Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
संस्कृत भाषेचा उलगडा
३४ या पाचही सर्वनामांच्या रूपाचा आता समाजदृष्टया अर्थ करू. पुरातनकाळी प्राचीन रानटी आर्यपूर्वजांचे दोन मोठमोठे समाज होते. एक समाज उपसर्ग लावून उत्तममध्यम पुरुषसर्वनामांची रूपे बनवी व दुसरा प्रत्यय लावून रूपे बनवी. प्रत्ययी समाजात हम्, हन्, अहम्, हमहम् व अहिम अशी पाच सर्वनामे योजणारे पाच पोटसमाज होते. पैकी अह्मि सर्वनाम योजणारा पोटसमाज सर्वात जुना. अह्मि समाजाच्या भाषेतील अहम्मि एवढे एकच रूप प्राकृतात राहिलेले अवशिष्ट दिसते. अह्मिसमाजाहून अर्वाचीन ह्मह्मसमाजाचा समकालीन हन् समाज. हन् समाजाच्या भाषेतील नौ व न: ही दोन रूपे प्राकृतात व वैदिकात आलेली आहेत. अह्मिसमाज, मह्मिसमाज, अह्मसमाज व हन् समाज सर्वनामरूपे प्रत्यय लावून बनवीत. ह्मसमाजही प्रथम इतर चार समाजांप्रमाणे सर्वनामरूपे प्रत्यय लावूनच बनवी. परंतु त्या समाजातील एका मोठ्या पोटसमाजाने उपसर्ग लावून रूपे बनविण्याचा प्रघात पाडला. हा प्रघात बहुश: इतर अनार्यसमाजाच्या घर्षणाने पडलेला असावा. त्यामुळे ह्मसमाजाचे दोन मोठमोठे विभाग झाले, एक विभाग उपसर्गी सर्वनामरूपे योजी व दुसरा समाज प्रत्ययी रूपे योजी. कालान्तराने उपसर्गी ह्मसमाज, प्रत्ययी ह्मसमाज व प्राचीन हन् समाज यांचे पुन: एकीकरण झाले व तिन्ही समाजांच्या भाषेतील सर्वनामरूपांची भेसळ होऊन संमिश्र वैदिकसमाजाची संमिश्र सर्वनामरूपे प्रचलित झाली. त्या संमिश्र वैदिकभाषेपासून पाणिनीय संस्कृत भाषा निघाली. असा हा भाषेचा एक ओघ झाला. अह्मि, हमहम व अह्मसमाज उरले. त्यांचे मिश्रण होऊन त्यांचा दुसरा एक भाषेचा व समाजाचा ओघ झाला. या दुसऱ्या संमिश्र ओघाच्या भाषेत उपसर्गी रूपे नाहीत सर्व रूपे प्रत्ययी आहेत. या दुसऱ्या ओघाच्या भाषेचे व पहिल्या ओघाच्या भाषेचे मिश्रण पाणिनीकालापर्यंत झाले नाही. या दुसऱ्या ओघापासून म्हणजे अहिमसमाज हमहमसमाज व अहमसमाज यांच्यापासून प्राकृतभाषा म्हणून ज्यांना म्हणतात त्या भाषा निघाल्या. ह्मसमाजाइतके म्हणजे वैदिकसमाजाइतके हे प्राकृत समाज महत्त्वाला व प्रतिष्ठेला पोहोचलेले नव्हते. वैदिक भाषा ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य या त्रैवर्णिकांची. या त्रैवर्णिकाहून जे कोणी इतर तत्कालीन आर्यवंशीय लोक होते व ज्यांची संस्कृती त्रैवर्णिकांच्या संस्कृतीहून कमतर होती त्यांची भाषा म्हणजे अह्मिभाषा, हमहमभाषा व अह्मभाषा, ज्यांना पुढे प्राकृत हे नाव संस्कृत या शब्दाच्या अपेक्षेने मिळाले. तात्पर्य, प्राकृतभाषा या वैदिकभाषेच्या समकालीन असून, वैदिक भाषेच्याप्रमाणेच त्यांची वंशपरंपरा अत्यंत प्राचीन आहे. इतकेच नव्हे, तर वैदिकभाषा जशी उपसर्गी व प्रत्ययी भाषांच्या भेसळीने शबल झाली तशी प्राकृत भाषा शबल झालेली नाही. तिची शुद्धता अत्यंत प्राचीनतम काळापासून आतापर्यत जशीची तशी अकलुषित आहे. या अकलुषिततेचे व शुद्धतेचे मुख्य कारण प्राकृत समाजाचा मागासलेपणा होय. वैदिक समाज बहि:समाजाच्या घर्षणाने प्रज्ज्वलित होऊन प्रगतिप्रवण व वैभवसंपन्न झाला. ते वैभव व ती प्रगती मागासलेपणामुळे प्राकृतांना अनुभवता आली नाही. वरील इतिहासावरून स्पष्टच झाले की, प्राकृतभाषा वैदिक किंवा संस्कृत भाषांचे तत्त्वत: अपभ्रंश नाहीत. संस्कृत संपन्न झाल्यावर संस्कृतातील शब्द प्राकृत भाषा आपल्या उच्चारांच्या धर्तीवर आपल्यात सामील करून घेतात. यादृष्टीने प्राकृत भाषांतील शब्दांना संस्कृत शब्दांचे अपभ्रंश समजणे रास्त आहे. परंतु प्राकृत भाषा वैदिक किंवा संस्कृत भाषांपासून अपभ्रष्ट होऊन निघाल्या; या म्हणण्यात इतिहासदृष्ट्या बिलकूल जीव नाही.