कै. राजवाडे यांनी पदवी मिळवली तरी तिचा उपयोग करून उत्तम नोकरी मिळवावी, उच्चपदे भूषवावी ही आकांक्षा त्यांना मुळीच नव्हती. पण कार्यक्षेत्र निश्चित होईपर्यंतची २-३ वर्षे संभ्रमात गेली. त्या वेळच्या प्रथेप्रमाणे त्यांचे लग्न १८८८ मध्ये विद्यार्थिदशेतच झाले होते. पदवीधर झाल्यानंतर प्रपंचासाठी त्यांनी न्यू इंग्लिश स्कूलमध्ये तात्पुरती नोकरी धरली होती; पण दोन अपत्यांच्या व पत्नीच्या अकाली मृत्यूमुळे राजवाडे यांचा प्रपंचाचा पाश तुटला व साहजिकच प्रपंचासाठी पत्करलेली नोकरी त्यांनी १८९३ मध्ये सोडून दिली पत्नीनिधनानंतर लग्नाचे वय असूनही पुन्हा लग्न करायचे नाही असा ठाम निर्धार करून राजवाडे यांनी कामास प्रारंभ केला. मराठी भाषा व स्वदेश याबद्दलच्या अभिमानाची व त्यांची स्थिती सुधारण्याची जी भावना राजवाडे यांच्या मनात मूळ धरून होती तीच वाढीस लागून आयुष्याचे ध्येय निश्चित झाले. विष्णुशास्त्री चिपळूणकरांचे लेख, काव्येतिहासकार रा. व. काशीनाथपंत साने यांची ऐतिहासिक पत्रे व परशुरामपंत गोडबोले यांनी छापलेल्या काव्यांनी महाराष्ट्रसारस्वताचा मला अभिमान वाटू लागला असे खुद्द राजवाडे यांनीच नमूद करून ठेवले आहे.
जानेवारी १८९४ मध्ये 'भाषांतर' मासिकाचा पहिला अंक राजवाडे यांनी प्रसिद्ध केला राष्ट्राचा स्वाभिमान वाढीस लावण्यासाठी व जगातील निरनिराळे विचारप्रवाह देशर्वाधवांना सांगण्याच्या हेतूने उत्तमोत्तम विचारप्रवर्तक ग्रंथांची भाषांतरे लोकांना देणे आवश्यक होते. पश्चिमेकडे जे निरनिराळ्या शास्त्रातील अगाध ज्ञान निर्माण होत होते तशा त-हेचे स्वतंत्र ज्ञानभांडार निर्माण करण्याची कुवत तूर्त आपणात नाही म्हणून तेच आपण मराठी भाषेत आणण्याचा प्रयत्न करावा या हेतूने हे मासिक राजवाडे यांनी सुरू केले. ते ३७ महिने चालून त्यात १५ पूर्ण व ७ अपूर्ण अशा २१ ग्रंथांची भाषांतरे प्रसिद्ध झाली. कॉलेजात असतानाच राजवाडे यांनी अनुवादित केलेल्या प्लेटोच्या 'रिपब्लिक' या ग्रंथाचा अनुवादही या मासिकातूनच प्रसिद्ध झाला. पुण्यातील प्लेगच्या संकटाने हे मासिक बंद पडले.
हे मासिक बंद पडले तरी त्यांचे ध्येयवादी मन त्यांना स्वस्थ बसू देईना. कॉलेजपासूनच इतिहास हा राजवाडे यांचा आवडता विषय ! ग्रँट डफ व इतर इंग्रज इतिहासकारांनी लिहिलेला भारताचा इतिहास हा जेत्यांनी जितांचा लिहिलेला इतिहास असल्याने त्यात सत्यापलाप फार व अवाजवी घटनांना महत्त्व दिलेले आहे असे राजवाडे यांचे मत होतेच. सत्य इतिहास उजेडात आणल्याशिवाय राष्ट्रांत स्वत्वाची चेतना निर्माण होणार नाही हाही एक विचार राजवाडे यांच्या मनात घर करून होता. अशा अस्वस्थ मनःस्थितीत असतानाच त्यांचे एक विद्यार्थी काकाराव पंडित यांना वाई येथे जुन्या कागदांचे एक पेटार सापडल्याचे व त्यांनी ते वाचून पाहिल्यावर एका पुस्तकाची सामग्री त्यांत असल्याची हकीगत त्यांच्या कानावर आली. "निरलस विसूभाऊ त्याच रात्री पुण्याहून वाईस आले. सकाळी माझ्याकडे आले व एकदम सर्व दप्तर पाहाण्यास सुरुवात केली '' असे खुद्द काकासाहेब पंडितांनी लिहिले आहे. याप्रमाणे २ महिने अविश्रांत श्रम करून 'मराठ्यांच्या इतिहासाची साधने' हा पहिला खंड १८९६ मध्ये छापून तयार झाला. पानिपतच्या युद्धासंबंधीची २०४ पत्रे या खंडात आहेत. (पुढील पानावर पहा )
Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Published in
राजवाडे यांचा जीवन परिचय