१ संस्कृत भाषा प्रथम शिकावयाला लागले म्हणजे मराठी भाषा बोलणा-या विद्यार्थ्याला एक मोठा चमत्कार वाटतो. तो चमत्कार म्हणजे संस्कृतातील द्विवचनाचा. मराठीत दोनच वचने , एकवचन व अनेकवचने, संस्कृतात पहाव तो आणिक एक तिसरे वचन म्हणजे द्विवचन आढळते. लहानपणी अमरकोशाबरोबर रूपावलीला प्रारंभ करताना रामौ या द्विवचनावर जेव्हा मी आलो तेव्हा अमरकोश पढविणा-या शास्त्रीबोवांना प्रश्न केला की, रामौ हे काय आहे ? बोवांनी सांगितले की, रामौ म्हणजे जे हे त्ते दोन राम, याला द्विवचन म्हणतात, यावर पुन्हा प्रश्न केला की, चार रामांना काय म्हणतात ? यावर संतापाने थोत्रीत लगावून बोवा म्हणाले, तुझे डोबल म्हणतात !!! येणेप्रमाणे शंकासमाधान झाल्यावर राम: रामौचा घोष उदात्त स्वरात पुन्हा सुरू झाला. तेव्हापासून या द्विवचनाचा चमत्कार माझ्या मनात वारंवार घोळत आहे. संस्कृतात द्विवचन काय म्हणून असावे आणि मराठीत काय म्हणून नसावे ? मुळातच संस्कृतात द्विवचन कसे उत्पन्न झाले ? संस्कृत भाषा बोलणा-या प्राचीन समाजाची अशी कोणती मनोवृत्ती असावी की, दोन पदार्थ दाखविण्याकरिता त्याने शब्दांची निराळी रूपे बनवावी ? इत्यादी प्रश्न माझ्या मनात कित्येक वर्षें घोळत आहेत. तो घोळणा आज कागदावर उतरतो.
२. वचन म्हणजे शब्दांनी संख्या दाखविणे. संख्या दाखविणारे शब्द असू शकतील किंवा प्रत्यय असू शकतील. ज्या भाषात संख्या प्रत्ययांनी दाखविली जाते त्या भाषा सप्रत्यय भाषा आणि ज्या भाषात संख्या स्वतंत्र शब्दांनी दाखविली जाते त्या अप्रत्यय भाषा. हजारो वर्षांपूर्वी अत्यंत रानटी स्थितीत आर्य असताना ते अप्रत्ययभाषा बोलत व एक, दोन, तीन हे संख्यावाचक शब्द वस्तूंच्या पुढे उच्चारून वस्तूंची संख्या दाखवीत. हजारो वर्षांनंतर आर्य सप्रत्यय भाषा बोलू लागले, तेव्हा एकही संख्या दाखविण्याकरिता ते एकवचनाचा प्रत्यय शब्दाला लावू लागले, दोन ही संख्या दाखविण्याकरिता द्विवचनाचा प्रत्यय लावू लागले आणि तीनही संख्या दाखविण्याकरिता त्रिवचनाचा प्रत्यय लावू लागले. वस्तुत: आपल्या सध्याच्या अर्वांचीनदृष्टीने पहाता एकाहून अधिक संख्येला आपण अनेक हे विशेषण लावतो. सप्रत्यय भाषा बोलण्याच्या पायरीला आल्यावर आर्यांना ही बाब माहीत झालेली होती. कारण अनेक व अन्य हे दोन अती जुनाट शब्द सप्रत्ययभाषा बोलण्याच्या सुमारास आर्यंभाषेत विद्यमान होते. दोन म्हणजे अनेक ही बाब यद्यपि सप्रत्यय भाषा बोलू पाहणा-या आर्यांना माहीत होती, तत्रापि पूवीचा अप्रत्यय भाषा बोलण्याच्या वेळचा भाषण संप्रदाय त्यांना, इच्छा असती तरीही सोडता आला नसता व आला नाही. असे दिसते की, अप्रत्यय भाषा बोलण्याच्या प्रारंभास आर्यांना किंवा आर्यांच्या पूर्वजांना फक्त तीनपर्यंत अंक मोजता येत होते. सध्या जसा दशम आपण व्यवहार करतो तसा तीनने त्या रानटी स्थितीत आर्यंपूर्वज