या दुहेरी वागणुकीचा अर्थ काय? अर्थ असा की, पूर्ववैदिकसमाजात एक समाज मति शब्द पुल्लिंगी मानी आणि दुसरा समाज स्त्रीलिंगी मानी. दोन्ही समाज एकवटल्यावर कोणी पुल्लिंगी रूपे योजीत व कोणी स्त्रीलिंगी रूपे योजीत. अशा स्थितीत वैदिकभाषा उत्पन्न झाली आणि ती भाषा बोलणाऱ्या वैय्याकरणाना दोन दोन रूपे वापरण्यात असलेली जी साक्षात आढळली ती त्यांनी प्रामाणिकपणे नमूद करून ठेविली. जुनाटभाषेच्या पहिल्या थरांत लिंगभेद नव्हता व लिंगभेददर्शकप्रत्ययही नव्हते. पुढे व्यक्ती स्त्री आहे की पुरुष आहे हे यद्यपि कळू लागले तत्रापि हा भेद प्रत्ययांनी दाखविण्याची युक्ति सुचली नव्हती. नंतर स्वतंत्र पुंप्रत्यय व स्त्रीप्रत्यय निर्माण झाले. तेव्हा कोणता शब्द पुं व कोणता स्त्री मानावा या संबंधाने निरनिराळया समाजाची निरनिराळी मते पडून एकच शब्द एका समाजात पुल्लिंगी तर दुसऱ्या समाजात स्त्रीलिंगी मानला गेला. नंतर या दोन समाजाचा मिलाफ झाला. मिलाफ झाल्यावर दोन्ही रूपे शिष्ट म्हणजे थट्टा न होता वापरली जाणारी रूपे समजली गेली, या दुहेरी स्वभावाचा अवशेष हे दुतोंडी शब्द होत. ही दुतोंडी रूपे पाणिनीच्याकाली प्रचलित होती. दुतोंडी शब्दांपैकी इकारान्त व उकारान्त शब्दांचा कल इकारान्त व उकारान्त पुल्लिंगी शब्दाकडे फार झुकतो व ईकारान्त व ऊकारान्त शब्दांचा कल ईकारान्त व ऊकारान्त स्त्रीलिंगी शब्दांकडे फार झुकतो. मति व धेनु यांच्या पंचवीस रूपापैकी एकोणीस रूपे हरि व गुरु शब्दांच्या रूपासारखी आहेत. चार रूपे नदी शब्दाच्या रूपासारखी विकल्पाने आहेत व दोन रूपे नदी शब्दासारखी नित्यत्वाने आहेत. धी व भू यांच्या सव्वीस रूपापैकी फक्त चार रूपे पुल्लिंगी प्रत्यय विकल्पाने घेतात. एकवीस रूपांचा कल नदी व वधू शब्दांच्या रूपाकडे नित्यत्वाने आहे व एक रूप हलन्त शब्दांच्या रूपाचे अनुकरण करते. मति व धेनु हे शब्द घ्या किंवा धी व भू हे शब्द घ्या. यांच्या रूपापैकी चार स्थानची रूपे विकल्पाने स्त्री लिंगी किंवा पुल्लिंगी होतात ती स्थाने म्हणजे चतुर्थी, पंचमी, षष्ठी व सप्तमी, या चार विभक्त्यांची एकवचनस्थाने. म्हणजे हा विकल्पाचा चमत्कार भस्थानात घडतो. सर्वनामस्थानच्या पाच रूपात किंवा पदस्थानच्या सात रूपात घडत नाही. भस्थानीच तेवढी वैकल्पिक रूपे का यावीत? या प्रश्नाचे उत्तर असे. पूर्ववैदिक तीन भाषांचा मिलाफ होऊन वैदिकभाषा निर्माण झाली हे वारंवार आपण पहात आलोच आहोत पैकी भस्थानीय रूपे ज्या पूर्ववैदिकभाषेतून घेतली त्या पूर्ववैदिकभाषेत प्रथम पुल्लिंग व स्त्रीलिंग यांच्या प्रत्ययात भेद उत्पन्न झाला व तो भेद वैदिकभाषेत शिरला. तक्ता देतो त्यावरून स्पष्टता जास्त खुलासा होईल :
स्वे हा प्रत्यय पुल्लिंगी का मानिला गेला व स्यै हा प्रत्यय स्त्रीलिंगी का मानिला गेला, तसेच स्यस् व स्यि पुल्लिंगी का आणि स्याम् व स्यास् स्त्रिलिंगी का, एतत्संबंधक विवेचन पुढे यथास्थली होणार असल्यामुळे, हा प्रश्न इथे एवढाच सोडून देतो.