प्रस्तावना

महमदशहाने शहाजीस शेवटी विनंती केली की, राजे हो, कृपा करून (१) संभाजीला थोपवून धरा, (२) शिवाजीने जो आदिलशाही प्रांत घेतला असेल तो त्याजकडून आम्हाला परत आणून द्या आणि (३) चित्रकलच्या भरम्याला गप्प बसवा. पैकी पहिले व तिसरे कलम शहाजीने मान्य केले, दुसऱ्या कलमाचा मात्र, जिम्मा घेण्याचे त्याने पत्करिले नाही. त्याने पूर्वी अनेक वेळा जे सांगितले होते तेच ह्याही वेळी सांगितले की, शिवाजी हा माझ्या कह्यात नाही व तो आपले ऐकेल किंवा न ऐकेल याची खात्री देता येत नाही. तरी पण, महमदशहाने शहाजीवर शिवाजीला वळणावर आणण्याची कामगिरी लादलीच. लवाजिमा देऊन, महमदशहाने शहाजीची सुटका शक १५७१ च्या ज्येष्ठ शुद्ध पौर्णिमेस कोंडाण्यास म्हणजे सिंहगडास आणून केली. विजापूरच्या विजापूरास सुटका न करिता, सिंहगडास आणून सुटका करण्यात हेतू दोन होते. शहाजीसारख्या प्रबळ व डोईजड सरदारालाही आपण शिक्षा कशी देऊ शकतो हे सा-या महाराष्ट्रदेशास कळावे हा एक हेतु आणि बापलेकांच्या भेटीत शिवाजीला शहाजीची आतून फूस कितपत होती ते कळून यावे हा दुसरा हेतू. दोन्ही हेतू दुर्बळ व खुळेपणाचे दर्शक होते हे सांगावयाला नकोच. आदिलशाही सामर्थ्य किती आहे हे जाणते लोक जाणतच होते आणि बापलेकांच्या प्रत्यक्ष भेटीत शहाजीचा अंतरात्मा उघड नजरेस येईल ही आशा व्यर्थ होती. शहाजी मुस्तफाखानाला न जुमानता मुक्त्यारीने वागू लागला, शहाजीला बंधमुक्त केल्यावर त्याच्या दोन्ही पुत्रांनी शस्त्रे उपशिली व शहाजहानाशी संविधान बांधिले, या उघडउघड कृत्यांनी शहाजीची मनोरचना कोणत्या प्रकारची आहे हे स्पष्ट कळण्यासारखे असून, त्याबद्दल वाटाघाट व शोध करीत बसण्याचे कारणच नव्हते. शहाजी, संभाजी व शिवाजी यांना तेथल्या तेथे जमीनदोस्त करून टाकणे हाच राजकीयदृष्ट्या सीधा मार्ग होता. परंतु जमीनदोस्त करण्याचे सामर्थ्य आदिलशहाच्या ठायी बिलकुल नव्हते. सबब, दुखविलेल्या शहाजीला शिवाजीशी शिष्टाई करण्यास महमदशहाने विनंती केली! त्या विनंतीचा परिणाम जो व्हावयाचा तोच झाला. शहाजीने शिवाजीशी बोलण्यात दोन भाषा वापरिल्या. चार लोकांसमक्ष बोलताना, आदिलशहाशी चाकर या नात्याने प्रामाणिकपणे वागावे म्हणून तो शिवाजीस उपदेश करी व एकांतात आदिलशहा व मोंगल यांच्याशी वेळ पडल्यास कालदेशवर्तान पाहून दोन हात करण्यास चुकू नये म्हणून स्वच्छ सल्ला देई (जेधे शकावली). ही असली शिष्टाई करून शहाजी विजापूरास शहाला बंगळूरप्रांती भेटून शक १५७१ च्या पावसाळ्यात परत गेला.