सीमा जाली साहेबास सदगुरू करणे नाहीं अविद्येचे गुरु करून परिणाम लागत नाही वारणेपलीकडेस राजा शभु साहेबाचे अपायावरी जपत आहेत. वरकड दुष्ट लोक वेळास जपत आहेत साहेबाच्या चित्तात विवेक, विचार, शास्त्रे, पुराणें, राजनीति , वडिलाचा कदीम पाया, पद्धत येत नाहीं . यामुळे गड, किल्ले, मवास होऊन अन्नावस्त्रास महाग जालें रयत व वतनदार चाकरमासे सर्वस्वें बुडालें पाऊस गेला. कदीम चाकरलोकांस थारा नाहीं, ऐसे जालें परीक्षा दरबारी नाहीं. अपकीर्ति होत चालिली. याउपरि तरी देहावरी येऊन उत्तम विचार चित्तांत करावा मातापुत्रांनी बसोन कारभार एकश्चित्तें करावा चौघे भले सरकारकून व जातिवंत मराठे हातीं धरून ज्याचे त्याप्रमाणें चालवावें, बळ पाडावें, जुना वडिलाचा पाया धरून वर्तावें, ऐसी नीत आहे याप्रमाणें वर्तलिया अवघें कल्याण होईल देव, ब्राह्मण, रयत सतोषी होईल, आणि साहेबांचे कल्याण इच्छितील ईश्वर संतत सपत साहेबास देईल. आडमार्गे गेलिया ईश्वर बरें करीत नाहीं हे आज्ञा देवाची व ब्राह्मणाची आहे उत्तम विचार असेल तो करावा. स्वधर्म राखावा. सत्य जय, ऐसें आहे खरें नाणें, रुपया खरा असेल तोच साहेबीं हातीं धरावा. खोटाळ टिक्का हातीं धरलियानें उत्तम परिणाम नाहीं. यासी साक्ष शास्त्रें, पुराणें, वडिल परंपरागत पद्धति आहेत.
यद्यदाचरति श्रेष्ठस्तत्तदेवेतरो जनः l
स यत्प्रमाणं कुरुते लोकस्तदनुवर्तते ll १ ll
ऐसी नीति आहे. राजे लोकांस स्वभाव असावेः -
दातृत्वं प्रियवक्तृत्वं धीरत्वमुचिज्ञता l
अभ्यासेन न लभ्यते चत्वारि ( रः ? ) सहजा गुणाः ll
ऐसा विचार आहे. साहेबांस निष्ठुर वादें कोणी सांगणार नाहीं. आह्मांस वडिल ह्मणविता याजस्तव गुरुबोधाचे आज्ञेप्रमाणें हे विनंतिपत्र लिहिलें असे.
अप्रियस्य च पथ्यस्य श्रोता वक्ता च दुर्लभः ll
ऐसें आहे कैलासवासी माहाराज थोरले याचीं पत्रें व पद्धत व मातु श्रीची पद्धत व राजारामसाहेब यांची पद्धत वळवटा आह्माजवळ लिहिला आहे. शाहाणपणें अक्कल बुद्धीनें विचार करून चित्तीं धरिला तरी वाचून पाहावा राज्य ह्मणजे बुद्धिबळाचा डाव आहे बुद्धीकरून जिंकिला पाहिजे. थोर थोर राजे या मागें होऊन गेलें सरकारकून होऊन गेले, आह्मी जाणार, साहेबाची कीर्ति वंश राहिला पाहिजे यांत उत्तम दिसेल तें करावें. *