[ १९४ ] श्री. २३ डिसेंबर १८००
सलगुणालंकरण अखंडितलक्ष्मीअलकृत राजमान्य राजश्री सुबराव पंडित स्वामी गो। यासी : -
पो। अमृतराव रघुनाथ नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणोन स्वकीय कुशल लिहित असावे. विशेष आपण पत्र पाठविलें तें पावलें. पूर्व रुणानुबंधाचे अर्थ व श्रीमंत महाराज यांचे लक्षाचे भाव लिहिले ते व राजश्री बच्याजी जिवाजी याचे पत्रावरून अवगत जाहालें. ऐशास पूर्व स्नेह आहे तो परस्परें वृद्धिंगत असावा हें उचित आहे. आह्मीं भिवंडीस स्वस्थ आहों. श्रीमंत महाराज यांचे क्रियेचा अवलंब असे रा। छ ६ शाबान. बहुत काय लिहिणें लोभ कीजे. हे विनंति.