३७ सादि प्रत्यय त्य या पूर्ववैदिक शब्दापासून निघालेले आहेत. त्य या शब्दाचा अर्थ संबंध. त चा स पूर्ववैदिकभाषेत सडकून होई. म्हणजे पूर्ववैदिककाळी त्य चा उच्चार कित्येक लोक स्य करीत व कित्येक लोक त्य करीत. स्येन, स्या, स्ये, स्यै, स्यास्, स्यस्, स्य, स्यत्, स्योस्, स्याम्, स्यस्, स्यि, स्यौ, स्यु, ही सर्व त्य = स्य पासून निघालेली रूपे आहेत. स्मै, स्मात्, स्म स्मिन्, ही रूपेक स्यै, स्य, स्यात्, स्यिन् या रूपांचे अपरपर्याय आहेत. स्येन, स्या यांचा अर्थ करण. स्ये, स्यै, स्मै यांचा अर्थ संप्रदाय; स्यत्, स्मात्, स्यस्, स्यास्, स्येस्, स्योस् यांचा अर्थ अपादान; स्य, स्यस्, स्येस्, स्योस्, स्म, स्याम् यांचा अर्थ संबंध; स्यि, स्मिन्, स्यौ, स्यु यांचा अर्थ अधिकरण. त्य= स्य या शब्दाला इन, ऐ, एस्, स्, आम्, उ, इन्, आस, अत् इत्यादी प्रत्यय लाविले म्हणजे स्येन, स्या, स्यै इत्यादी रूपे सिद्ध होतात. स्येन प्रत्यय स्य ऊर्फ त्य ला इन प्रत्यय लागून बनतो, येथपर्यंत तर्क बांधता येतो. परंतु, स्य ला लागणारे इन, आ, ऐ, अत्, अस् हे प्रत्यय कोणत्या पूर्ववैदिकभाषेतून कसे आले या बाबींच्या पुढे तर्क खुंटतो. त्य हा शब्द स्वत:च वैदिकभाषेत प्रत्यय बनलेला दृष्टीस पडतो. इह+त्य = इहस्य. इहत्यं म्हणजे इहसंबंधक. त्य हा विभक्तीप्रत्यय झाल्यावर त्याला लिंग किंवा वचन यांचे प्रत्यय सहजच लागतनासे झाले. सर्व+त्य =सर्वस्य याचा अर्थ सर्वसंबंधक. सर्व शब्द स्त्रीलिंगी चालवावयाचा असे त्यावेळी त्याला स्य हा प्रत्यय न लागता स्यास् प्रत्यय लागे. सर्व+स्यास् = सर्वस्या: म्हणजे सर्वा या स्त्रीलिंगी शब्दाच्या संबंधक. नपुंसकलिंग सर्वस्य असेच पुल्लिंगाप्रमाणे होई.
स्य किंवा स्यास् प्रत्यय ज्या शब्दाच्या पुढे येतो तो शब्द पुल्लिंगी किंवा स्त्रीलिंगी आहे हे त्या प्रत्ययावरून कळते. स्य किंवा स्यास्च्या पुढील शब्दाच्या लिंगवचनांचे दर्शक हे स्य किंवा स्यास्, प्रत्यय नाहीत. म्हणजे स्य किंवा स्यास्, प्रत्यया विशेषणे नाहीत. तेव्हा, मराठी चान्त विशेषणे संस्कृत किंवा वैदिक स्य किंवा स्यस् किंवा स्यास् प्रत्ययांचे अपभ्रंश असणे शक्य नाही. त्य:, त्या, त्यम् अशी तिन्ही लिंगे ज्या पूर्ववैदिक व वैदिक शब्दाची होत असत त्या त्याशब्दापासून मराठीचा, ची, चे हे शब्द निघालेले स्पष्ट दिसतात. इतकेच की, वैदिक स्य, स्यस्व स्यास् प्रत्ययांची खाण व मराठीचा, ची व चे शब्दांची खाण पूर्ववैदिक त्य हा शब्द आहे. त्य हा शब्द वैदिक भाषेत प्रत्यय बनला. परंतु मराठी ज्या पूर्ववैदिक भाषेपासून निघालेली आहे तीत त्य हा शब्द स्वतंत्र तिन्ही वचनी व तिन्ही लिंगी चालणारा होता.