प्रस्तावना

१०१. त्या काली महाराष्ट्रातील क्षुद्र, कुलपतीच्या म्हणजे कुणब्याच्या म्हणजे शेतकऱ्याच्या, प्रतिष्ठेप्रत चढला नव्हता. माहाराष्ट्रिकांची व नागांची दक्षिणेत जेव्हा गाठ पडली तेव्हा नागलोकात तीन वर्ण ऊर्फ जाती अस्तित्वात होत्या, (१) नाग क्षत्रिय, (२) नाग क्षुद्र व (३) नाग अतिक्षुद्र. पैकी नाग क्षत्रियांशी माहाराष्ट्रिकांचा शरीरसंबंध होऊनमराठे लोक निर्माण झाले. नाग अतिक्षुद्र म्हणजे सध्या ज्यांना आपण महार म्हणतो ते. ह्यांच्या नावापुढे नाग=नाक हा प्रत्यय अद्यापही असतो, जसे रामनाक, कामनाक, इ.इ.इ. नाग क्षुद्र जे होते तेच मराठे लोक अस्तित्वात आले त्या समयीचे ह्या देशातील क्षुद्र होत. माहाराष्ट्रिक लोक दक्षिणेत उतरले तेव्हा त्यांच्या बरोबर उत्तरेतील क्षुद्रातिक्षुद्र सहजीच फार थोडे आले. आर्य वसाहतकार जेथे जेथे जात तेथे तेथे त्यांना जे भूमिज अर्धरानटी लोक भेटत त्यांना ते दास्यकर्म करावयास लावून क्षुद्र व अतिक्षुद्र बनवीत. दक्षिणेत माहाराष्ट्रिकांना नाग क्षुद्र व नाग अतिक्षुद्र आयतेच नागलोकांत असलेले आढळले. ह्या नागक्षुद्रांत माहाराष्ट्रिकांच्या बरोबर आलेले उत्तरदेशीय अनिरवसित क्षुद्र, वैश्य व नाग क्षत्रिय यांचे शरीरसंबंध होऊन क्षूद्र कुणबी म्हणून ज्यांना म्हणतात ते शहाजीकालीन लोक निर्माण झाले. तेव्हा नवीन क्षुद्र बनविण्याची खटपट करावी लागली नाही. हे नाग क्षुद्र व अतिक्षुद्र नाग क्षत्रियांहूनही नीचतर संस्कृतीचे असत, हे सांगणे नलगे. ह्यांच्यातही आर्य संस्कृतीचा अभिमान उत्पन्न करणे महाराष्ट्र क्षत्रिय व ब्राह्मण यांना आवश्यक भासत होते.

१०२. माहाराष्ट्रिक लोकांबरोबर उत्तरेकडील ब्राह्मण, विशेषत: यजुर्वेदी ब्राह्मण, दक्षिणेत पुरोहितकर्मसंपादनार्थ उतरले व माहाराष्ट्रिकांबरोबर गावगन्ना पसरले. नागमाहाराष्ट्रिकोत्पन्न मराठयांच्या गावंढळ संगतीने हे यजुर्वेदी ब्राह्मणही अत्यंत अज्ञ बनून गेले होते. ह्यांनाही उजळा देण्याचे काम महाराष्ट्र क्षत्रिय व विद्वान ब्राह्मण यांना जरूरीचे भासत होते.

१०३. एणेप्रमाणे चालुक्यराष्ट्रकूटयादवादींच्या अमदानीत (१) अल्पसंख्याक भोजयादवादि उत्तरदेशीय महाराष्ट्र क्षत्रिय व ब्राह्मण (२) नागमाहाराष्ट्रिकोत्पन्न मराठे देशमुख, पाटील व कुणबी, (३) नाग क्षुद्र व अतिक्षुद्र आणि (४) जोसपण कुलकरण करणारे गावढयागावचे यजुर्वेदी ब्राह्मण असे चतुर्विध संस्कृतीचे लोक देशात होते आणि अल्पसंख्याक महाराष्ट्र क्षत्रिय व ब्राह्मण यांच्याकडे ह्या राष्ट्राचे व समाजाचे नियंतृत्व व चालकत्व होते. अल्पसंख्याक महाराष्ट्र क्षत्रियांचे व ब्राह्मणांचे बल काय ते त्यांच्या बरोबर उत्तरे कडून आलेल्या थोडयाशा क्षत्रियांचे व ब्राह्मणांचे. उत्तरदेशीय क्षत्रिय व विद्वान ब्राह्मण राष्ट्रांतील वरिष्ठ लष्करी व मुलकी अधिकार चालवीत. बाकी सैन्यातील दरोबस्त चिल्हर शिपायगिरी व पायकी आणि मुलकी खात्यातील व धर्मखात्यातील दरोबस्त कारकुनी व ग्रामवृत्ती नागमाहाराष्ट्रिकोत्पन्न मराठयांकडे व गावंढळ यजुर्वेदी ब्राह्मणांकडे असे. हे निकृष्ट मराठे व यजुर्वेदी ब्राह्मण मराठी भाषा बोलत व वन्यदेवादि नाना प्राकृत देवधर्माचे उपासक असत. झुकानेवाला भेटला की हे झुकण्यास अज्ञानाने एका पायावर तयार असत. जैन, लिंगायत, मानभाव, गोरखपंथी, इत्यादी नाना पाखंडी या लोकांना भुलवीत व हे लोक त्या भुलवण्याला बळी पडत.