प्रस्तावना
२३. राजकीयदृष्ट्या देशातील लोकस्थिती व दरबारातील पक्षस्थिती वर्णिल्यानंतर रियासतीच्या भोवतालील राजकीय परिस्थिती सांगणे सोईस्कर होते. शहाजीच्या उमेदवारीच्या काळी, निजामशाहीच्या शेजाराला एकंदर चार शाह्या होत्या; उत्तरेस दिल्लीची प्रचंड व विस्तीर्ण मोंगलाई, दक्षिणेस विजापूरची आदिलशाही, बेदरची बरीदशाही व गोवळकोंड्याची कुतुबशाही. पैकी बेदरची बेरीदशाही मरणोन्मुख झाली असून कुतुबशाहीहून आदिलशाही व आदिलशाहीहून मोंगलाई एकाहून एक बलिष्ट होत्या. सर्वांत मोंगलाई अत्यंत बलिष्ट असून, तिचा रोख दक्षिणेतील सा-या शाह्या खाऊन टाकण्याचा स्पष्ट व सर्वजनदृष्ट होता. दिल्लीच्या मोंगलांनी निजामशाहीचे मोठमोठे लचके तोडिले असून राजू, मलिकंबर व मालोजी यांच्या कर्तबगारीने ती शाही काही काळ जिवंत राहिली होती, आणि निजामशाही वारली तर बाकीच्या शाह्या निजामशाहीचे अनुकरण करतील असा रंग दिसत होता. तत्रापि, निजामशाही व आदिलीशाही यांच्या आपसात लढाया चालूच होत्या. भोवतालची राजकीय परिस्थितीही असल्या प्रकारची होती.
२४. खुद्द निजामशाहीतील अंतस्थ राजकीय परिस्थिती पाहिली तर तीही वाखाणण्यासारखी नव्हती. मुख्य शहा जो मूर्तिजा ऊर्फ बु-हाणशहा तो दुर्बल असून, मोंगलांनी दिलेल्या पंचवीस वर्षांच्या माराने त्याची व त्याच्या बरोबर रियासतीची इज्जत उतरून गेलेली होती. मूर्तिजाच्या पहिल्या अमदानीत राजू व अंबर ह्या दोघा दक्षिणी व परदेशी पुढा-यांनी राज्याचा पूर्व व पश्चिम भाग अनुक्रमे वाटून घेतला होता व मूर्तिजाला आवश्याच्या किल्ल्याभोवतील काही खेडी निर्वाहार्थ लावून दिली होती! मूर्तिजाच्या उत्तर अमदानीत मलिकने राजूला जमीनदोस्त करून सर्व सत्ता आपल्या एकट्याच्या हातात एकवटविली होती व शहाला तो कस्पटासमान लेखीत होता. शेवटी राजूचा घरचा काटा काढून टाकील्यावर मोंगलांशी व आदिलशाहाशी झगडण्यात अंबर गुंतला होता. अशा आणीबाणीच्या वेळी शहाजीराजा भोसला तत्कालीन राजकीय आखाड्यात उमेदीने व ताज्या दमाने अवतीर्ण झाला. शहाजी आपला वाली होईल व म्हाता-या अंबराच्या प्राणघेण्या मगरमिठीतून आपणास सोडवील अशा आशेने मूर्तिजाचे होते तेवढे सर्व वजन शहाजीच्या पाठीला होते. ह्या वजनाचा पूर्ण उपयोग करून घेऊन, निजामशाहीची मोडती इमारत शहाजीने काही काळ सावरून धरिली आणि इतकेही करून ती कायमची मोडल्यावर स्वत:चे सामर्थ्य वाढवून आदिलशाही व मोंगलाई यांची हाडे खिळखिळी करण्याचा मार्ग आपला प्रतापी मुलगा जो शिवाजी त्याला मोकळा करून दिला.