वच् : वक्ति, वाचयति, वचति, विवक्ति, वोचंति, अवोचत्, उच्यते इत्यादी अंगे या धातूची येतात. पैकी (वच् + ति) वक्ति हे साधे रूप. मूळ दोन धातू वच व उच्. वच् चे यङ्लुक् वावच्. वावच् पासून वचति, वावचीति पासून वाचयति. उच् चे यङ्लुक् ओओच् पासून वोच् (अवोचत् वोचंति, वोचे इ.इ.) तात्पर्य, वच् ह्न वक्ति हे रूप तेवढे साधे. बाकी रूपे यङ्लुक् ची वगैरे आहेत. वच् धातूला कित्येकांच्या मते अनेक वचन नाही, कित्येकांच्या मते लट् ची अनेक वचने नाहीत व कित्येकांच्या मते लट् च्या प्रथमपुरुषाचे अनेक वचन तेवढे नाही. या विशेषाचा विचार पुढे करू.
अद् : लिट्, लुङ्, सन्, यात अद् धातूच्या बदली घस् धातूची रूपे येतात. अद् हा साधा धातू आहे.
चक्ष्, चकास् (कास्) अक्ष् (घस्), जागृ (गृ), दरिद्रा (द्रा), दीधी, वेवो, इत्यादी धातृ अभ्यस्त आहेत हे त्यांच्या आकारावरूनच दिसत आहे. लङ् मध्ये हे धातू उस् प्रत्यय घेतात, हीही यांच्या अभ्यस्तत्वाची खूण आहे.
या, ख्या, दा, इत्यादि आदन्त धातू : यांना साधे म्हटले असता चालेल. परंतु लङात हे धातू उस् प्रत्यय विकल्पाने घेतात. त्यावरून दिसते की अयु:, अख्यु:, अदू: ही रूपे लिटांतील ययु:, चख्यु:, ददु:, या रूपांचे आक्षेप आहेत. तात्पर्य, येथे लिट् ची भेसळ आहे.
हन् : सार्वधातुकात हन् धातू साधा समजण्यास हरकत नाही. एका ठिकाणी मात्र तो साधा नाही. जहि हे रूप जुनाट यङ्लुक् चे स्वच्छ आहे. आर्धधातुकात घन्, धातू, वध् इत्यादी धातू हन् च्या बदली येतात.
मृज् : मामार्ज्मि व मामृज्व: या यङ्लुक् रूपांचे अपभ्रंश मार्ज्मिव मृज्व: आहेत. पैकी मृज्व: हे रूप साधेही समजण्यास हरकत नाही.
वश् : वश् व उश् अशी याची दोन अंगे आढळतात. दोन्ही स्वतंत्र साधे धातृ समजण्यास हरकत नाही.