प्रस्तावना
परंतु खरे कारण असे होते की, आदिलशहाला विशेष प्राणघातक धक्का बसण्याचा रंग दिसल्यास, साठ सत्तर हजार फौजेचा स्वस्थ बसलेला मालक जो शहाजी तो स्वसंरक्षणार्थ जागा होऊन त्याच्याशी झुंज पडेल, ही भीती वृद्ध व अनुभवी शहाजहानास होती. ती भीती व तो संशय तरुण व सापेक्षतेने अल्पानुभवी औरंगजेबाला नसल्यामुळे, औरंगजेब विजापूर व गोवळकोंडा खालसा करण्याच्या गोष्टी त्या वेळी बोलत होता. आता, चार पाच वर्षे लोटल्यानंतर, शहाजहान व दारा शुकोह यांचा अडथळाही नाहीसा झाल्यामुळे व शहाजीही औरंगजेब व मीर जुमला यांच्या मते वयातीत होऊन स्वास्थ्यप्रवण बनल्यामुळे, ही दोन संस्थाने गिळंकृत करण्याला फारशी अडचण पडू नये, अशी औरंग व जुमला यांची समजूत होण्याचा संभव होता. औरंगजेबा संबंधाने १५८३ त आलेल्या ह्या संशयाचा इशारा अल्ली आदिलशहाला शहाजीने दिला व त्याला असेही कळविले की, शिवाजीशीही आपला स्नेह करून देता येईल. अल्लीशहाला हा पोक्त सल्ला पसंत पडून शिवाजी व आदिलशहा यांच्या मध्ये ह्या साली गुप्त तह झाला. शिवाजीने ह्या पाच वर्षांत अफजल मारिला, रुस्तुमजमा व फाजलखान यास कोल्हापूरच्या युद्धात पराजित केले, पन्हाळा घेतला, शिद्दी जोहार खाकेत घातला, गदगलक्ष्मेश्वरापर्यंत खंडण्या वसूल केल्या, वासोटा पाडला, निजामपूर लुटले, दाभोळ व प्रभावळी कब्जात आणिली, शृंगारपूर नागविले व औरंगजेबाचा मामा जो शास्ताखान त्याचा हात तोडिला. असे हे चमत्कारावर चमत्कार करणा-या वीरशिरोमणीचे सहाय्य औरंगजेब व मीर जुमला यांच्या स्वारीच्या भयास्तव अल्ली आदिलशहाला हवेच होते. ते शहाजीने मोठ्या युक्तीने मिळवून दिल्याबद्दल अल्ली आदिलशहाने शहाजीचे आभार मानिले. शिवाजीलाही ह्या वेळी आदिलशहाशी वैर करणे सोईचे नव्हते. औरंगजेबाने करतलबखान, जामदारखान, नसीरीखान, हुषदारखान, अब्दुल मुनीम व शेवटी शाहिस्तेखान, अशा अनेक खानांचे भुंगे शिवाजीवर सोडिले होते. त्यांचा परामर्श घेऊन शिवाय आदिलशाही सरदारांशी झगडत बसणे शिवाजीला जरा जड होऊन गेले होते. तेव्हा तोही ह्या तहाला राजी झाला व आपल्या वडिलांच्या उपकाराचे धन्यवाद गाऊ लागला. ह्या तहात विशेष लक्षात ठेवण्यासारखी बाब अशी की, अल्ली आदिलशहाने शिवाजीकडे चाकरीची दया मागण्याचे सोंग बिलकुल न करता बरोबरीचा स्वतंत्र राजा या नात्याने परस्पर कुमकेचा करार केला (शिवदिग्विजय २००). इमानभाष्य व उभयतांच्या जामिनी खातरजमापूर्वक झाल्या. दरसाल सात लक्ष होन रोकड आदिलशहाने शिवाजीस पेषकष द्यावी असेही ठरले. शिवाजीचा वकील शामजी नाईक पुंडे विजापूर दरबारी दोन्हीकडील कामांची विल्हेवाट लावू लागला. विजापूरकरांचा वकील शिवाजीच्या दरबारी नसावा, अशीही अट अल्लीशहाने मान्य केली. अल्लीशहा व शिवाजी या दोघांना त्यांच्या मर्जीप्रमाणे तह करून दिल्यानंतर, शहाजीला शिवाजीच्या राज्यात उघड माथ्याने जाण्यास सुलभ झाले. शक १५५९ त पुणे प्रांताला रामराम ठोकून कर्नाटकात आल्याला शहाजीला १५८३ त चोवीस वर्षे म्हणजे तब्बल दोन तपे होऊन गेली होती. त्याच्या मनात आपल्या जहागिरीचे व जिजाबाईचे व आपल्या नुकत्याच जन्मलेल्या नातवाचे व इष्टमित्रांचे व कुलस्वामी जो शिखरशिंगणापूरचा शंभुमहादेव त्याचे व कुलस्वामिनी जी तुळजापूरची भवानी तिचे दर्शन घ्यावे असा फार दिवसांचा हेतू होता. तो सफल होण्याला हा समय उत्तम आहे असे जाणून, आदिलशहाच्या अनुमतीने शहाजी पुणे प्रांताकडे जाण्यास निघाला.