५८ (५) स्वादिधातू व तनादिधातू : स्वादिधातूंना श्नुविकरण अशी संज्ञा पाणिनीने दिली आहे. कारण नु हे विकरण लागते अशी पाणिनीची समजूत होती. खरा प्रकार अगदी निराळा होता ह्न स्वादिवर्गातील व तनादिवर्गातील एकूणएक धातू मूळचे न्यान्त व वान्त होते. म्हणजे,
सुन्व् आप्न्व्
धिन्व् चम्न्व्
कृण्व् शक्न्व्
पृन्व् तिक्न्व्
(तन्+न्व्) तन्न्व् सध्न्व्
कर्व् कुर्व्
असे होते. भ्वादिगणात धिन्व् व कृण्व् हे धातू घालून ते धिनोति व कृणोति असे तनादिप्रमाणे व स्वादिप्रमाणे चालतात म्हणून पाणिनी सांगतो. धिन्विकृण्व्योर च. श्रु चीही गणना भ्वादींत करून त्याला श्रृ आदेश होतो व श्नु प्रत्यय लागतो असे पाणिनी सांगतो. श्रुव: शृ च. पाणिनीच्या काळी घिनोति असे रूप समाजात प्रचलित होते. तेव्हा स्वादिगणात हा धातू पाणिनीने घालावयाचा, तो तसा न घालता भ्वादिगणात काय म्हणून घातला? तर, दिधिन्व, धिन्विता, अधिन्वीत् या रूपात धिन्व् हे अंगे दिसते म्हणून, धिवि ह्न धिन्व् असा धातू पाणिनीनें धरला. परंतु धिन्वा म असे रूप भाषेत पाणिनीकाली उपलब्ध नव्हते, सबब धिन्व् पासून धिनोमि रूप कसेतरी बनविण्याकरता, व्लोप, अगागम, अग्लोप, उगागम इतकी चार कार्ये सांगावी लागली. वस्तुत: उच्चारशास्त्रदृष्ट्या स्थिती अशी होती, धिन्व् असा धातू होता. त्याला मि प्रत्यय लागला. धिन्व्मि अशी स्थिती झाली. उच्चारावयाला अवघड पडू लागले, सबब व् चा ओ होऊन धिनोमि असा उच्चार झाला. धिन्व् अधिक वस् = अधिन्व्वस् = धिन्व: असे रूप होई किंवा व् चा उ होऊन धिन्व् + वस् = धिनुव: असे रूप होई. धि हा धातू स्वादिगणात घालून, तो सार्वधातुकात धिन्व् चे काम करतो, असे पाणिनीने म्हटले असते तरी काही बिघडले नसते किंवा आर्धधातुकात धि चे काम धिन्व् करतो, असे म्हटले असते तरीही चालले असते. परंतु हा सर्व चालाचालीचा मामला झाला. खरा प्रकार काय होता? धिन्व् असा पूर्ववैदिक धातू होता व चा उच्चार व, ओ किंवा उ करून त्याची धिन्वामि, धिनोमि व धिनुमि अशी तीन रूपे तीन पोटसमाजात बोलत. त्यांचें मिश्रण होऊन धिनोमि, धिनुव:, दिधिन्व ही रूपे पाणिनीयकाली प्रचलित झाली. तात्पर्य, स्वादिगणातील व तनादिगणातील सर्व धातू मूळचे वान्त आहेत व मधील अ आम्ही उच्चारसुखार्थ योजिला आहे. येथे कोणी असे विचारील की कृ ची व्यवस्था काय व कशी लावता? तर पूर्ववैदिककाली कर्व्, कुर्व् असे दोन धातू असत. कर्व् + मि = करोमि, कुर्व् + वस् = कुर्व्व: = कुर्व: कुर्व् + अन्ति = कुर्वन्ति, अकर्व् + अम् = अकर्वम् = अकरवम्. इ.इ.इ. वैदिककाळी १) कर्मि, २) करामि, ३) कृणोभि, ४) करोमि, अशा चार प्रकारांनी हा धातू चाले म्हणजे भ्वादि, अदादि, स्वादि व तनादि या चार गणातल्याप्रमाणे हा धातू चाले. एक च धातू चार गणात चालतो याचा अर्थ काय? याचा अर्थ असा की, हे पाणिनीय गण जे आहेत ते पाणिनीने अडाणीपणाने वरवर पाहून पाडलेले आहेत. वस्तुत: चर्कर्मि पासून कर्मि; चर्करामि पासून करामि, कृण्व् पासून कृणोमि व कर्व्पासून करोमि अशी रूपे पूर्ववैदिककाळी बनत असत. शिवाय कृमि असेही एक पाचवे रूप बनत असे. हे पाचवे रूप तर फारच जुनाट आहे. इतके जुनाट आहे. इतके जुनाट की, त्याच्या अगोदरचे दुसरे जुनाट रूप नाही. म्हणजे कृमि या रूपाच्या अगोदर भाषा केवळ अप्रत्यय होती. एकूण निर्णय असा की, स्वादिगणातील व तनादिगणातील सर्व धातू व कृ धातू हे वस्तुत: भ्वादिगणातील असून वान्त आहेत.