Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

संस्कृत भाषेचा उलगडा

वरील सहा अंकांपैकी पहिल्या अंकीचा एकशेषसमास जो वयम् तो पूर्णपणे स्वार्थक आहे, त्यात परार्थाचा लवलेशही नाही. द्वितीयाकस्थ जो वयम् आहे त्यात त्वं व स: या परकीय व्यक्ती आलेल्या आहेत, सबब हा वयम् स्वार्थक यद्यपि किंचित् आहे, तत्रापि भूरित्वाने परार्थक आहे. पहिला वयम् नितांत स्वात्मैकनिष्ठ व परव्यावर्तक आहे. दुसरा वयम् केवळ स्वात्मैकनिष्ठ नसून परसमावर्तक आहे. या स्यात्मैकनिष्ठ व परव्यावर्तक वयम्ला पूर्ववैदिकभाषात आमहे असा शब्द असे व परसमावर्तक वयम्ला आमह् असा शब्द असे. आमहे या परव्यावर्तक ऊर्फ व्यावर्तक सर्वनामरूपाला यूरोपीयन भाषाशास्त्रज्ञ Exclusive First Personal Pronoun म्हणतील व आमह् या परसमावेशक किंवा समावर्तक रूपाला Inclusive First Personal Pronoun म्हणतील. Excluding others म्हणजे Exclusive व including others म्हणजे Inclusive असा माझा म्हणण्याचा आशय आहे. अनेकवचनी उत्तमपुरुषवाचक सर्वनामाचा मराठी, इंग्रजी व संस्कृत या भाषांत अन्यव्यावर्तक उपयोग असा करतात : कोणी एक ग्रंथकार किंवा संपादक म्हणतो, आम्ही ऐकितो म्हणजे मी संपादक ऐकितो

We hear म्हणजे I, editor, hear
वयम् श्रुणुम : म्हणजे अहं, ग्रथकार: शृणोमि

येथे ग्रंथकार, वजनदारीने बोलण्याकरता, मी + मी + मी + इ. इ.इ. अशी आपल्या स्वत:च्या मी ची संख्या वाढवून बहुवचनाने म्हणजे बहुमानाने आम्ही या रूपाचा प्रयोग करतो. हा प्रयोग अन्य व्यक्तींचा व्यावर्तक आहे. We (the speaker himself & others) beat the Germans येथे We मध्ये अन्य व्यक्तींचे समावेशन ऊर्फ समावर्तन आहे. म्हणजे इंग्रजीत We हा एक च शब्द व्यावर्तक व समावर्तक असे दोन अर्थ दाखवितो. मराठीत आम्ही हा शब्द अन्य व्यावर्तक आहे. अन्य व्यक्तींचा समावेश करावयाचा असल्यास, त्याकरता आपण हे सर्वनाम मराठीत योजतात. म्हणजे मराठीत व्यावृत्ती दाखवावयाची असता आम्ही व समावृत्ती दाखवावयाची असता आपण अशी दोन सर्वनामे आहेत. तोच प्रकार पूर्ववैदिक भाषात असे. अन्य व्यक्तींना वगळावयाचे असेल तेव्हा आमहे हे रूप योजीत व अन्य व्यक्तींना वगळावयाचे नसेल तेव्हा आमह् हे रूप योजीत. यजमान्, राजा व मी मिळून यज्ञ करतो असे म्हणावयाचे असले म्हणजे यजामह् हे परस्मै रूप योजीत आणि मी मोठा माणूस यज्ञ स्वत: करतो असे बहुमानाने स्वत:विषयी बोलावयाचे असले म्हणजे यजामहे हे आत्मने रूप योजीत. तात्पर्य, आमह् हे व्यावर्तक उत्तमपुरुषसर्वनाम आहे व आमहे हे समावर्तक उत्तमपुरुषसर्वनाम आहे. हा दाखला उत्तमपुरुषाच्या अनेकवचनाचा झाला. द्विवचनाचाही ऊह असाच करता येतो.