प्रस्तावना

अशा काळी एकच तोड शिल्लक राही. ती ही की, नवीन तिसरा एक पक्ष उभा करून, पूर्वीच्या दोन पक्षांना दाबात ठेवावयाचे. शहाजी जेव्हा वडिलाच्या जहागिरीचा मालक होऊन निजामशाही दरबारात शक १५४३ त वावरू लागला त्या वेळी त्या दरबारात हे दक्षिणी व परदेशी बंड ऐन रंगात येऊन अगदी पिकून गेले होते. ह्या वेळी निजामशाही तख्तावर मूर्तिजा, मूर्तजा किंवा मूर्तुजा हा नरम, चैनी, ऐदी व नाकर्ता सुलतान होता. मीर राजूचा सासुरवास दु:सह झाला म्हणजे मलिकंबराची कास धरावी आणि मलिकंबराचा जाच असह्य झाला म्हणजे राजूची पायधरणी करवी, अशी काही वर्षे मूर्तिजाने काढल्यावर त्याने दक्षिणी व परदेशी यांच्या पीडेतून मुक्त होण्याकरिता तिसरा एक पक्ष निर्माण केला. तो पक्ष म्हणजे मराठ्यांचा पक्ष. अवश्यास व परिंड्यास असताना मूर्तिजाने मालोजी भोसले यास जवळ केले होते. मालोजीचा मुलगा शहाजी याचे लग्न जाधवरावाच्या मुलीशी जुळवून देण्यात मूर्तिजाचे बरेच अंग होते. ह्या कृत्याने मालोजी उपकारबद्ध झाला व जाधवरावाच्या बरोबरीचा तोलदार सरदारही बनला आणि अशा त-हेने तिसरा पक्ष उभारण्याच्या लायकीचा ठरला. परंतु ह्या तृतीय पक्षाचे पुढारपण गाजवीत असता मालोजी शक १५४१ त वारल्यावर पक्षाध्यत्व शिताफीने गाजविण्यास नाना प्रकारानी लायक असा आणिक एक पुरुष मूर्तिजाला लाभला. तो कर्ता पुरुष म्हणजे तरुण, महत्वाकांक्षी व कर्तबगार शहाजी भोसला हा होय. शहाजी राजाचे जे गुणवर्णन जयरामकवीने केले आहे त्याचा अनुवाद शिवदिग्विजय व शिवप्रताप ह्या दोन्ही बखरीत सापडतो. शूर, गुणज्ञ, परेंगितज्ञ, जातीने मर्द, युद्धव्यूहकुशल, शहाची मर्जी संभाळून वागणारा परंतु स्वत:चा कुर्रा जाऊ न देणारा, असा गुणगणमंडित जो शहाजी भोसला त्याच्याद्वारा राज्यात मराठ्यांचा तिसरा पक्ष उभारून दक्षिणी व परदेशी पक्षांना जरबेत ठेविण्याची व्यवस्था मूर्तिजाने केली. दरबारी एकांतात व लोकांतात जाण्यायेण्याची शहाजीला सदर परवानगी असे. शहाच्या मर्जीचे दुसरे उदाहरण बखरकार देतो शक १५४५ त शहाजीला संभाजी हा प्रथम पुत्र झाला. तेव्हा शाहाने स्वत: मोठा समारंभ करून शहाजीस वस्त्रे, भूषणे, अलंकार, परगणे व किल्ला बक्षीस दिला. (शिवाजीप्रताप). शहाच्या मर्जीचे दुसरे उदाहरण बखरकार देतो ते हि असेच मायलेवाईक आहे. तेही असेच मासलेवाईक आहे. मूर्तिजाचा जेव्हा अंत झाला तेव्हा त्याने दक्षिणी व परदेशी मुसलमानांवर विश्वास न ठेविता मराठा जो शहाजीराजा त्याच्यावर आपल्या बायकापोरांना संभाळण्याचे काम निरोपाने सोपविले. मूर्तिजाच्या अंतकाळी शहाजी निजामशाहीत नव्हता, ही बाब लक्षात घेतली म्हणजे शहाजीने बु-हाणशहाचा केवढा विश्वास संपादिला होता ह्या विधानाच्या सिध्यर्थ ह्याहून जास्त पुरावा देण्याची जरूर नाही.