Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पहिला (१७५०-१७६१)
मुकाम आहेत. मोठ्या संशयांत पडला जे भावाकडे जावें तर तेथील प्रकार विशकलीत दिसतो; माघारें परतून जावें तर वराडांत कोणी पुसणार नाहीं; जे भावानें पिटून लाविलें अशा संकटांत पडून आहे. परंतू लोकांत ह्मणतात जे राजश्री विठ्ठल सुंदर दिवाण बालापुरास कांही कर्जवाम मेळवावयास गेला आहे, त्याची मार्गप्रतीक्षा करितात. तो आला ह्मणजे पुढें अवरंगाबादेस जाऊं असें ह्मणोन कालक्रमणा करितो. व नानाप्रकारचे विचार आचार इम्राइमखान वगैरे करीतच आहेत. त्याचा याचा पेच पडला. परंतु यासहि संशय आहे जे इम्राइमखान वैगैरे सामान त्याजपाशी चांगलें आहे. जरी रेटून आलाच तरी कलह वाढेल, हेहि खराबीच. याजकरितां काल बसालतजंगांनीं आपला दिवाण जव्हायरमल्ल व पेशकार बिरजनाथ हे दोघेजण त्यास समजाऊन माघारे वाटे लावावयास पाठविले. ते व कांहीं मेवा वैगैरेहि पाठविला. जाहिरी तरी कृत्रिम कांहीं भासत नाहींच. स्वामीचाच स्नेह संपादून रहावें ऐसा भाव दिसतो. तीर्थस्वरूप र।। जीवनराव यांनीं सर्वप्रकारें आपली खातरजमा करून घेतली आहे. खोजे रहमदुलाखान व हकीम महमदअल्लीखान हे मध्यस्त. यांचें वचन प्रमाण घेतलें आहे. स्वामींनीं मजला लिहिला मजकूर तीर्थस्वरूप जीवनराव यासीहि लिहिला होता. त्यांचें पत्र मीं पाहिलें व हेंहि पत्र त्यांस दाखविलें व त्याचेच खातरजमेवरून भरंवसाहि पुरता. कृत्रिम कोठें आढळत नाहीं. तो आला तरी लढाईस सिद्ध होऊं ऐसें हे ह्मणतात. इतका अकृत्रिम प्रकार दाखवून जरी चित्तांत कृत्रिम भाव असला तरी दो चौ दिवसांत कळेल. जरी निजामअल्ली येऊंच लागला आणि हे लढाईस बाहिर न निघेत तरी परिच्छिन्न कृत्रिमसें कळेल. परंतु कृत्रिम विचार करावयाची हिंमत सहसा होणार नाहीं, जालीच तरी श्रीकृपेनें याचें पारपत्य करणें कांहीं कठीण नाहीं. परंतु त्याचें येणें या न येणें याकरितां सरकारचें काम बंद ठेवावें हें सलाह नाहीं. त्याच्या येणें या न येणेंयाचा जसजसा प्रकार घडेल तसा घडो. तशासारखी फिकीर त्याची श्रीकृपेनें होईल. परंतु जो करार व मदार ठहरला आहे त्याचे महाल वगैरे घ्यावयाजकरितां श्रीमंत साहेबजादे याजपाशीं मोगलाकडील हकीम महमदअल्लीखानास नेऊन अशाच संधींत दबून दबकाऊन चित्तानरूप काम माहालाचें करून घ्यावें हेंच सलाह आहे. जरी अशा संधींत मोगलांकडील गृहस्थ नवे आणा वाहिल्या, हवाल्यावर टाकीत, तरी आपण सावध व्हावें. स्वामी ज्यास हातीं धरतील त्यास नमूदांत आणितील हें सर्वांस कळलें आहे. अशा संधींत चित्तानरूप माहाल द्यावयाची वेळ आहे. जरी निजामअल्लीचा लडा वारल्यावर काम करून घेऊं. वाटल्यास किल्ल्यावर पडत पंधरा वीस दिवस गुजरून गेले. आणखीही इतकेच दिवस गुजरून जातील. इतक्यांत फिरंगी समीप येऊन पावले तरी त्याच्याहि येणेयाचा एखादा बहाना काढितील जे त्याच्या सलाहानें करावे लागले. असे करिता लांबण फार पडेल. फिरंगियांनी इसाकपटणींहून छ १० जिल्हेजी डेरे बाहीर केले होते. छ १४ जिल्हेजीं दिढा कोसाचें कुच इकडे यावयाकरितां केले होतें. त्यास तेथून निघोन पंचवीस दिवस जाले. पाहवें कोठवर आले अमतील ? निजामअल्ली चाळीस पंचेचाळीस कोसांवर आणि आपली फौज गंगातीरी पंधरा कोसांवर. ऐसे असतां आपलें काम त्याचे येणेयाचे संशयाकरिता बंद ठेवणें सलाह माझे बुद्धीस तरी येत नाही. इकडे आपलें काम माहाल वगैरे निवडून द्यावयास शुरू केलिया अधिक निजामअल्लीवर दबाव पडेल कीं आतां कांही बाकी राहिली नाहीं व याचा ग्रहस्त येऊन गुंतल्यावर आणखी कारभार काय करणार ? माहाला तपसील करून देतीलच ह्मणजे जागा जागा कमावीसदार पाठवावेच. सहजच गुंता उरकेल. व लोकांचे तर्कवितर्क दूर होतील. नाहींतर संशय दूर होत नाहींत. मी आपल्या बुद्धीनें लिहिलें असे. वरकड करणार जें समयोचित असेल तेंच करीत असतील. परंतु फिरंगी समीप येऊन पावले तरी हैदरजंगास स्वामी पुरते जाणतात जे कसे काव्यादाव्याचा मनुष्य आहे. दिसता प्रकार सविस्तर विनंति लिहिली. पुढें समयोचित सलाह असेल तें करणार स्वामी समर्थ असेत. हे विनंति. रवाना छ ९ माहे मोहरम.