याचे खरे कारण तो रद्दड होता हे नाही. रेनॉल्डसने तिस-या जॉर्जच्या वेळची बादशाही घराणी आणि लंडनचे सरंजामी लॉर्ड गणांचा संघ यांच्या प्रेमकथांच्या, साध्या कुटुंबातील निरागस तरुणींना फसविण्याच्या लीलांच्या कथा "मिस्टरीज ऑफ दि कोर्ट ऑफ लण्डन" या दहा-खंडात्मक कादंबरीत उघड्यावर आणल्या. स्कॉटलंडचा कबजा घेण्यासाठी इंग्रजांनी काय कत्तली केल्या याच्याही कथा त्याने लिहिल्या. क्वीन एलिझाबेथने स्कॉटलंडच्या क्वीन मेरीला कसे मारले याचे क्रूर कथानक लिहिले आणि सगळ्यात मोठी कामगिरी या "रद्दड" कादंबरीकाराने बजावली तिचा उल्लेखही इंग्रजी वाङ्मयाचे इंग्रजी इतिहासकार करीत नाहीत. ते म्हणजे “सोल्जर्स वाईफ ” ( सैनिकाची बायको ) या कादंबरीत शिपायांना क्षुल्लक अपराधावरून श्रीमंत घराण्यातून आलेले अधिकारी "फटक्याची " सजा देऊन त्याचे अमानुष हाल करून जीवही घेत याचा स्फोट केला याची दखल घेऊन पार्लमेंटला हो फटक्यांचा प्रकार बंद करावा लागला. त्याची "सीमस्टेस "
( शिंपीण ) या कादंबरीतही कामगारस्त्रियांच्या परिस्थितीवरचा उल्लेख आहे.
असे असताही रेनॉल्डस्वर टीकाकार हल्ला करतात हे चमत्कारिकच दिसते असे मला वाटते. मी स्वतः याचे ग्रंथ १९१४ मध्ये वाचले तेव्हा मी चुकलो काय अशीही शंका येते. राजवाडे यांच्या आणखी एका सिद्धान्तवजा मताचा उल्लेख करून हे प्रकरण संपवितो.
संत रामदासांबाबत लिहिताना ते विचारतात की "भक्तिमार्गाचा, ज्ञानमार्गाचा, व कर्ममार्गाचा विस्तृत प्रपंच दासानी जसा केला तसा योगमार्गाचा का केला नाही ? ह्या शंकेचे उत्तर असे की मूळ वेदान्तात योगमार्गाचे महत्त्व विशेषसे मानलेले नाही...समर्थांनी योगमार्गाचा प्रपंच केला नाही इतकेच नव्हे तर केवळ हटयोगाचा त्यांनी उपहास केला आहे. आमचा पाण्यावर तरून जातो, जमिनीत पुरून घेतो, बीरमंत्र जाणतो वगैरे फटके असद्गुरूंना दासानी मारले आहेत. हटयोगाच्या बलावर अद्भुत चमत्कार करू जाणा-या भोंदूचा समर्थांना फार तिटकारा असे. शिवाजी व रामदास ही माणसे फसवेगिरीला विचारात किंवा आचारात बिलकुल भीक घालणारी नव्हती." ('राजवाडे लेखसंग्रह' साहित्य अकाडेमी प्रकाशन, पान २६४). आज आमच्या देशात चमत्काराचा धिंगा जो चालू आहे त्याबद्दल रामदास व इतर अद्वैत वेदान्ती तत्त्वज्ञान्यांचे हे विचार पहाण्यासारखे आहेत.
राजवाड्यांच्या लिखाणाचे व विचारभांडाराचे सर्वंकष दर्शन नुसत्या त्रोटक निबंधाने करणे अगदी अशक्य आहे. म्हणून हा अर्धवट व असखोल प्रपंच येथेच संपविणे बरे.
Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Published in
कॉ. श्रीपाद डांगे यांची प्रस्तावना