Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

समाजशास्त्रविषयक व इतर निबंध

राजवाडे यांचे इतर विविध विषयांवरही फार सुंदर निबंध आहेत. वाड्.मय विषयक, तात्विक विवेचनात्मक, टीकाप्रतिटीकात्मक राजकारण विषयक व इतर असे त्यांचे पांच भाग पाडावे. वाड्.मय विषयक निबंधांत कादंबरी वगैरे साहित्य संमेलन, पुण्यातील शारदोपासक मंडळाच्या अध्यक्षपदावरुन केलेलें संभाषण हे महत्त्वाचे निबंध आहेत. कादंबरी या निबंधांत त्यांनी कादंबरीचा आजपर्यंतचा इतिहास सांगितला. जगांतील उत्कृष्ट कादंबरीकारांच्या ग्रंथांचे उल्लेख करून, त्यांचे मोजमाप करून, ते महाराष्ट्रांतील कादंबरीकाराकडे वळले आहेत. हरिभाऊ आपटे यांच्या कादंब-यांचा त्यांनी गौरवपूर्ण उल्लेख केला आहे. व शेवटी कादंबरीग्रंथ निर्माण व्हावयास कोणत्या साहित्याची आवश्यकता आहे हें त्यांनी सांगितलें आहे. ते लिहितात, 'आतां ह्युगो, झालो, टालस्टाय ह्यांच्यासारखी ग्रंथरचना व्हावी अशी इच्छा असेल, तर त्याला एकच उपाय आहे. ह्यांच्यासारखी मनें ह्या देशांतील कादंबरीकारांची बनली पाहिजेत. विधवाची दु:खें पाहून जीव तिळतिळ तुटला पाहिजे. गरीबांची उपासमार पाहून स्वत:च्या घशाखालीं घास उतरतां कामा नये. स्वदेशाचें दैन्य पाहून रात्रींची झोंप डोळयांवरुन उडून जावी. स्त्रियांची बेअब्रू झालेली पाहून द्रौपदीच्या भीमाप्रमाणें त्वेष यावा. ही मनोवृत्ती ज्यांची झाली, त्या ब्रम्हानंदी ज्यांची टाळी लागली, त्यांनीच कत्पान ट्रेफूसची बाजू घेऊन सर्व राष्ट्रा-विरुध्द भांडावें व रशियांतील पातशाहांनाही चळचळ कापायला लावावें. इतरांची माय ही कामें करणा-या कादंबरीकारांना व्याली नाही ! तेव्हां उत्तमोत्तम कादंबरीकार व्हावयाचें म्हणजे मनोवृत्ति अशी अत्यंत जाज्वल्य पाहिजे. श्रेष्ठ विद्या, विस्तृत वाचन, मोठा प्रवास, तीक्ष्ण निरीक्षण, कडक परीक्षण, थोर औदार्य, गाढ सहानुभूती, व नाटकी लेखणी हे गुण तर नांव घेण्यासारख्या कादंबरीकारांत हवेतच. परंतु सर्वांत मुख्य गुण म्हटला म्हणजे जाज्वल्य मनोवृत्ति हवी. तिच्या अभावी वरील सर्वगुण व्यर्थ होत. ही मनोवृत्ति कृत्रिम त-हेनें येत नाही. ही ईश्वराची देणगी आहे. उत्तेजक मंडळयांच्या बक्षिसांनी किंवा प्रोत्साहक सोसायटयांच्या देणग्यांनी रद्दड कविता, रद्दड कादंब-या, रद्दड नाटकें, रद्दड चरित्रें, अशी सर्व रद्दड ग्रंथप्रजा उत्पन्न होईल. तेजस्वी ग्रंथसंपत्ति निर्माण व्हावयाला जाज्वल्य अशा प्रखर मनोवृत्तीचा-जातीचा अंकुर पाहिजे अशी उद्बोधक शब्दांनी या विस्तृत निबंधाचा शेवट केला आहे.

कादंबरी हा निबंध जर वाड्.मय संबंधीच्या लेखांत उत्कृष्ट आहे, तर तात्विक विवेचनात्मक लेखांत 'रामदास' हा लेख अत्यंत महत्वाचा आहे. 'रामदास' या निबंधानें महाराष्ट्रांत रामदासासंबंधीच्या विचारांत क्रांति घडून आली. समर्थ व इतर संत यांतील फरक दाखवून राजकारण व धर्म यांचे परस्पर संबंध कशा स्वरूपाचे पाहिजेत हें समर्थाच्या ग्रंथांतील उता-यांनी सिध्द करुन, पाश्चात्य राजकारण विषयक तत्वज्ञानापेक्षां समर्थांची दृष्टी किती खोल होती हें राजवाडे यांनी दाखवून दिलें आहे. 'रामदास' या निबंधानें समर्थांचे विचारसामर्थ्य महाराष्ट्रांस कळूं लागले. देवप्रभृति धुळें येथील लोकांस समर्थकालीन वाड्.मय संशोधण्यास स्फूर्ति आली व सत्कार्योत्तेजक मंडळ स्थापन झालें. राजवाडे यांची बुध्दि किती खोल असते तें या निबंधांत उत्कृष्टपणें दिसून येतें.