[ १८५ ] श्री. १७७४.
राजश्रियाविराजित राजमान्य राजश्री आपाजीपत स्वामीचे सेवेसीः-
पो। रामचंद्र महादेव सा । नमस्कार विनंति उपरि येथील कुशल ता। माघ शु।। २ पावेतो मु।। लष्कर नजीक बल्हारी येथें क्षेमरूप जाणोन स्वकीय कुशल लेखन करीत असावे विशेष श्रीमंत राजश्री पंत अमात्य याजकडील तालुक्यांत तुह्मांकडून उपसर्ग होऊं नये एविसीं पुण्याचे मुक्कामीं बोलणें झालेंच आहे. तुह्मीही करणार नाहीं हे खातरजमाच आहे. परंतु एक दोन बोभाट बोडकीहाळ, यळगुड वगैरे येथें आइकिले यामुळें पत्र ल्याहावें लागलें श्रीमंत राजश्री अमात्य पंताचे ठायीं श्रीमंताचा व बापूचा व सर्व मुत्सद्दी यांचा लोभ कोणें रीतीचा हेंहि सर्व पाहिलेलेच आहे. तुह्मासही अगत्य असावें ऐसाच योग आहे. परंतु न कळे. अवाईस मिळोन हरएकविसी त्याजकडील प्रांतास घासदाणा किंवा रोखेपत्र ऐसे उपसर्ग लागतील तर फार सांभाळून दरोबस्त त्याजकडील प्रांतास काडीमात्र उपसर्ग न लागे तें करावें. यावेळीं निमित्यधारी तुह्मींच आहे. शिमगा जाई आरि कवित्व राहे ऐसें न व्हावें यांत सर्व आहे त्यांस तो ईश्वरेंच थोर केलेलें आहे. तुमच्या आमच्या उपसर्गानें उणें पडते ऐसें नाहीं. परंतु करणारांनीं मात्र बहुत दूर आंदेशा पाहून चालत असावें ऐसेंच घर तें आहे हें समजोन लि।। आहे याप्रमाणेंच निदर्शनांत यावें. विस्तारें लिहावें तरी सुज्ञ असा. कृपा लोभ कीजे हे विनंति.