व्यवहार करीत. सर्व जग तीनचे. भूर, भुवर, स्वर असे तीन लोक, अ उ म् असा त्र्यक्षरी ओम्, स्वर्ग, पाताळ आणि पृथ्वी अशी तीन जगे, स्वाहा, स्वधा, वषट् असे तीन कार, इत्यादी अनेक त्रिके जीं वैदिक वाङमयात दिसतात त्यांचे मूळ रानटी स्थितीतील फक्त तीनपर्यंत संख्या मोजण्याची आर्यांची ऐपत होय. त्या काळी संख्या मोजण्याची इतकी संकुचित ऐपत असल्यामुळे व भाषा प्रत्ययशिवाय बोलत असल्यामुळे व एक वस्तू दाखवावयास वस्तू शब्दाच्या पुढे एक या अर्थांचा शब्द रानटी आर्य उच्चारीत, दोन वस्तू दर्शविण्याकरिता दोन या अर्थाचा शब्द रानटी आर्य उच्चारीत आणि तीन वस्तू दाखवावयाच्या असल्यास वस्तू शब्दापुढे तीन या अर्थाचा शब्द घालीत आणि इथे घोडे थांबे. चार या अर्थाचा किंवा चारांहून जास्त संख्या दर्शविणारा शब्द भाषेत नसल्यामुळे सर्व व्यवहार त्रिकाच्या घडामोडीवर चाले. अशा त्रैकावस्थेत हा रानटी समाज असता, बाह्य काराचा आघात होऊन, तो रानटी समाज प्रत्यय भाषा बोलू लागला आणि सप्रत्यय अशी तीन वचने, कारण तीनपर्यंतच संख्या माहीत होती, त्याच्या बोलण्यात सहजच येऊ लागली. चार किंवा पाचपर्यंत संख्या माहीत असत्या तर चार किंवा पाच सप्रत्यय वचने निर्माण झाली असती यात संशय नाही. परंतु रानटी आर्यांना तीनच आंख मोजता येत असल्यामुळे त्यांच्यात तीनच वचने निर्माण झाली. तीन पर्यंतच संख्या मोजण्या इतकी ज्यांची मजल गेली असे रानटी समाज अद्यापही काही आहेत. त्याच दर्जाचे हे रानटी आर्य होते. कालांतराने या त्रैवचनिक आर्यांना तिहींच्यापुढे अंक मोजता येऊ लागले व संख्या असंख्य आहेत हे ज्ञान झाले. हे ज्ञान होईतोपर्यंत भाषेत तीन वचनांचा पगडा इतका बेमालूम बसून गेला होता की, तीन संख्यावाचक जे रानटी दशेतील त्रिवचन त्यानेच असंख्य किंवा बहुसंख्या दाखवावयाचा प्रघात सोयिस्करपणामुळे रूढ झाला. त्रिवचन हे बहुवचनाचे काम करू लागले. एकाएकी पूर्वीचे कोणतेच काही मोडता येणे शक्य नसते. सबब, द्विवचनाचे लटांवर गळ्यात जसेच्या तसेच राहू देऊन मार्ग क्रमण करावा लागला. द्विवचन रहाण्याचे दुसरे कारण असे की, रानटी आर्य दोन या संख्येला बहु समजत नसत. एक या संख्येच्या जवळजवळचाच द्वि, अशी त्यांची समजूत असे. पुढे कालांतराने संख्येचे एक व अनेक असे द्विभाग आर्यांना जेव्हा समजू लागले, तेव्हा दोन ही संख्या अनेकांच्या भागात पडते हे त्यांच्या लक्षात आले व द्विवचन निरर्थक आहे हेही त्यांनी ओळखिले आणि त्याप्रमाणे प्राकृतभाषात या निरर्थक ओझ्याला वगळण्यात ही आले, तत्रापि रानटी आर्य जिचे पुरातन उत्पादक त्या संस्कृत व वैदिक भाषांतून हे लटांबर काढून टाकता आले नाही. कारण, ते भाषासंप्रदायात इतके मिसळून गेले होते की, त्याच्यावर शस्त्रप्रयोग केला असता, संस्कृत भाषेला मृत्यूच आला असता. याच कारणास्तव पाणिनीयात बहुषु बहुवचन असा प्रयोग आला आहे.