प्रस्तावना
महाराष्ट्री पुत्त शब्द मराठीत पूत् होतो म्हणजे त्त या संयोगाचा त् असा असंयोग होतो व संयोगाच्या पूर्वील स्वर ऱ्हस्वाचा दीर्घ होतो. जे माहाराष्ट्रिक त्त असा पूर्वी उच्चार करीत ते स्वत:च त् असा नंतर उच्चार करू लागले, असे म्हणून भागणार नाही. त्त चा त् उच्चार होण्याला काही तरी बहि:कारण पाहिजे. हे बहि:कारण नागलोक होत. नागांना (१) जोडाक्षरे उच्चारण्याचा कंटाळा असे. तसेच (२)अन्त्य अ उच्चारण्याचाही कंटाळा असे. (३) संयोगापूर्वील स्वर दीर्घ उच्चारण्याचीही त्यांना खोड असे. माहाराष्ट्रिकांचा व नागांचा जेव्हा मिलाफ झाला तेव्हा नागांच्या ह्या तिन्ही खोडी माहाराष्ट्रिकांवर लादल्या गेल्या आणि त्या खोडी नागमाहाराष्ट्रिकोत्पन्न जे मराठे त्यांच्या मराठी भाषेत दिसू लागल्या. माहाराष्ट्रिकांचे फक्त प्, उ आणि त् हे तीन उच्चार तेवढे राहिले. महाराष्ट्री पुत्तोतील (४) अन्त्य ओ चा नागांनी उ करून पूतु असे रूप बनविले. ओ उच्चाराहून उ उच्चार नागांना सोपा वाटे. महाराष्ट्री पुत्तेणचे अन्त्य अ गाळून व (५) न् चा अनुनासिक करून नागांनी पूते असे उच्चारण केले. माहाराष्ट्रिकांना स्वरापुढे स्वर संधी न करता उच्चारण्याची खोड फार. (६) ती खोड नागांनी मोडून टाकून पुत्ताअ चे पूता बनविले. महाराष्ट्री पुत्तत्तोतील ओ चा उ करून, जोडाक्षरांची साधी अक्षरे करून व (७) अनुनासिक लटकावून पूतातून् असे पंचमीचे रूप बनविले. पुत्ताउतील (८) उ चा हु, हु चा हूँ व हूँ चा हून् बनवून पूताहून् हे रूप रचिले. पुत्तस्स मधील (९) स चा ह व ह चा अ करून पूता असे रूप निर्मिले. हे नऊ फेरफार फारसे चमत्कारिक नाहीत. सर्वात अत्यंत चमत्कारिक फेरफार म्हटला म्हणजे (१०) पूताँ, पूताँही, पूताँनी, पूताँहून्, पूताँतून्, पूतानों, ह्या अनेकवचनी रूपातील ता वरील अनुनासिकाचा होय. मराठीत पूता हे चतुर्थीचे एकवचन आहे व पूताँ हे चतुर्थीचे अनेकवचन आहे. तसेच, संबोधनाचे एकवचन पूता आहे व अनेकवचन पूतानो आहे. पूतानोँ हा पूतान्हो ह्या रूपाचा अपभ्रंश आहे. येथे असा प्रश्न येतो की पूताँ व पूतान्हो या अनेकवचनी रूपात अनुनासिक व न्कार कोठून आला? हाच प्रश्न थोडा विस्तृत करून असा प्रश्न येतो की मराठीत पुत्रांस्, पुत्रांना, पुत्रांतें, पुत्रांहून, इत्यादी रूपांत अनेकवचनी अनुस्वार व अनुनासिक कोठून येतात? महाराष्ट्रीत तर हे अनुनासिक - अनुस्वार नाहीत. प्रश्नाला उत्तरे असे आहे की हे अनुनासिक- अनुस्वार मराठीत नागभाषेतून आले. पूर्ववैदिकभाषेत पुत्र ह्या शब्दाचे प्रथमेचे अनेकवचन (१) पुत्रास:, (२) पुत्रा:, (३) पुत्रे व (४) पुत्रान् असे चार प्रकारांनी होत असे. 'संस्कृत भाषेचा उलगडा' ह्या निबंधात हा चतुर्विध प्रकार मी दाखवून दिला आहे. वेदांत पुत्रान् ह्या साच्याचे म्हणजे अन् प्रत्ययान्त रूप अनेकवचनी प्रथमेचे क्वचित येते. अन् प्रत्ययान्त रूप द्वितीयेच्या अनेकवचनाचे असते हे सर्वांच्या नित्यपरिचयाचे आहे. परंतु वेदांत क्वचित हे अन्प्रत्ययान्त रूप प्रथमेच्या अनेकवचनी योजिलेले पाहून, सायणाचार्यांनी छंदसि बहुलं या घबाड नियमाचा आश्रय करून, हे अन्प्रत्ययान्त रूप प्रथमेच्या अनेकवचनाचे आहे असे विधान स्वच्छ केले आहे आणि असे विधान केल्या वाचून दुसरी गती नव्हती.