ना व नी, नु व नो यांच्या जोड्या आहेत. रुध्नामि-रुध्नीव: आणि साध्नोमि-साध्नुव: अशा जोड्या आहेत. पूर्ववैदिक काली रुध्नीमि रुध्नीव: रुध्नीम: प्रमाणेच रुध्नामि रुध्नाव: रुध्नाम: अशी निरनिराळ्या पोटभाषात रूपे असत. मिश्रण झाल्यावर एका भाषेतील रुध्नामि दुसऱ्या भाषेतील रुध्नीव: आणि तिसऱ्या भाषेतील रुध्नन्ति अशी तिन्ही भाषेतील रूपे मिश्र भाषेत आली. हाच न्याय साध्नोमि साध्नुव: या रूपांना किंवा तृणेह्मि तृंह्व: या रूपांना लावावा. निरनिराळ्या पूर्ववैदिक भाषांत निरनिराळीं यङ् व यङ्लुक यांची अंगें असत व त्या भाषांत अनुनासिक ग्रहणाचे प्रकार भिन्नभिन्न असत. त्यामुळे एकच धातू पूर्ववैदिक भाषांत निदान सोळा प्रकारांनी तरी चालत असे. म्हणजे निदान सोळा निरनिराळ्या पूर्ववैदिक पोटभाषा असत व एकच धातू त्या निरनिराळ्या तऱ्हांनी चालवीत. या विधानाला प्रत्यन्तर खुद्द पाणिनीचा धातुपाठ व अष्टघ्यायीच आहे. एकच धातू निरनिराळ्या गणांत खुद्द पाणिनीनेच गणिले आहेत. उदाहरणार्थ, स्तंभ्, स्तुंभ्, स्कंभ्, स्कुंभ्, स्कु इत्यादी धातू पाणिनीच्या मते श्नविकरण जसे आहेत तसेच श्नुविकरणही आहेत म्हणजे नवव्या गणातले जसे आहेत तसेच पाचव्या गणातले आहेत. दोन्ही गणात चालविले तरी अर्थात बदल नाही एकच धातू पाच पाच सहा सहा गणात असलेलाही धातू पाठात आहे उदाहरणार्थ, विद् धातू, विद्यते ४) वेत्ति, २) विन्ते, ७) विन्दते, १) विन्दति, ६) अशा पाच गणात हा धातू चालतो, अर्थात बिलकुल बदल नाही. धू धातू धवति १) धुनोति, ५) धुनाति ९)धुवति ६) धृनयति १०) अशा पाच गणात चालतो. अशी आणिक कितीतरी उदाहरणे देता येतील. एकच धातू अनेक गणात चालतो, याचा अर्थ इतकाच की एकच धातू पूर्ववैदिकभाषात अनेक तऱ्हांनी चालत असे. पुढे सर्व भाषा एक झाल्यावर मिश्र भाषेत सर्व भाषांतील थोडथोडा मासला आला.
तात्पर्य, रुधादिगण व क्रयादिगण यातील धातूही साधे नाहीत, इतर गणातल्याप्रमाणेच सनन्त, यङ्, यङ्लुक् इत्यादी मधून संक्षेप होऊन आलेले आहेत.
Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Published in
संस्कृत भाषेचा उलगडा