों पुढे आगोधर पाठिंबा केला, याचे समाधान करावे. ह्मणोन देशमुख याणी दुधभात व बेलभंडार याची क्रीया केली की, वतन साधले त्यांत निमे तुमचे बारामुलवे याचे व निमे आमचे जेधियाचे, यांत अंतर करूं नये, ऐसी क्रिया केली. ते समईचे बारामुलवे यांची नावनिसी बितपसिल :-