प्रस्तावना
तेव्हापासून मुस्तफाखानाच्या मनात शहाजीसंबंधाने जी अढी बसली ती अद्यापपर्यंत कायम होती. मुरारपंत व खवासखान यांचे खून करण्याच्या कामी मुस्तफाखानाचे अंग होते. खवासखानाचा निकाल लागल्यावर वजिरी महमदशहाने मुस्तफाखानाला दिली. रणदुल्लाखान शहाजीचा स्नेही, सबब त्याचा तो पक्षपाती आहे असे मुस्तफाखान, अफजलखान वगैरे लोकांनी शहाच्या व बडे साहेबिणीच्या मनात भरवले. सैन्य, तोफखाना वगैरे सरंजाम शहाजी सदा उमद्या स्थितीत ठेवी, हेही ह्या ऐदी आदिलशाही लोकांना पहावेना. शहाजी एखाद्या प्रसंगी आपल्यावर उठेल, अशीही भीती महमदशहाच्या डोक्यात ह्या मत्सरी लोकांच्या चिथावणीने उद्भवली. बड्या साहेबिणीने तर मुलुखगिरी करून शहाजी विजापूरास आला म्हणजे शहाजीच्या तोंडावर त्याची निर्भर्त्सना करण्याचा उद्योग आरंभिला. तेव्हा अलीकडील दोन चार वर्षांत शहाजीने विजापूरी बरसातीत छावणीस येण्याचेच टाळले. तो काही ना काहीतरी निमित्त काढून बंगळूरास बरसातीत राही. दोन तीनदा आदिलशहाने दरबारी येण्याविषयी शहाजीस निरोप पाठविले. परंतु ते ऐकिले न ऐकिले असा बहाणा शहाजी करी व बडेसाहेबिणीच्या दुरुक्त्या टाळण्याचा यत्न करी (बृहदीश्वरशिलालेख) आणि स्त्रीनायकीत कोणता प्रसंग कोणत्या प्रसंगी गुजरेल या संशयाने बंगळूरासच गुजराण करी (शिवदिग्विजय ७२). शहाजीच्या या धरसोडीच्या गैरहजेरीचा प्रारंभ सुमार शक १५६४ त रणदुल्लाखानाने मरणापूर्वी शहाजीस असा इशारा दिला होता की, तुम्हाला दरबारी शत्रू उत्पन्न झाले आहेत, तेव्हा या उपरि तुम्ही विजापूरी राहू नये, जहागिरीवर बंगळूरासच राहणे करावे (शिवदिग्विजय १४७). ह्या सल्ल्या बरहुकूम शहाजी बहुश: बंगळूरास राही, कधी कोलारास राही व कधी बाळापुरास राही, परंतु विजापूरास छावणीस येईनासा झाला. दरबारी चुगल्याचहाड्या व क्षुद्र वैमनस्ये यांची तिरस्कृति हे शहाजीच्या न येण्याचे एक कारण होते. दुसरे कारण असे होते की, पातशाही छायेखाली खुरटत बसण्यापेक्षा त्या छायेच्या बाहेर स्वतंत्र हवेत फोफावत जाणे शहाजीस मनापासून आवडे. शक १५६१ त बंगळूर काबीज करण्याच्या इराद्याने तेथील चार पाच लक्ष होनांचे उत्पन्न खुष होऊन आदिलशहाने शहाजीस सैन्याच्या खर्चाकरिता लावून दिले होते. शहाजीने कर्नाटकात जो मुलूख जिंकिला त्याच्या जमीनमहसुलाची व्यवस्था महाराष्ट्रातील ब्राह्मण कारकुनांच्याद्वारा त्याने इतकी चोख ठेविली की, रयत आबादान होऊन कर आनंदाने देत व आपल्यावर अधिकारी असावा तर शहाजी असावा अशी इच्छा दर्शवीत. उत्पन्नातील पातशाही वाटा शहाजी नियमाने विजापूरास पाठवी व तो वाटा शहाजीच्या अमलात इतका मोठा झाला की, त्याच्या जिवावर आयत्या पिठावर रेघा ओढणा-या महमद आदिलशहाचे सर्व विलास चालत. त्यामुळे महमदशहा शहाजीचा बराच मिंधा झालेला होता. शिवाय, मुसलमान सरदार पाठवून जे कर्नाटक बहुत वर्षे सर झाले नाही, ते शहाजीने पाच चार वर्षांत जिंकून दिले, ही बाब महमदशहाला विसरता येत नसे. तत्रापि शहाजीसंबंधाने त्याचे वर्तन संशयी असे. कर्नाटकात शहाजीला तो प्राय: एकटा पाठवीत नसे. कोणी तरी मुसलमान सरदार त्याच्या जोडीला प्रत्येक मोहिमेत असे. रणदुल्लाखान, आसदखान, रस्तुमजमा, अहमदखान, मुस्तफाखान असा कोणी तरी खान शहाजीच्या वर देखरेखीला सदा पाठविला जाई. महमद आदिलशहाला अलीकडे दुसरा असा एक संशय येत चालला होता की, कर्नाटकातील पाळेगारांना व राजांना आपल्या विरुद्ध चिथवून देण्याचे काम शहाजी करतो. तिसरा असाही एक संशय महमदशहाला अलीकडे येऊ लागला की, पुणेप्रांती आपल्या शिवाजीनामक मुलाच्या करवी शहाजी बंडाळी उभारवितो आणि हा संशय येण्याला थोडेबहुत गेल्या पाच चार वर्षांत कारणही घडले होते.