(१) पाणिनी जिला प्रथमा म्हणतो तिला विभक्तीचे प्रत्यय नाहीत, फक्त वचनाचे उपसर्ग किंवा प्रत्यय आहेत. उपसर्गी भाषेत स्, स् + स् व स् + स्+स्, हे उपसर्ग शब्दांच्या पाठीमागे लागतात आणि प्रत्ययी भाषेत शब्दांच्या पुढे लागतात. हे उपसर्ग किंवा प्रत्यय लागून एकवचन, द्विवचन व त्रिवचन यांची जी रूपे साधतात त्यांना द्वितीयेपासून विभक्तीप्रत्यय लागतात. हम् सर्वनामाला अजन्त व हलन्त शब्दांच्याप्रमाणेच स् लागतो, परंतु तो उपसर्ग म्हणून लागतो, प्रत्यय म्हणून लागत नाही.
(२) अजन्त व हलन्त शब्दांप्रमाणे म् हा प्रत्यय हम् सर्वनामाच्या प्रथमेच्या वचनरूपांना लागून द्वितीयेची रूपे साधतात.
(३) येथून पुढे जे तृतीयादी विभक्तीचे प्रत्यय आहेत त्यांचे दोन मोठे वर्ग पडतात. एक मादिप्रत्ययांचा व दुसरा सादिप्रत्ययांचा. हम् सर्वनामाला लागणारे मादिप्रत्यय प्रथम विचारास घेऊ. तृतीयेचे भ्याम् व भिस् अजन्त व हलन्त नामांना जे लागतात तेच हम् ला लागतात. चतुर्थी एकवचनी सादिप्रत्यय न लागता, भ्य व भ्यस् हे भादिप्रत्यय हम् ला लागतात. चतुर्थी व पंचमी यांच्या द्विवचनी भ्याम् साधारण आहे. चतुर्थी अनेकवचनी भ्यस् व लागता भ्यस् लागतो. म्हणजे एकवचनी भ्यत् हा एकच प्रत्यय लागतो. तृतीयेच्या एकवचनाचा सादि स्या प्रत्यय धरलेला आहे तो भ्या धरला तरी काम भागते. भ्या= या = या = आ. स्या = या = या = आ. ज्याअर्थी तृतीया, चतुर्थी व पंचमी यांचे सर्व प्रत्यय स्या या प्रत्ययाखेरीज करून मादि आहेत, त्याअर्थी तृतीया एकवचनाचाही प्रत्यय भ्या मानावा असा मनाचा कल होतो. तात्पर्य, तृतीया, चतुर्थी व पंचमी यांच्या तिन्ही वचनी हम् सर्वनामाला भादि प्रत्यय लागतात. शिवाय, पंचमीच्या अनेक वचनीं भ्यन्त: व स्वन्त: हे दोन आणिक भादि प्रत्यय लागत. सादि प्रत्यय पहाता षष्ठीच्या एकवचनी स्य प्रत्यय लागून, आणीक स्म प्रत्यय लागतो. षष्ठीच्या अनेकवचनी स्याम् प्रत्यय लागून शिवाय स्यम् प्रत्यय लागे आणि सप्तमीच्या एकवचनी स्यि प्रत्यय लागून, शिवाय स्मिन् प्रत्ययही लागे. षष्ठी व सप्तमी यांच्या द्विवचनी सर्वसामान्य स्योस् प्रत्यय व सप्तमीच्या त्रिवचनी सर्वसामान्य स्यु प्रत्यय लागत. एकंदर प्रत्यय पहाता, स्त्रीलिंगी व नुपंसकलिंगी प्रत्यय येथे एकही नाही. सर्व प्रत्यय पुढे ज्याला पुल्लिंग म्हणू लागले त्याचे आहेत. म्हणजे भाषेत स्त्रीलिंग व नपुसकलिंग व अर्थात पुल्लिंग या लिंगकल्पना उद्भवण्यापूर्वी हम् या सर्वनामाचीं रूपे बनलेली आहेत.