Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पहिला (१७५०-१७६१)
[८०] ।। श्रीशंकर ।। २५ सप्टेंबर १७५७.
पे॥ छ १० मोहरम रविवार सा घटका दिवस प्रात:काळ.
श्रीमंत सद्गुणमूर्ती साहेबाचे सेवेसी:-
आज्ञाधारक कृष्णाजी त्रिंबक सा॥ नमस्कार उपरि विनंति. छ २ मोहरमचें आज्ञापत्र सादर जालें तें छ ९ माहे मजकुरीं पावलें. मस्तकीं वदिलें. तुवां पत्र पाठविलें तें पावलें, त्याचे उत्तर सरकारची यापूर्वी जोडी आली होती. ती येथेंच राहिली होती, तीजबराबर सविस्तर वर्तमान लिहून पाठविलें असे. त्याप्र॥ वरचेवर वर्तमान लिहीत जाणें. नवाबाजवळ नवी फौज किती ? मनसबदार कोण कोण ? किती फौजेनें जमा जाहलें ? निजामअल्ली कोठें आहेत ? त्याजपाशीं गाडदी व तोफखाना काय ? फौज काय ? जानोजी भोसले याची फौज कोण ? किती आहे ? तें सर्व लिहिणें. भोसल्यांचे वकिलाकडून लेहून करवावयाचा प्रकार पेशजी लिहिला होता. त्याचे काय कसें केलें ? तें सर्व लिहिणे करणें. निजामअल्लीचाहि प्रकार पेशजीच्या लिहिल्याप्रे॥ करावयाचें करणें. वरचेवर वर्तमान लिहित जाणें. पंचवीस लाखांची जागीर सरकारांत द्यावी, नगर द्यावें. शाहानवाजखानास तीन लाखांची जागीर व दौलताबाद व अंतूर दोन्ही किल्ले करार करावे, इतके मजकूर कबूल केले ह्मणोन जीवनराव यांणीं लिहिलें. त्यावरून चिरंजीवास व दत्तबास सलुख करावयाविशीं लिहिले आहे. सत्वर पंचविसांचे परगणे मात्र चांगले निवडून घ्यावें, भेटावें, सलुख जाहीर करावा ऐसें लिहिलें आहे. परंतु फौजा जमा करितात. निजामअल्ली येणार. इम्राईमखान जुंजाच्या गप्पा मारतात. त्यास तुर्त सलुख लाऊन ठेवावा. फौजा जमा जालीयावर कजीयास उभें राहावें ऐसा भाव आहे. किंवा शुद्ध भाव आहे हा शोध घेऊन लिहून पाठवीत जाणें ह्मणोन आज्ञा. ऐशास येथील वर्तमान हुजूर वरचेवर विनंति करीत असतोच. सांप्रत येथें फौज नवाबाची मुगली, कदीम व नवी व किरकोळ मनसबदार मिळोन पांच हजार व हणमंतराव निंबाळकर दोन हजार व जानोजी निंबाळकर हजार व मुधोजी नाइक निंबाळकर व नागोजी माने व बाजीराव घोरपडे वगैरे किरकोळ म-हाठे पांचशें येकूण साडेआठ हजार फौज येथें आहे. वरकड कोणी अधिक आगळी लिहितील तर लिहोत. परंतु इतकीच फौज आहे. निजामअल्लीहि पांचहजार फौज, नवे तीन हजार गाडदी व तोफा गाडद्यांच्या व सरकारच्या यांच्या मिळोन पन्नास. याखेरीज बाण वगैरे सरंजाम चांगला आहे. ह्यणून नवाबाचें येथें वर्तमान आले. व शामजी गोविंद टकले यांचें पत्र मजला आलें. त्यांत वर्तमान त्यांनी लिहिले आहे. तें पत्र बजिनस हजूर पाठविलें आहे. त्यावरून सविस्तर अर्थ ध्यानास येईल. भोसले यांची फौज तर त्याजब॥ नाहीं ह्यणून वर्तमान आहे. मी येथून भोसले याचे वकिलाकडून वरचेवर लिहिवीत गेलों. मजला कळला तसा प्रकार येथील भासवीत गेलों. त्याजवरून बाबूराव कानेरे यांचे पत्र मजला आलें तें यापूर्वी बजिनस हजूर पाठविलेच आहे. पाहून अर्थ ध्यानास आलाच असेल. व र॥ येशवंतराव कानेर हे निजामअल्ली समीप होते. त्यासहि वरचेवर लिहित गेलों. त्याचेंहि उत्तर र॥ रघुनाथपंत वकील यांसी आलें. त्याची नकल घेऊन यापूर्वी जोडी रवाना हजूर जाली त्या पत्राब॥च रवाना करीत होतों. परंतु ते नकल चुकून राहून गेली ते सांप्रत पाठविली आहे. त्याजवरून अर्थ कळों येईल. अस्सल पत्र रा॥ यशवंतराव याचे तीर्थस्वरूप र॥ जीवनराव केशव यांनीं रघुनाथपंतापासून घेतले होतें. तें त्यांनीं हजूर पाठविलें असेल. निजामअल्लीनें न यावें हा प्रकार केलाच आहे. व अलीकडे नवाबाचीं पत्रें त्यांस पाठविलीं आहेत कीं तुवा सहसा न यावें. त्यास पत्रें पावलीं त्या संधींत त्यानें अंबडापुराहून कुच करून, धोत्र्यासमीप पेनगंगा आहे तेथवर तीन कोस येऊन राहिला.