प्रस्तावना
२१) परंतु, पिढीजात म्हणजे पीठिकाजात वांशिक गुणांच्या दृष्टीने जातिसंस्था एकाएकी राभस्याने मोडणे इष्ट म्हणजे राष्ट्रहितपोषक होणार नाही. गुण पिढ्यानुपिढ्या संक्रमण होत होत उपजत होतात. असले अनेक उपजत गुण हिंदू जातींनी पिढीजात पैदा केलेले जातिमोटनाने फुकट दवडणे राष्ट्रहिताचे नाही. ह्या गुणांचे उपबृंहण व्हावे एतन्निमित्त जातिसंस्था मुद्दाम राखली पाहिजे. जर्मन विचारकार निश् जातिसंस्थेचा कैवार एवढयाच करता घेतो व जर्मनीत जातिसंस्था स्थापावी म्हणून कंठरवाने प्रतिपादितो. सध्या जातिसंस्थेत अवगुण माजले असतील ते वेणून काढून गुणांचे रोपटे जेणे करून फोफावेल ते उपाय योजिणे समाजशास्त्रसंमत व इतिहासशास्त्रसंमत होईल.
२२) मराठा क्षत्रिय, मराठा कुणबी, क्षुद्र कुणबी व नागवंशी महार बहुप्रज पडल्याकारणाने, अल्पसंख्याक ब्राहमणांना व महाराष्ट्र क्षत्रियांना संस्कृत भाषा सोडून मराठयांची मराठी भाषा स्वीकारावी लागली. महाराष्ट्र क्षत्रियांनी राजकीय स्वामित्व मराठ्यांवर गाजविले, तर उलट मराठ्यांनी आपली भाषा ह्या सम्राटांवर लादिली. तेव्हा नागमाहाराष्ट्रिकोत्पन्न मराठयांची उपेक्षा करून भागणार नाही असे महाराष्ट्र क्षत्रियांच्या व ब्राह्मणांच्या लक्षात आले. ते गुलाम झाले तर ब्राह्मणक्षत्रियांना गुलाम व्हावे लागे. त्यांच्यात साथीचे रोग, दुष्काळ व अज्ञान पसरले तर ब्राह्मणक्षत्रियांनाही त्यांच्या बरोबर उपाशी मरावे लागे व आडमुठे बनावे लागे. ते अजाणपणे जी बाजू घेत ती बाजू विजयी होई. त्यांनी मुसलमानांची बाजू पोटाकरिता उचलली तेव्हा यावनी सत्ता देशात प्रचलित झाली. त्यांनी शहाजीची बाजू पोटाकरिता धरली तेव्हा यवनांचा पाडाव झाला आणि शिवाजीची साथ जेव्हा त्यांनी महाराष्ट्रधर्माभिमानाने केली, तेव्हा स्वतंत्र महाराष्ट्रराज्य उभारले गेले. त्यांनी चित्पावनांशी फारकत केली तेव्हा चित्पावनी साम्राज्य लंगडे झाले. तात्पर्य, महाराष्ट्रदेशाचे गुरुत्वमध्य ३ परिनिर्दिष्ट चार जातींच्या ठायी आहे आणि ते म्हणतील ती, बहुत कालांतराने का होईना, पण पूर्वदिशा होते. करता, शहाजीशिवाजींनी ह्या जातींचे साहाय्य पैदा केले आणि मराठा तेवढा मेळवावा हा सिध्दांत रामदासांनी उच्चस्वराने पुकारला.