Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
इतिहासाचार्य राजवाडे यांचे चरित्र - साने गुरुजी
भाषाविषयक कामगिरी
या भाषाशास्त्र विषयासंबंधी त्यांचे जे अनेक निबंधप्रबंध आहेत, त्यांत 'विचार व विकार प्रदर्शनाच्या साधनाची इतिहासपूर्व व इतिहासोत्तर उत्क्रांति हा निबंध केवळ लोकोत्तर आहे. मानव वाणीचा विकास कसकसा होत गेला, व तिची उत्क्रांति कशा क्रमानें व कोणत्या स्वरुपांत झाली हें गहन भाषा तत्वज्ञान त्यांनी येथें दाखविलें आहे. या अति गहन विषयाचे पापुद्रे आपल्या कुशल व कुशाग्र बुध्दीच्या योगें त्यांनी सोडवून दाखविले आहेत. हा निबंध मला वाचावयास मिळाला नाही. त्याच्यासंबंधी जें इतरांनी लिहिलें तें मी वर दिलें आहे.
भाषाशास्त्रविषयक या गोष्टी सांगण्याचे वेळीच मानभावी किंवा महानुभावी पंथाच्या गुप्तभाषेचा जो उलगडा त्यांनी केला त्याचाही उल्लेख अवश्यमेव केला पाहिजे. राजवाडे यांची बुध्दि संशोधनांत सुख मानणारी होती. निरनिराळया ठिकाणचे शिलालेख, ताम्रपट यांतील उलगडे त्यांनी केले आहेत व त्यांनी ज्ञानांत भर घातली आहे. परंतु ही महानुभावपंथाची गुप्त भाषा उलगडून त्यांनी मोठीच कामगिरी केली. महानुभावीपंथाचें वाड्.मय ज्ञानेश्वरांच्याही पूर्वीपासूनचें आहे. परंतु हे सर्व ग्रंथ गुप्त संकेथांत लिहिलेले असत. 'क' बद्दल दुसरेंच एक अक्षर लिहावयाचे; आंकडयांचेहि असेंच. यामुळें यांचे ग्रंथ सर्व साधारण मराठी भाषज्ञांस अज्ञात राहिले. प्रख्यात कादंबरीकार हरि नारायण आपटे यांच्या आनंदाश्रम छापखान्यांत महानुभावी पंथाचा 'लीलासंवाद' म्हणून एक ग्रंथ होता. त्याचा कांही एक अर्थ या गुप्त सांकेतिक भाषेमुळें लागत नसे. म्हणून तो ग्रंथ शास्त्री पंडितांनी तसाच बाजूला ठेवून दिला होता. शेवटी तो ग्रंथ हरिभाऊंनी राजवाडे यांच्या स्वाधीन केला. हा ग्रंथ ज्या संकेतांनी लिहिला, तो संकेत १३ दिवस सतत एकाग्रतेनें खटपट करून राजवाडे यांनी उलगडून दाखविला व सर्व परिभाषा बसविली. कोणत्या अक्षराबद्दल कोणतें अक्षर हें सर्व नीट स्पष्ट केले. महानुभावी महंत या वार्तेने चकित झाले. डॉ. भांडारकर यांनी राजवाडे यांचे फार कौतुक केलें. महानुभावीपंथाची अशी किल्ली सांपडल्यामुळें तें वाड्.मय आतां मराठींत येण्यास मोकळीक झाली. हें वाड्.मय श्रीमंत आहे. अनेक गद्यपद्य ग्रंथ, कोश, व्याकरणें वगैरे यांत आहेत. ही ग्रंथ संपत्ति जवळ जवळ ६ हजार आहे. 'मराठी भाषेतील एक अज्ञान दालन' हा कै.भावे महाराष्ट्रसारस्वतकार यांचा निबंध व महानुभावी वाड्.मयांचा इतिहास हें व-हाडांतील देशपांडे यांचे पुस्तक ही दोन वाचली म्हणजे मराठीस या महानुभावी वाड्.मयामुळें केवढा लाभ झाला आहे याची कल्पना येईल.
राजवाडे यांनी किती तरी काव्यें, किती तरी बायकांच्या वगैरे प्रचारांत म्हणण्यांत येणारी गाणी प्रसिध्द केली, व त्यांतून सामाजिक इतिहासाचा जो कण सांपडला तो पुढें ठेविला. भारत इ.सं.मंडळाची इतिवृत्तें चाळीत बसलें म्हणजे ही मौजेची गाणी व इतर गोष्टी वाचून मनास करमणूक होते व ज्ञानही मिळतें. बारीकसारीक गोष्टीकडेहि त्यांचें लक्ष असे. दासोपंताचें काव्य जेव्हां छापू निघूं लागलें, तेव्हां जुन्या पोथ्यांत अनुनासिक पोंकळ टिंबानें व अनुस्वार भरीव टिंबाने दाखवीत ही गोष्ट त्यांनीच दिग्दर्शित केली.
एकंदरीत राजवाडे महान् वैय्याकरणी, प्रचंड शब्द संग्राहक होते. या कामास त्यांच्या सारखा प्रतिभावान प्रज्ञावंत व अनंतश्रमांचा पुरुष पुनरपि केंव्हा लाभेल कोणास माहीत ? भाषाविषयक त्यांच्या या कामगिरीस तोड नाही.