३९ पुरुषवाचकसर्वनामांचे येथपर्यत जे पृथक्करण केले त्यात उत्तमपुरुष वाचक हम्, हन्, हन्,हम्, अहम् व अहिम अशी पाच सर्वनामे आली, मध्यमपुरुषवाचक तुहम् सर्वनाम आले व प्रथमपुरुषवाचक त्य व त ही दोन सर्वनामे आली. ही आठ सर्वनामे वैदिकभाषा व वैदिकभाषा निकटवर्ती पूर्ववैदिकभाषा यात आढळून येतात. या आठही सर्वनामांहून निराळ्या स्वभावाची अशी आणिक काही सर्वनामे पूर्ववैदिकभाषेहून अत्यंत जुनाटातल्या जुनाट भाषेत प्रचलित असत असे अनुमान वैदिकभाषेतील क्रियापदांच्या रूपांवरून करता येते. वैदिकभाषेत क्रियापदे दोन तऱ्हांनी चालत. त्या दोन तऱ्हा कोणत्या त्या, पच् हा धातू उदाहरणार्थ घेऊन, दाखवितो :
क्रियापदांच्या रूपसिद्धी संबंधाने येथे एक बाब प्रथम सांगितली पाहिजे. ती ही की, वैदिकभाषेत क्रियापदांची रूपसिद्धी धातूला पुरुषवाचक प्रत्यय लावून होते. पच् हा मूळ धातू. याला खालील प्रत्यय लागून वरच्या दोन तऱ्हांतील रूपे बनतात.