ते अण्णपा शेटक्यास साहिनासें सरखेली व फौजदारी अपल्यास बहुत दिवस चालल्याकरितां फौज तमाम आपल्या वंशांत असल म्हणावयाचे दुर्भ्रमकडून, आपले भाऊबंदासमवेत केसरी कापडे सेऊन बाहेर विधान करून बसले। तेव्हां महाराजानी पूर्वीच या अण्णप्पाची दुष्ट प्रकृति वळखिले होते करितां त्याच संशयानें तुम्ही हत्यापत्यारानिशी बाहेर बसावयास कारण काय म्हणून विचारून पाठविल्यास, अण्णप्पानीं सबूरी न करितां ज्या महाराजाचे अन्न खाऊन थोरवी पावले कीं त्यावरीच हत्यार धरून येक दोघांसही जखमिही केल्यावरी महाराजानी कळून आटोपत नाहीं म्हणून आपल्या लोकांस हल्यास निरोप दिल्हे । त्याच्या याच्या मारामारींत अण्णप्पा व त्याचे भाऊ वगैरे साहा सातजण ठार जाहले । तदनंतरें महाराजास अणप्पा शेटक्यानी सरकाराची चाकरी केली ते आठवास येतेवेळेस समग्र अण्णप्पास मारिला तो पश्चाताप पावण्यासहीं कारण होतें। तदनंतरें त्रिचनापल्लीचे किल्यांत असणार मुरारजी घोरपडे यानी आपले अत्यइनीसखान् म्हणार तुरुकाचे बोधनेवरून, तंजाउर राजाचा मुलुक थोडा जाहला तरीहीं चांगलें राज्य जाहल्याकरितां, समग्र राज्य आक्रमावें तरीहीं तेथील राजे आपले यजमान, यास्तव कांहीं मुलुक स्वाधीन करून घ्यावें, तेहीं केवळ फौजबंदीनें देइनात करितां चिल्लर उपद्रव करित असावें म्हणावयाचे बुद्धीने इनीसखाना बरोबरी दोनी हाजार स्वार तैनात करून पाठविले। त्या इनीसखानानें तंजाऊरचा किल्ला, तींत कोठे लुटणें कोठे मारणें भांडण्यास समोर होईनासें एक दोनदा चिल्लर उपद्रव फार आरंभिला । तेव्हां प्रतापसिंव्ह महाराजानी आपला सेनापती मानाजीरायास निरोपून समागमें थोडी सेनाहीं देऊन पाठविले । त्यानी जाऊन थोडे दिवस त्या इनीसखानाच्या पाठलाग करित जाऊन शेवटी येकटा नदीचे कांठीं सापडून तिनशे स्वार ठार मारून सातपांचशे घोडेहीं व मनुष्यहीं पडावुं धरून आणीले। त्या भांडण्यांत सरदार इनीसखान् म्हण्णार गुप्त होऊन गेला; तेव्हड्यानें देशास मुरारायाचा उपद्रव राहून गेला । तदनंतरें महम्मद अरबू म्हण्णार येकजण तो कोण म्हणिजे पेसजी चंदासाहेब,