या अशा दोन तऱ्हा दोन निरनिराळ्या प्रत्ययमालांनी क्रियापदांची वर्तमानकालीन रूपे बनविण्याच्या, वैदिककाली व पाणिनीयकाली असत. या दोन्ही तऱ्हेच्या रूपमालांचा अर्थ मात्र एक नसे, एका रूपमालेच्या अर्थाहून दुसऱ्या रूपमालेचा अर्थ एका बाबीत भिन्न असे. उदाहरणार्थ, पचामस् व पचामहे ही दोन रूपे घेऊ व यांच्या अर्थात कोणता फरक आहे ते पाहू. पचामहे या रूपाचा अर्थ ''आह्यीं स्वत:करिता (अन्न) शिजवितो'' असा पाणिनीयदृष्ट्या आहे आणि पचामस् या रूपाचा अर्थ ''आह्यीं दुसऱ्याकरिता (अन्न) शिजवितो'' असा पाणिनीयदृष्ट्या आहे. पचामहेचा अर्थ आत्मनिष्ठ आहे व पचामस् किंवा पचामह्चा अर्थ परनिष्ठ आहे. पचामहेला पाणिनी आत्मनेपद म्हणतो व पचामह्ला परस्मैपद म्हणतो. पचामहे व पचामह् या रूपात आत्मनिष्ठा व परनिष्ठा हे अर्थ कोणत्या अवयवांचे ? मूळ धातूचे की प्रत्ययाचे ? मूळ धातू पच् आहे व त्याचा अर्थ शिजविणे असा आहे या अर्थात स्वार्थ किंवा परार्थ याचा गंधही नाही. तेव्हा स्वार्थ किंवा परार्थ जर कोठे आहे तो हुडकावयाचा असेल तर तो धातूला लागणाऱ्या भिन्न प्रत्ययात शोधला पाहिजे हे उघड झाले. प्रत्यय आमहे व आमह् असे आहेत. अर्थात, आमहे प्रत्यय स्वार्थ दाखवितो व आमह् प्रत्यय परार्थ दाखवितो. शोधाची व पृथक्करणाची येथपर्यंत मजल आल्यावर, पुढे पाऊल टाकण्यापूर्वी एक बाब लक्षात घेतली पाहिजे. ती ही की आमहे व आमह् हे प्रत्यय पुरुषवाचक आहेत व उत्तरभाषेत ज्यांना आपण प्रत्यय म्हणून ओळखितो ते प्रत्यय पूर्वभाषेतील संपूर्ण शब्दांचे कधी कधी अपभ्रंश असतात किंवा कधी कधी पूर्वभाषेतील शब्द सबंधचे सबंधच प्रत्यय म्हणून उत्तरभाषेत जसेच्या तसे उतरतात. यादृष्टींने पहाता ! आमहे व आमह् हे वैदिक पुरुषवाचक प्रत्यय पूर्ववैदिकभाषेतील पुरुषवाचकसर्वनामशब्द आहेत असे मानणे शक्य होते व हे मानणे भाषाशास्त्र संमत आहे. तेव्हा आमहे व आमह् ही पूर्ववैदिकभाषेतील उत्तम मध्यम उत्तमपुरुषवाचकसर्वनामाची प्रथमेची अनेकवचने आहेत, असे धरून काही काळ चालले असता त्यात काही बिघडण्यासारखे नाही. पैकी आमहे सर्वनामरूप स्वार्थी आहे व आमह् रूप परार्थी आहे. स्वार्थी आहे व परार्थी आहे म्हणजे काय? हा प्रश्न सोडविण्याला वयम् या शब्दाच्या अर्थाची किंचित विचक्षणा करणे जरूर आहे. वयम् शब्द सामासिक असून तो खालील पृथक् शब्दांचा एकशेष आहे :
