[ १९० ] श्री. १७७४.
राजश्रीयाविराजित राजमान्य राजश्री बाळाजीपंत स्वामीचे सेवेसीः-
पोष्य सखाराम भगवंत साष्टांग नमस्कार विनंति उपरि येथील कुशल ता। छ २३ सफर जाणून स्वकीय कुशल लेखन करीत जावें. विशेष. राजश्री पंत अमात्य यांजकडील प्रांत साळशी येथील अंमल सुरळीत चालत आल्याप्रमाणें चालावा, त्यांत कितेक प्रकारें मामलेदाराकडून उपद्रव होतो, पुरातन चालत आल्याप्रमाणें चालत नाहीं, ह्मणोन ऐकिले त्यास मालवणकरी यांस ताकिद असावी. आपल्यास वर्तमान कळल्यावर ताकिद होऊन त्याजकडील सुदामत चालत आलें असेल त्यास अडथळा न व्हावा आपल्यास ल्याहावेंसे नाहीं जें प्राचीन चालत आलें आहे तें चालवावे पहिलेपासून चालत आलें आहे त्यांप्रमाणें करावें, नवीन न करावें बहुत काय लिहिणें लोभ असो दीजे हे विनंति.